ज्या पद्धतीने आदि शंकराचार्य यांनी आठव्या शतकात भारतीय ज्ञान व संस्कृतीच्या उत्थानासाठी एकात्मतेचा मंत्र घेऊन भारतभ्रमण केले आणि चारही दिशांना सनातन धर्म, ज्ञान व परंपरांची स्थापना करून भारताच्या आध्यात्मिक परंपरांचे पुनरुज्जीवन केले, संपूर्ण भारताला एका आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सूत्रात बांधले, त्याचप्रमाणे २०व्या शतकात परमपूजनीय गोळवलकर गुरुजींनी शेकडो वर्षांचे मुस्लीम आक्रमण आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व करीत भारताच्या कानाकोपर्यात पोहोचून सुप्त हिंदू समाजाला जागृत करण्यात मोलाचे योगदान दिले. आज पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रऋषी श्रीगुरुजींच्या विचारांचे स्मरण करणारा हा लेख...
दि. १९ फेब्रुवारी १९०६ रोजी रामटेक येथे जन्म झालेल्या पू. गुरुजींचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ‘बनारस हिंदू विश्वविद्यालया’त प्रवेश घेतला. अभ्यासाबरोबरच विविध संस्कृत महाकाव्ये, पाश्चात्त्य विचार, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची ग्रंथसंपदा, तसेच विविध उपासना पद्धतींचेही अध्ययन-चिंतन केले. यादरम्यान, वाराणसी येथे एका कार्यक्रमात प. पू. डॉटर हेडगेवार यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि प्रथम भेटीतच श्रीगुरुजी पू. डॉक्टरांच्या विचाराने प्रभावित झाले. कालांतराने सन १९३१ मध्ये पू. गुरुजी अध्यापनासाठी ‘बनारस हिंदू विश्वविद्यालया’त आले. यावेळी त्यांचा संपर्क तेथे शिक्षण घेत असलेल्या मा. भैय्याजी दाणी यांच्यासोबत आला.
सन १९३६ मध्ये काहीकाळ अध्यात्माच्या शोधात असताना श्रीगुरुजी बंगालमधील सारगाछी येथील ‘रामकृष्ण मिशन’च्या आश्रमात राहिले होते. तेथे रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि स्वामी विवेकानंद यांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंद यांच्या सान्निध्यात राहून पू. गुरुजींनी त्यांची मनोभावे सेवा केली. त्यांची नि:स्वार्थ सेवा व समर्पणवृत्ती पाहून स्वामी अखंडानंद प्रसन्न झाले आणि त्यांनी श्रीगुरुजींना ‘संन्यास दीक्षा’ दिली. मात्र, हिमालय किंवा इतरत्र तपश्चर्या, साधना करण्यापेक्षा दरिद्री व पीडित लोकांची सेवा हीच खरी ईश्वरभक्ती (उपासना) आहे, असा उपदेश करून ‘राष्ट्र देवो भवः’ हा मंत्र जपण्याचा सल्ला दिला. (पू. गुरुजींबद्दल, ‘तो येथे आश्रमात राहणार नसून, त्याच्यासाठी एक कार्य वाट पाहात आहे,’ असे उद्गार स्वामी अखंडानंद यांनी पू. गुरुजींचे गुरुबंधू श्री अमिताभ महाराज यांचे समक्ष काढले होते.) सन १९३७ मध्ये स्वामी अखंडानंदांचे महानिर्वाण झाल्यावर श्रीगुरुजी नागपूरला परतले आणि पुन्हा पू. डॉक्टरांच्या सान्निध्यात आले. पू. डॉटरांचा राष्ट्रकार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यांच्या प्रभावामुळे श्रीगुरुजींनी प्रापंचिक मोह-मायेपासून दूर राहून आपले सर्वस्व आजीवन रा. स्व. संघाच्या कार्याला समर्पित केले. संघसमर्पित जीवन जगण्याचा निर्णय घेताना स्वामी अखंडानंदांनी त्यांना केलेला उपदेशही निर्णायक ठरला.
डॉ. हेडगेवार यांचे प्रेरणादायक व राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्त्व पाहून, "मेरा रुझान राष्ट्र के संगठन कार्य की ओर प्रारंभ से हैं| यह कार्य संघ में रहकर अधिक प्रामाणिकता से मैं कर सकूंगा, ऐसा मेरा विश्वास हैं| इसलिए मैं संघकार्य में ही स्वयं को समर्पित कर रहा हूं| मुझे लगता हैं स्वामी विवेकानंद के तत्त्वज्ञान और कार्यपद्धती से मेरा यह आचरण सर्वथा सुसंगत हैं॥” असे विचार त्यांनी व्यक्त केले होते.
परमपूजनीय डॉक्टरजींच्या दु:खद निधनानंतर सन १९४० मध्ये संघाची सर्व सूत्रे सरसंघचालक या नात्याने श्रीगुरुजींकडे आली. त्यावेळी देशातील परिस्थिती अतिशय गंभीर होती. दि. १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लीम समाजाला ‘डायरेट अॅशन’चा आदेश मिळाल्यावर, देशभरात हिंदूंच्या हत्येचे भीषण तांडव सुरू झाले होते. मुस्लीम तुष्टीकरणामुळे काँग्रेसने आपले अखंड हिंदुस्थानचे स्वप्न सोडून दिले. परंतु, श्रीगुरुजी ठामपणे देशाच्या विभाजनाविरुद्ध उभे राहण्यासाठी समाजाला आवाहन करीत होते. दि. ३ जून १९४७ रोजी पं. नेहरू यांनी देशाच्या विभाजनाचा प्रस्ताव स्वीकारल्याची घोषणा केली. अशा वेळी पाकिस्तानच्या भागातून हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी संघाने प्रयत्न सुरू केले. तेथील शेवटचा हिंदू जोपर्यंत भारतात येत नाही, तोपर्यंत तेथे कार्यरत राहण्याचा आदेश श्रीगुरुजींनी संघकार्यकर्त्यांना दिला होता. श्रीगुरुजींनी तत्कालीन कठीण परिस्थितीत त्या भागात हजर राहून कार्यकर्त्यांना प्रेरित केले होते. त्या भीषण परिस्थितीमध्ये संघस्वयंसेवकांचा अतुलनीय पराक्रम, त्याग, धाडस आणि बलिदानाची गाथा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगी आहे.
देशाच्या विभाजनानंतर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन काश्मीर नरेश हरिसिंह यासाठी तयार नव्हते. त्यावेळी श्रीगुरुजींनी हरिसिंह यांची भेट घेऊन त्यांना भारतात विलीनीकरणासाठी राजी केले आणि काश्मीरच्या भारतामधील विलीनीकरणामध्ये अमूल्य योगदान दिले.
१९४० ते १९७३ अशी ३३ वर्षे श्रीगुरुजींनी संघाचे सरसंघचालकपद भूषविले. ही ३३ वर्षे संघाच्या, तसेच देशाच्या जीवनातील एक महत्त्वाचा काळ ठरली. १९४२चे ‘भारत छोडो’ आंदोलन, १९४७ मधील भारताची फाळणी आणि विभाजित भारताचे राजकीय स्वातंत्र्य, फाळणीपूर्वी आणि नंतर झालेला भीषण रक्तपात, भारतात हिंदू निर्वासितांचा प्रचंड ओघ, पाकिस्तानचे काश्मीरवरील आक्रमण, दि. ३० जानेवारी १९४८ रोजीची गांधीहत्या, त्यानंतरची संघाविरुद्धची द्वेषपूर्ण मोहीम, संघाविरुद्ध झालेला हिंसाचार आणि संघावरील बंदी, भारतीय संविधानाची निर्मिती आणि भारतीय शासनाच्या स्वरूपाची व धोरणांची निश्चिती, भाषावार प्रांतरचना, १९६२ मध्ये चीनने भारतावर केलेले आक्रमण, पं. नेहरूंचे निधन, १९६५चे भारत-पाक युद्ध, १९७१चे दुसरे भारत-पाक युद्ध आणि बांगलादेशाची निर्मिती अशा अनेक घटनांमुळे देशामध्ये प्रचंड राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक उलथापालथ झाली. याच महत्त्वाच्या काळात पू. गुरुजींनी केवळ संघविचारांचा आणि संघटनेचा विकास केला असे नाही; तर राष्ट्रनिर्माणाच्या प्रत्येक पैलूमध्ये योग्य विचारांचे दिशादर्शनही केले.
पू. डॉक्टरांनी संघाची विचारधारा संक्षिप्त स्वरूपात मांडली होती. श्रीगुरुजींनी या विचारधारेचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले. संघाची विचारप्रणाली सूत्ररूपाने समाजासमोर मांडण्याबरोबरच राष्ट्रजीवनाच्या विविध अंगांबाबत त्यांनी मूलभूत व क्रियाशील मार्गदर्शन केले. सखोल अभ्यास, गहन चिंतन, स्वसाधनेमुळे आणि गुरूंच्या कृपेमुळे साधलेली आध्यात्मिक उन्नती, मातृभूमीप्रति नि:स्वार्थ भक्ती, लोकांप्रति अथांग प्रेम, उत्कृष्ट स्मरणशक्ती, माणसांची मने जिंकण्याची अतुलनीय क्षमता अशा अनेक गुणांमुळे त्यांना केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना सर्वत्र मजबूत करता आली नाही; तर देशाला प्रत्येक क्षेत्रात परिपक्व बौद्धिक मार्गदर्शनही करता आले. भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्राचे भवितव्य आणि आधुनिक काळात राष्ट्राच्या पुनरुज्जीवनासाठी योग्य दिशा, यावरील त्यांचे मूलभूत आणि विधायक विचार आता देशाचा महान बौद्धिक वारसा बनले आहेत.
पू. गुरुजींना राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील आदर्श परिस्थितीची स्पष्ट दृष्टी होती. ‘जोपर्यंत राष्ट्रजीवनातील प्रत्येक पैलू संघाच्या शुद्ध व प्रेरणादायी विचाराने प्रेरित होत नाही, तोपर्यंत भारत आपले उज्ज्वल भवितव्य साकारण्याइतका सामर्थ्यवान होऊ शकत नाही,’ या दृढ श्रद्धेने त्यांनी अनेक कार्यक्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी विविध संस्था-संघटनांच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेतला. हिंदू समाजातील विविध पंथ, संप्रदाय एकत्र आणण्यासाठी व हिंदू धर्माच्या जागृतीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका श्रीगुरुजींनी बजावली. शिक्षण क्षेत्रात व विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय संस्कार रुजविण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांच्या समस्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.
वनवासी-आदिवासी बांधवांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी आणि त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी ‘भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना झाली. ग्रामीण विकास, तसेच शेतकर्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘भारतीय किसान संघा’ची निर्मिती झाली. शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयता आणि भारतीय संस्कार रुजविण्यासाठी त्यांनी देशभरात ‘विद्या भारती’च्या शाळा उभ्या करण्यासाठी प्रेरणा दिली. संघाची विचारधारा राष्ट्रीय स्तरावर राजकीय भूमिकेतून पुढे नेण्यासाठी ‘भारतीय जनसंघा’च्या निर्मितीमध्ये त्यांनी प्रेरणा दिली. हिंदुत्व व हिंदू राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद, भारताची एकात्मता, एकात्म मानवदर्शन असे मुख्य उद्देश ‘जनसंघा’च्या स्थापनेत होते. कामगारांच्या हितासोबतच देशाचा विकास व औद्योगिकीकरण यांना सर्वोच्च प्राधान्य देणे, शोषित, वंचित व असंघटित कामगारांना न्याय व योग्य मोबदला मिळवून देणे, तसेच त्यांना केवळ हक्काचीच नव्हे; तर देशाप्रति-उद्योगाप्रति असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देणे, या उद्देशातून ‘भारतीय मजदूर संघा’ची स्थापना करण्यात आली. ‘राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित’ या त्रिसूत्रीवर ही संघटना कार्यरत आहे.
या सर्व संस्था-संघटनांनी समाजात राष्ट्रवाद, सेवाभाव, संस्कृतीसंवर्धन आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती रुजविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्यक्तींमध्ये सेवाभाव, त्याग, सत्य, बंधुभाव यांसारखी मानवी मूल्ये विकसित करण्याबरोबरच भावी पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची व संस्कृतीची ओळख करून देण्याचे काम या संस्था-संघटना करीत आहेत. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या काळात याच संघटना त्वरित मदतकार्यासाठी पुढे येतात. वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन राष्ट्रहित आणि समाजकल्याण हेच या सर्व संघप्रेरित संस्था-संघटनांचे अंतिम ध्येय असल्याचे समाजाने अनुभवले आहे. अशा संस्था-संघटनांच्या निर्मितीमागील पू. गुरुजींचे द्रष्टेपणच यानिमित्ताने दिसून येते.
पू. गुरुजींनी उचित क्षात्रधर्माचे स्मरण करून देताना पाकिस्तानने आपल्यावर वारंवार केलेली आक्रमणे पाहून एक ठोस धडा घेतला पाहिजे, असे म्हटले होते. आपल्या मनात कोणत्याही प्रादेशिक महत्त्वाकांक्षा नाहीत. परंतु, भविष्यात आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याची पाकिस्तानची क्षमता कायमची संपुष्टात आणण्यासाठी, ‘पूर्णपणे पराभव करून संपूर्ण विजय’ हेच आपले ध्येय असले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या मार्गदर्शनाचे- अग्नी-शेष, रोग-शेष, ऋण-शेष आणि शत्रू-शेष (अग्नी, रोग, कर्ज आणि शत्रू यांचे अवशेष) टिकू देऊ नयेत, याचे स्मरण करून देताना पू. गुरुजी पुढे म्हणतात की, "त्यांचे अगदी लहानसे अवशेषही नष्ट केले पाहिजेत, अन्यथा कालांतराने ती उरलेली ठिणगी भविष्यात सर्वभक्षी अग्नीत बदलू शकते.” या इशार्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच भूतकाळातील अनेक शूर राजे-सेनानी क्षात्रधर्माच्या चुकीच्या कल्पनांना बळी पडले आणि त्याचेच दुष्परिणाम भारतीय जनतेला पिढ्यान्पिढ्या भोगावे लागत असल्याचा आपला अनुभव आहे.
पू. गुरुजींनी केवळ सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांचे प्रतिपादन केले असे नाही, तर हजारो कार्यकर्त्यांना त्यानुसार जगण्याची प्रेरणा दिली. विरोधी प्रचारामुळे पू. गुरुजी कधीही विचलित झाले नाहीत किंवा द्वेषाने त्यांचे मन कधीही कलुषित झाले नाही. त्यांनी त्या-त्या वेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच जे पूर्वी चुकीच्या विचारांच्या प्रभावाखाली किंवा राष्ट्रविरोधी होते, त्यांचा भ्रमनिरास होऊन आता तेच संघाच्या विचारसरणीकडे वळत आहेत. शासकीय स्तरावर संघावर केलेले आरोपही खोटे व निराधार सिद्ध झालेच. शिवाय, संघाला बदनाम करण्याच्या उद्देशाने स्वार्थी राजकारण्यांकडून चालविल्या जाणार्या हेतुपुरस्सर विरोधी प्रचाराची धारही आता झपाट्याने ओसरताना दिसते. उलट, हा राष्ट्रविरोधी प्रचार करणार्यांनीच समाजाच्या मनातील विश्वासार्हता गमावल्याचे चित्र आहे.
व्यक्ती हा सर्व प्रकारच्या कृतींचा किंवा परिवर्तनाचा केंद्रबिंदू असतो. जर व्यक्तीमध्ये गुणवत्ता नसेल, तर एखादी चांगली योजना किंवा चांगली व्यवस्थादेखील निष्फळ ठरू शकते. राष्ट्राची प्रतिष्ठा तेथील लोकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.केवळ सरकार बदलल्याने ही गुणवत्ता निर्माण होत नाही. त्यामुळे सतत चारित्र्यनिर्मिती सुनिश्चित करणार्या व्यवस्थेला म्हणजेच, संघशाखेला पर्याय नाही, या तत्त्वावर पू. गुरुजींनी भर दिला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती एक अभिनव कार्य असून, त्यासाठी घडवलेली दैनंदिन शाखा ही कार्यपद्धतीही अप्रतिम व अलौकिक आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या स्तरांवर काम करणार्या कार्यकर्त्यांनी शाखा मजबूत आणि प्रभावी होण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असा पू. गुरुजींचा आग्रह असे. त्यांनी ‘राष्ट्राय स्वाहा, इदं न मम’ हा नि:स्वार्थ आणि राष्ट्रभक्तीची भावना दर्शविणारा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. यात माझे किंवा स्वार्थ या भावनेचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन, कार्य आणि विचार देशासाठी समर्पित करण्याची शिकवण दिली. संघकामाचा विस्तार करताना ‘मैं नही, तू ही’ (Not me, but you) असा संदेशही कार्यकर्त्यांना दिला. मी पणा किंवा अहंकार बाजूला सारून समाज, देश आणि आपले ध्येय याला सर्वोच्च स्थान देणे, हेच यामागील प्रमुख सूत्र होते. यामधून प्रेरणा घेऊन देशभरातील हजारो कार्यकर्त्यांनी वैयक्तिक स्वार्थ, प्रसिद्धी आणि मीपणा बाजूला ठेवून नि:स्वार्थपणे कार्य केले आणि आपले संपूर्ण जीवन संघटनेसाठी आणि राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले.
आपल्या देशातील अतिसामान्य नागरिकसुद्धा इतर देशातील सामान्य नागरिकापेक्षा संस्कार, सभ्यता आणि संस्कृती याबाबतीत अधिक श्रेष्ठ होता. याचे कारण, तत्कालीन समाजधुरिणांनी अथक परिश्रमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या सांस्कृतिक संस्कारांना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले होते. सर्व वर्गांमधून आपणांस शेकडो व्यक्ती, साधू-संत, महात्मे पाहायला मिळतात, ज्यांच्या विचारांनी व कृतीने आपल्या समाजाला आजतागायत प्रेरणा दिली आहे. सद्यस्थितीत हेच काम संघकार्यकर्त्यांना करायचे असल्याचे पू. गुरुजींनी सांगितले आहे.
पू. गुरुजींनी संघाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट करून भारताच्या राष्ट्रीय जीवनात संघाला अग्रगण्य स्थान मिळवून दिले. ते केवळ संघस्वयंसेवकांसाठीच नव्हे; तर विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्ती व संस्थांसाठी प्रेरणास्रोत ठरले. हिंदू समाज व हिंदुराष्ट्राशी संबंधित अनेक विषयांवरील त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत. श्रीगुरुजींच्या 'Bunch of thoughts' या मूळ इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर ‘विचारधन’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे पुस्तक म्हणजे श्रीगुरुजींच्या विविध विषयांवरील विचारांचे, व्याख्यानांचे आणि पत्रांचे संकलन आहे. या पुस्तकात हिंदू धर्म, भारतीय संस्कृतीचे महत्त्व, राष्ट्रभक्ती, धर्म आणि व्यक्तिनिर्माण, समाजसंघटन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता या विषयांवरील त्यांचे मौलिक विचार मांडले आहेत. पू. गुरुजींनी आपल्या ऋषितुल्य व तपस्वी जीवनाने संघकार्याला आणि संघ-तत्त्वज्ञानाला व्यापक राष्ट्रीय स्वरूप देण्याचे महान कार्य केले. म्हणूनच, कै. अटलजींनी त्यांचा ‘राष्ट्रऋषी’ अशा समर्पक शब्दात गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
आज आपल्या देशात विघटनकारी शक्ती कार्यरत आहेत आणि परकीय शक्ती या अशांत परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी दबा धरून बसल्या आहेत. परकीय आणि राष्ट्रविरोधी शक्तींना हे पक्के माहीत आहे की, हिंदूंना विभाजित करूनच ते या देशात आपले वर्चस्व ठेवू शकतात. समाजाला एकजूट करण्यात आणि तीव्र देशभक्तीची भावना जागृत करण्यात आपण अद्यापही अपेक्षित प्रमाणात यशस्वी झालेलो नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या जबाबदारीबद्दल अधिक जागरूक राहावे लागेल. आपल्या कामाच्या सर्व पैलूंवर विचार करावा लागेल आणि नजीकच्या भविष्यात कोणत्याही परिस्थितीत ‘परम वैभवम्’ हे ध्येय गाठण्याच्या दृढनिश्चयाने कामाला लागावे लागेल.
भारताच्या सर्व आव्हानांवर पू. गुरुजींचे एकच उत्तर होते. ते म्हणजे- जर सर्व हिंदू त्यांचे राजकीय किंवा इतर पंथ कोणतेही असोत, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून मणिपूरपर्यंत एक राष्ट्रीय शक्ती म्हणून एकजुटीने, खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा निर्णय घेतील; तर या देशातील इतर सर्वजणही मातृभूमीचा आणि राष्ट्रीय शक्तीचा आदर करायला शिकतील. आपली श्रद्धा अबाधित ठेवून ते या महान राष्ट्राचे उपयुक्त सदस्य बनू शकतील. त्यांच्या या विचारांचे ‘पाथेय’ सध्याच्या खडतर सामाजिक परिस्थितीत कार्य करण्यास मार्गदर्शक ठरते, आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. शिवाय, संकटकाळात सकारात्मक राहण्यासाठी आंतरिक बळ आणि प्रेरणा देते. अर्थात, यासाठी आवश्यकता आहे, एकजुटीने प्रयत्न करण्याची. ‘मैं नही तू ही यह जप कर, जिसने की मां की परिचर्या| उस माधव के अनुचर हम नित, काम करें अविराम चलें॥’ असा निश्चय करण्याची. आज, पू. गुरुजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून- ‘हिंदुभूमी सुतोत्तम होऊ, ध्येयव्रती वीरोत्तम होऊ, मातृभूमीच्या कल्याणास्तव कर्ममयी पुरुषोत्तम होऊ’ असा संकल्प करून कार्यरत राहूया!
- प्रकाश बापट