‘कॉर्पोरेट’आड ‘जिहादी अजेंडा’

    06-Jun-2026   
Total Views |


Corporate Agenda, Bollywood Controversy
 
आयटी’ आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून समोर येणार्‍या काही धक्कादायक प्रकरणांनी संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे. आधी नाशिकमधील नामांकित ‘टीसीएस’ कंपनीतून ‘कॉर्पोरेट जिहाद’चे धक्कादायक प्रकरण समोर आले आणि हा धक्का ओसरतो न ओसरतो, तोच पुण्यातून ‘विप्रो’ कंपनीशी संबंधित तशाच स्वरूपाचा प्रकार उघडकीस आला. एकापाठोपाठ एक, अत्यंत प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून जे प्रकार प्रकर्षाने समोर येत आहेत, याला नेमके काय म्हणावे? हा निव्वळ योगायोग की, कॉर्पोरेट संस्कृतीच्या मुखवट्याआड दडलेला एखादा पद्धतशीर ‘अजेंडा’?
 
ज्या ‘आयटी’ क्षेत्राकडे आपण प्रगती किंवा आधुनिकतेचे उत्तम उदाहरण म्हणून पाहतो, तिथेच जर विशिष्ट विचारसरणीचे लोक स्वतःचे गट तयार करून बहुसंख्याकांना लक्ष्य करत असतील, तर ही धोयाची घंटाच. नाशिक आणि पुण्यासारख्या शहरांतील मोठ्या कंपन्यांमध्ये जर अंतर्गत पातळीवर एखादा विशिष्ट अजेंडा राबवून इतर कर्मचार्‍यांना त्रास दिला जात असेल, त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात असेल, तर याला ‘कॉर्पोरेट संस्कृती’ कशी म्हणायची? कॉर्पोरेट-जगाचे नियम सर्वांसाठी सारखे असायला हवेत. पण, इथे ‘प्रोफेशनालिझम’चा बुरखा पांघरून अंतर्गत यंत्रणेचा ताबा मिळवायचा आणि मग हळूहळू आपल्या कट्टरतावादी विचारसरणीचा विस्तार करायचा, असा हा भयानक प्रकार. महाराष्ट्रातील आणि देशातील इतरही अनेक शहरांमध्ये असे प्रकार छुप्या पद्धतीने सुरू असण्याची दाट शयता नाकारता येत नाही. ज्या कंपन्या देशातील संसाधनांचा वापर करून मोठ्या झाल्या, तिथेच जर कर्मचार्‍यांना लक्ष्य केले जात असेल, तर हे अजिबात सहन केले जाणार नाही. कारण, आता ही केवळ एका किंवा दोन कंपन्यांची अंतर्गत बाब राहिलेली नाही, तर हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या पवित्रतेचाही प्रश्न आहे. या अशा प्रवृत्तींचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे. कॉर्पोरेट संस्कृतीच्या नावाखाली चालणारा हा ‘अजेंडा’ उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे. जागृत नागरिकांनी आणि कर्मचार्‍यांनीही आता अशा छुप्या कारवायांविरोधात आवाज उठवायला हवा. कारण, आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या आपलीच ‘आयटी’ आणि ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रे या कट्टरतेच्या विळख्यात अडकून पडतील!
 
दाऊदला मिरच्या झोंबल्या!
 
कालपर्यंत ज्या बॉलीवूडमध्ये एका विशिष्ट टोळीचा आणि ‘अंडरवर्ल्ड’च्या मर्जीचा हुकूम चालायचा, तिथे आता चित्र बदलू लागलेय. निमित्त ठरलेय ते म्हणजे, अभिनेता रणवीर सिंग याच्यावर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (एफडब्लूआयसीई)कडून अचानक घालण्यात आलेली आणि नंतर दबावामुळे तातडीने मागे घेण्यात आलेली बंदी! फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’मधून रणवीर बाहेर पडल्याच्या चर्चांनंतर ही बंदी घालण्यात आली होती. पण, नंतर घाईघाईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘एफडब्लूआयसीई’ला आपला निर्णय बदलावा लागला आणि बंदी मागे घ्यावी लागली. ही माघार म्हणजे केवळ एका संघटनेचा यू-टर्न नाही, तर हा ‘बॉलीवूड’च्या जुन्या व्यवस्थेला बसलेली मोठी चपराक आहे.
 
दाऊद आणि त्याच्या टोळीच्या दहशतीला रुपेरी पडद्यावर ‘ग्लॅमरस’ बनवण्याचे पाप याच बॉलीवूडने वर्षानुवर्षे केले. पण, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर १’ आणि ‘धुरंधर २’ने या खोट्या ग्लॅमरचा आणि बॉलीवूडच्या दुटप्पीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला. ‘धुरंधर’च्या अफाट यशामुळे हे सिद्ध झाले की, प्रेक्षकांना आता दाऊदच्या ‘डी-गँग’चे कौतुक करणारी ‘अंडरवर्ल्डची हस्तक’ असणारी व्यवस्था नकोय. मुंबईत पुन्हा एकदा ‘डी-गँग’च्या संशयास्पद हालचाली वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रश्न असा पडतो की, एकेकाळी बॉलीवूडवर हुकूमत गाजवणार्‍या दाऊद इब्राहिमला ‘धुरंधर’च्या यशामुळे मिरच्या झोंबायला लागल्या आहेत का? जेव्हा-जेव्हा बॉलीवूडमध्ये राष्ट्रवाद, सत्य आणि ‘अंडरवर्ल्ड’च्या विरोधात उघडपणे बोलणारा सिनेमा येतो आणि त्याला प्रेक्षक डोयावर घेतात, तेव्हा थेट पाकिस्तानात बसलेल्या ‘आका’च्या पोटात गोळा येतो. ‘धुरंधर’ने थेट ‘अंडरवर्ल्ड’च्या काळ्या साम्राज्यावर आणि त्यांच्या बॉलीवूडमधील दलालांवर अचूक निशाणा साधला. त्यामुळेच मुंबईत अचानक ‘डी-गँग’चे हस्तक सक्रिय होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जेव्हा तुम्ही ‘सिस्टम’ला आव्हान देता, तेव्हा ‘सिस्टम’ तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करते. हा थेट इशारा आहे त्या प्रत्येकाला, जो अजूनही ‘अंडरवर्ल्ड’च्या तालावर बॉलीवूडला नाचवू पाहत आहे. ‘अंडरवर्ल्ड’चा बुरखा फाटला असून, तो पुन्हा शिवण्याची ताकद आता कोणामध्येच उरलेली नाही.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक