‘कॉकरोच’ला अभावपूर्ण अश्रद्धांजली!

    07-Jun-2026   
Total Views |
 
Cockroach Politics Controversy Analysis
 
"निराश आणि बेरोजगार युवा ‘कॉकरोच’सारखे आहेत, ते प्रत्येक ठिकाणी लपून ‘सिस्टम’वर हल्ला करतात,” असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले. याच टिप्पणीचा उपयोग करुन अभिजित दीपकेने अमेरिकेतून ऑनलाईन आंदोलन सुरू केले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन केली. पण, यामागचे सत्य काय? अभिजित दीपके आणि त्याच्या साथीदारांचे वास्तव काय? समाज काय विचार करतो? याबद्दल या लेखात मागोवा घेतला आहे. मागोवा घेतल्यावर वाटते की, ‘कॉकरोच’ला आतापासूनच अभावपूर्ण अश्रद्धांजली...
 
एक अभिजित दीपके नावाचा झुरळ (असे मी म्हणत नाही, तर त्याने ‘कॉकरोच जनता पार्टी’ काढली आहे.) काल दिल्ली विमानतळावर उतरला. त्याच्या हातातल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. खरेतर डॉ. बाबासाहेबांचा फोटो असलेले पुस्तक हातात घ्यायची दीपक्याची लायकी आहे का? आज डॉ. बाबासाहेब असते, तर त्यांनी त्याची चांगली खरडपट्टी काढली असती. कारण, डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते की, "देशात संविधानाचे राज्य आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे म्हणजे अराजकतेचे व्याकरण आहे.” वंचित समाजाला माणसासारखे हक्क-अधिकार मिळावेत, यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘आम्ही बेकार आहोत’ असे म्हणत, ‘हम सब कॉकरोच हैं’ असे विधान करणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ यांचा दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे ‘सीजेपी’ने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मुळीच घेऊ नये.
 
तर, आपण खूप मोठे नेता आहोत आणि आपल्यामुळे देश हादरला असून, इतर देशांत जशी हिंसक आंदोलने होऊन सत्तापालट झाला, तसेच आपल्यामुळे भारतात होईल आणि आपण किंवा आपले आका किंवा जे आपल्याला कठपुतळीसारखे नाचवत आहेत, ते देशाच्या सत्तेत येतील, असे काहीसे त्याला वाटले असेल. त्यामुळे देशात पाऊल ठेवले रे ठेवले की, आपल्याला लगेच अटक होईल, अशी त्याला भीतीही वाटली. (वाटणारच, ‘कोकरोच’ तो; चिरडण्याची भीती वाटणार!)
 
दीपकेने सुरुवातीला समर्थकांना सांगितले की, त्याला अटक होऊ शकते. त्यामुळे विमानतळावर सगळ्यांनी जमावे. दीपकेला वाटले की, सोशल मीडियावर समर्थन दिलेले करोडो भारतीय आपले स्वागत करायला येतील. मग, दिल्ली सरकार आपल्याला अटक करणार. मग, आपल्याला अजून ‘शायनिंग’ मारता येईल. पण, दीपके हे विसरला की, तो जरी ‘कोकरॉच’ असला, तरी देशात जाज्वल्य देशप्रेमी-धर्मप्रेमी धुरंधरांची सत्ता आहे. त्यामुळे दीपके आला काय, गेला काय किंवा ‘सीजेपी’ने जंतरमंतरवर कितीही घाण केली, तरीही हे सरकार किंवा देशनिष्ठ भारतीयांनी त्याला अजिबात महत्त्व दिले नाही. उलट, अशा कित्येक आंदोलनांना, कटकारस्थानांना भारतीयांचे भारतीय सरकार या सगळ्यांना पुरून उरले आहे.
 
छत्रपती संभाजीनगरचा अभिजित दीपके पूर्वी ‘आम आदमी पार्टी’चा पदाधिकारी होता. तो दिल्लीला जातो काय? पुढे अमेरिकेत जातो काय? आणि न्यायाधीशांनी ‘कॉकरोच’ शब्द उच्चारल्याबरोबर सोशल मीडियावर ‘कॉकरोच आंदोलन’ करतो काय? बरे, त्याचे समर्थन करणारे कोण? तर, ‘आम आदमी जनता पार्टी’चे नेते-कार्यकर्ते, भाजपविरोधी नेते, देशात संपत चाललेली डावी आघाडी, मोदींच्या सत्ताकाळात देशाची वाट लावता येत नाही, म्हणून चरफडणारी देशविघातक शक्ती आणि काही खरोखर भाबडे लोक; ज्यांना कुणालाही नेता बनवण्याची हौस असते ते! आता या आंदोलनाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही समर्थन दिले. त्यांच्याबरोबरच दिया मिर्झा, अनुराग कश्यक, ईशा गुप्ता, गुरुनाम सिंग चरूनी, कोंकना सेन, महुआ मोईत्रा, कुणाल कामरा, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, कीर्ती आझाद आणि लडाख अस्थिर करणारा सोनम वांगचुक, सदा न् कदा भाजप आणि हिंदूविरोधी बडबड करणारा ध्रुव राठी अशी ही यादी. ही सगळी नावे पाहिली की, या झुरळाला इतकी पिरपीर करण्याची शक्ती कुठून आली, हे सगळे आपसूक कळते.
 
या ‘कॉकरोच आंदोलना’ला आर्थिक मदत कोण करते? असे विचारल्यावर दीपक्या म्हणाला की, "जर फंडिंग मिळाले असते, तर मी माझे शैक्षणिक कर्ज फेडले असते.” (त्याचे वय ३० वर्षे आहे, ज्या वयात देशातील ७० टक्के युवा आई-बाबांची जबाबदारी सांभाळतात). या म्हणण्यावर विश्वास ठेवावा, तर अमेरिकेचे शिक्षण मधेच सोडून भारतात येण्यासाठी त्याला पैसे कुणी दिले? तसेच भारतात यायचे, तर देशातील वंचित समूहाला फसवून आपल्यासोबत घ्यायचा प्रयत्न करायचा, त्यासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खूप मानतो, हे दाखवायचे आणि नेमके पूज्य बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करायचा, ही अगदी टिपिकल ‘अर्बन नक्षली’सारखी वर्तणूक दीपक्याने कशी केली? हे असले लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत. या असल्या लोकांचा दीपक्या हा आधुनिक ‘ब्रॅण्ड’ असेल का?
 
दीपक्याच्या ‘सीजेपी’ची टीमही अशीच! सौरभ दास हा त्याच्या पार्टीचा प्रमुख प्रवक्ता. दिल्ली दंगलीमध्ये मानवतेला काळिमा फासला गेला. मात्र, सौरभने हिंदूंबद्दल विवाद निर्माण केला. "सौरभ ‘द वायर’ आणि अशाच व्यासपीठांवर हिंदूविरोधी आक्षेपार्ह विधान करतो. महाराष्ट्रात झालेली कोरेगाव-भीमा दंगल असू दे की, मुस्लिमांसंदर्भात हिंदू विवाद असू दे, या विषयांवर लेख लिहिण्यासाठी सौरभला अमेरिकेच्या ‘ठाकूर फॅमिली फाऊंडेशन’कडून मोठा ‘विदेशी फंड’ मिळाला होता,” असे आरोप मागे विजय पटेल या पत्रकाराने केले होते. त्यानंतर सौरभने विजय पटेलला याबाबत कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. काय खरे, काय खोटे? या सौरभने मागे देशाचे तुकडे पडू दे, अशी इच्छा असणार्‍या उमर खलिद आणि शरजीलचे समर्थन केले होते. दुसरा एक पदाधिकारी आहे, आशुतोष रांका. तोही असाच! या ना त्या चळवळीमधला. तिसरा आहे, विजेता दहिया. धु्रव राठी हा इसम सोशल मीडियावर जी काही गरळ ओकत असतो, त्या व्हिडिओच्या विषयाचे संशोधन हा विजेता दहिया करतो. एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे असे अभिजित, सौरभ, आशुतोष आणि विजेता हे चौघे. हे भारताच्या तरुणांच्या भविष्यासाठी लढणार?
 
‘सीजेपी’ भासवते की, त्यांना ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे आंदोलनाला उतरावे लागले. त्यांना देशातली शिक्षणव्यवस्था सुधरवायची आहे. पण, त्यांच्या मागण्यांवरून असे काही वाटत नाही. ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. मंत्र्यांच्या राजीनाम्याने संपूर्ण शिक्षणव्यवस्था बदलेल का? शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल व्हावेत, म्हणून चौघांपैकी एकाने तरी ठोस काम केले आहे का? युवांना नोकरी मिळावी, असे सगळ्यांनाच वाटते. पण, स्वतःला ‘झुरळ’ समजून नोकर्‍या मिळणार आहेत का? ‘कॉकरोच’ लोकांची काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली. त्या परिषदेच्या आयोजनासंदर्भात, जाहिरातीसंदर्भात आणि इतर बाबींमध्ये ‘सीजेपी’ला मदत कुणी केली? दीपक्याच्या आई-बाबांचा एक व्हिडिओही पाहिला. ज्यात त्याची आई म्हणते, "आम्ही त्याला खूप समजावले. पण, तो आमच्या विरोधात गेला.” हे सांगताना त्याच्या आईच्या डोळ्यांत अश्रू होते. आई-बाबांच्या विरोधात जाणारा, त्यांचे मन तोडणारा अभिजित. ज्याला स्वतःच्या आई-बाबाचे मन आणि मान राखता आला नाही, तो काय दुसर्‍यांसाठी करणार? त्याच्या आई-बाबांची इच्छा होती की, त्याने मोठा अधिकारी बनावे. पण, त्यांचे दुर्दैव, त्यांचा मुलगा स्वतःला ‘झुरळ’ समजतो. ‘पापा कहते हैं बडा नाम करेगा, मैं तो अब बस ‘झुरळ’ बनुंगा!’
 
दीपक्याला पाहून २०२३ साली संशयास्पदरीत्या संसदेमध्ये घुसू पाहणार्‍या लातूरच्या अमोल शिंदेची आठवण आली. त्याच्या घरी अत्यंत गरिबी. याला असेच फितवले गेले? त्याच्या समर्थनार्थ त्यावेळी जे लोक पुढे आले, त्यांनी अमोलवर कारवाई झाल्यावर त्याच्या भवितव्यासाठी किंवा कुटुंबासाठी काय केले? तर, काहीच नाही. भारतीय युवांची माथी भडकवायची, त्यांना देशविरोधी कारवाया करण्यासाठी उकसवायचे, त्यांच्या माध्यमातून देशात हिंसा आणि अस्थिरता निर्माण करायची, हाच एक कलमी कार्यक्रम असणारे देशाचे शत्रू! अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे जगभरात अस्थिर वातावरण आहे. या वातावरणामध्ये भारतालाही अस्थिर करण्याचा कुटिल डाव टाकण्याचा प्रयत्न ही देशविघातक शक्ती करत आहे. पण, भारतीय आता चांगलेच जागृत आहेत. त्यामुळेच जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अपेक्षेपेक्षा कमी लोक जमले आणि ‘जेन-झी’चे आंदोलन म्हटले गेले. पण, प्रत्यक्षात अशाच प्रकारच्या इतर आंदोलनात दिसणारे लोकच या आंदोलनात सहभागी झालेले दिसले. ‘सीजेपी’चे आंदोलन म्हणजे, भारतीय युवा रस्त्यावर उतरून आंदोलन करून राष्ट्रप्रेमी सरकार उलथवू शकतील का? याची चाचपणी करणारी ‘लिटमस टेस्ट’ होती, असे म्हणायला वाव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनात जंतरमंतर दिल्लीमध्ये मोदीविरोध, भाजपविरोध आणि हिंदूविरोध हेच घडताना दिसत आहे. त्यामुळे ‘कॉकरोच’चा जन्म कशासाठी झाला, हे भारतीयांनाही कळून चुकले. तसेच जन्म कशासाठीही होऊ दे, उपद्रव केला तर ‘कॉकरोच’चे काय करायचे, हेसुद्धा भारतीयांना माहिती आहे. यानुसार, देशाचे सरकार कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सक्षम आहे. त्यामुळे दिल्लीतले शाहीनबाग ते हिंसक शेतकरी आंदोलन ते आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलन यांचे एकमेकांशी काही साधर्म्य आहे का, याचे सत्य यथावकाश उघड होईलच. बाकी ‘कॉकरोच’ नेहमी आपल्या मरणाने मरतात. ‘सीजेपी’चेही असेच आहे. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ला आतापासूनच अभावपूर्ण अश्रद्धांजली!




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.