मुंबई : (Mrunaltai Gore Flyover) मुंबईतील गोरेगाव आणि ओशिवरा परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित भागाचे शनिवार, दि.६ जून रोजी लोकार्पण करण्यात आले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते हे लोकार्पण संपन्न झाले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग (एस.व्ही. रोड) यांदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुकर होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास उपमहापौर संजय घाडी, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर, आमदार हारून खान तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.(Mrunaltai Gore Flyover)
सुमारे ७५० मीटर लांबीचा आणि चार पदरी असलेला हा विस्तारित उड्डाणपूल राम मंदिर आणि गोरेगाव परिसराला थेट जोडतो. उड्डाणपुलाचा रेल्वेवरील मुख्य भाग २०१६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्त्यांचे काम, तांत्रिक बदल आणि विविध प्रशासकीय प्रक्रियांमुळे विस्तारित भागाच्या पूर्णत्वास विलंब झाला. या उड्डाणपुलामुळे ओशिवरा आणि गोरेगावदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एस.व्ही. रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अंधेरी, जोगेश्वरी आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारा प्रवास अधिक वेगवान होणार असून पीक अवर्समधील प्रवासाचा वेळही कमी होण्याची अपेक्षा आहे.(Mrunaltai Gore Flyover)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.