खासदार क्रीडा महोत्सव युवकांचा लोकोत्सव बनला आहे - देवेंद्र फडणवीस

    07-Jun-2026
Total Views |
Khasdar Krida Mahotsav 2026
 
मुंबई : (Khasdar Krida Mahotsav 2026) मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की," ‘खासदार क्रीडा महोत्सवा’त दरवर्षी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. हा केवळ क्रीडाउत्सव न राहता युवकांचा लोकोत्सव बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी आणि प्रशिक्षण मिळत आहे. तसेच युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला असून, यातून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होत आहेत. यामुळे नागपूरसह विदर्भात क्रीडा संस्कृती रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे."
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवार दि.७ रोजी नागपूर येथे 'खासदार क्रीडा महोत्सव २०२६'चा समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली यावेळी ते बोलत होते.यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.(Khasdar Krida Mahotsav 2026)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात ‘खेलो इंडिया’सारखे उपक्रम राबवले जात असून, या माध्यमातून होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. नागपूरच्या मानकापूर स्टेडिअमला राज्य क्रीडासंकुलाचा दर्जा देण्यात आला असून ते देशातील अत्याधुनिक क्रीडा संकुलांपैकी एक म्हणून विकसित केले जात आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा असतील. याशिवाय येथे आधुनिक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारण्याचे कामही सुरू असून, त्यातून मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील."
 
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासमवेत महोत्सवातील विविध खेळांमधील विजेत्या खेळाडूंना व क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवरांना ‘क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान केले. यावेळी पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संपूर्ण टीमचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले. तसेच 'खासदार क्रीडा महोत्सवा'च्या माध्यमातून खेळाडूंना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष आभार मानले.(Khasdar Krida Mahotsav 2026)