भायखळा प्राणीसंग्रहालयातील रिकाम्या हत्ती बाड्यात दुर्मीळ वन्यजीव आणण्याची अमित साटम यांची मागणी

    05-Jun-2026
Total Views |
Veermata Jijabai Bhosale Udyan
 
मुंबई : (Veermata Jijabai Bhosale Udyan) भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील रिकाम्या पडलेल्या हत्ती बाड्याचा उपयोग ईशान्य भारतातील दुर्मीळ वन्यजीव प्रजातींसाठी करण्याची मागणी केली आहे.
 
तसेच, प्राणीसंग्रहालयातील अत्याधुनिक 3D थिएटरचा वन्यजीव आणि पर्यावरणविषयक शैक्षणिक चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी अधिक प्रभावीपणे वापर करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.
 
महापौर रितू तावडे, मनपा आयुक्त अश्विनी भिडे आणि प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांना पाठविलेल्या पत्रात अमित साटम यांनी नमूद केले आहे की, मुंबईतील या ऐतिहासिक प्राणीसंग्रहालयाचे आकर्षण वाढविण्यासाठी नवीन आणि दुर्मीळ प्राण्यांच्या प्रजातींचा समावेश करण्यात यावा.
 
त्यांनी सांगितले की, हत्तींसाठी तयार करण्यात आलेले बाडे सध्या रिकामे असून त्याचा कोणताही उपयोग होत नाही. या जागेचा ईशान्य भारताच्या थीमवर आधारित वन्यजीव विभाग म्हणून विकास करता येऊ शकतो. येथे बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरॉंग यांसारख्या दुर्मीळ प्रजाती ठेवता येतील. या प्रकल्पाचा प्रस्ताव प्राधान्याने मुंबई महापालिकेकडे पाठवावा, अशी विनंती त्यांनी प्राणीसंग्रहालय प्रशासनाला केली आहे.(Veermata Jijabai Bhosale Udyan)
 
 
 
अमित साटम यांनी प्राणीसंग्रहालयातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 3D थिएटरच्या मर्यादित वापराबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ आणि ‘नॅशनल जिओग्राफिक’ यांसारख्या प्रतिष्ठित वाहिन्यांच्या सहकार्याने वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीवर आधारित शैक्षणिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे विद्यार्थी आणि युवा पर्यटकांना निसर्ग, जैवविविधता आणि वन्यजीव संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल. तसेच वन्यजीव विषयक चित्रपट, शैक्षणिक प्रदर्शने आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित कार्यक्रमांसाठी 3D थिएटरचा वापर केल्यास जनजागृती वाढविण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
 
या विशेष चित्रपट प्रदर्शनांसाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क आकारण्याचाही त्यांनी प्रस्ताव मांडला. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाला अतिरिक्त महसूल मिळेल आणि विविध सुविधांचे अधिक चांगल्या पद्धतीने संचालन करता येईल.
 
या उपक्रमांमुळे भायखळा प्राणीसंग्रहालयाची लोकप्रियता वाढेल, पर्यटकांना नवा अनुभव मिळेल आणि वन्यजीव संवर्धनाबाबत जनतेमध्ये जागरूकता अधिक दृढ होईल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला.(Veermata Jijabai Bhosale Udyan)