...तर सुप्रिया सुळेंना असे विधेयक मांडण्याची आवश्यकता पडणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह

    06-Jun-2026   
Total Views |
devendra fadanvis
 
नवी मुंबई : (Devendra Fadnavis) माणसे पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात हे तुम्हाला समजले तर अशा प्रकारचे विधेयक मांडण्याची आवश्यकता पडणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
 
निवडणूकांमध्ये घोडेबाजार न होता त्या पारदर्शी व्हाव्या, यासाठी लोकसभेत विधेयक मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन व्हावे, यासंदर्भात कुणी विधेयक मांडणार असल्यास मला हरकत नाही. निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन व्हावे, असे माझेही मत आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्यासंदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून आम्ही नक्की हे नामकरण करून घेऊ." (Devendra Fadnavis)
 
 
 
बाळ मानेंसंदर्भात प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील
 
मुख्यमंत्री म्हणाले की, "बाळ माने यांच्यासंदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण निर्णय करतील. भाजपमध्ये अध्यक्षांचे निर्णय अंतिम असतात. बाळ माने हे आम्हाला परके नाहीत. ते भाजपमध्येच तयार झाले आहेत. काही कारणांमुळे ते पक्ष सोडून गेले. पण याबाबत मुख्यमंत्री निर्णय करत नाही. प्रदेशाध्यक्ष तो निर्णय करतात, त्यांच्या निर्णयाला माझा पाठींबा असेल." तसेच राज्यसभेच्या जागेबाबत माझ्याशी चर्चा झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चितपणे माझ्या कानावर टाकतील, असेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जगभरातील शिव भक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे. ज्यादिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केले तो आजचा दिवस आहे. या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांच्या २० फूट कांस्य पुतळ्याचे अनावरण नवी मुंबई विमानतळावर झाले आहे.
 
मागच्या काळात या विमानतळाच्या पाहणीला आलो असता स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील हे विमानतळ असल्याने इथे महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे, अशी सूचना मी दिली होती. केवळ ८ महिन्यांत हा भव्य पुतळा तयार झाला असून आम्ही त्याचे अनावरण केले. या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा-जाणारा प्रत्येक प्रवासी महाराजांच्या प्रतिमेतून, स्मारकातून ऊर्जा प्राप्त करेल. यासाठी मी अदानी एअरपोर्ट लि. आणि सिडकोचे मनापासून अभिनंदन करतो." (Devendra Fadnavis)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....