मुंबई: (Vinayak Raut) विनायक राऊत यांनी कोकणात शिवसेनेची वाट लावण्याचे काम केले. ते कोकणात बसून उद्धव ठाकरे यांना फसवत आहेत, असा गंभीर आरोप बाळ माने यांनी केला आहे. बाळ माने यांनी विधानपरिषद निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर त्यांची उबाठा गटातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर माने आणि राऊत या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळ माने म्हणाले की, “आमच्याकडे संख्याबळ नव्हते. तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येही एकवाक्यता नसल्याने माझ्याकडे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ५५ मतदार होते. या ५५ मतदारांच्या जीवावर मी निवडणूक जिंकू शकत नव्हतो. त्यामुळे वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना मी याबद्दल कल्पना दिली होती. या सगळ्यानंतर संजय राऊत यांनी माझी हकालपट्टी केल्याचे वक्तव्य केले.
त्यानंतरही विनायक राऊत यांनी पुन्हा तेच सांगितले पण कशासाठी? एखाद्या डोमकावळ्याप्रमाणे विनायक राऊत काल टीव्हीवर आले. २०१४ साली ते आमच्यामुळे पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी शिंदेसेनेची सुपारी घेतली आहे. विनायक राऊत शिंदेसेनेचे भाट आहेत. त्यांना बाळ माने कोकणात नको आहे.”
बाळ माने यांना भाजपमधील प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. जवळपास १८ ते १९ महिने मी उद्धव ठाकरेंसोबत होतो. याकाळात सर्वांनी मला प्रेम दिले. मी ते कधीही विसरू शकणार नाही. मी त्यांच्याशी गद्दारी केली नाही. पुढचा विषय ‘वेट अँड वॉच’चा आहे. कोकणाच्या हितासाठी मी काम करेन. सत्ता पक्षात राहून अनेक प्रश्न सुटतात. देवेंद्र फडणवीस हे ४० वर्षांपासून माझे जवळचे मित्र आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत.”(Vinayak Raut)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....