बेस्टच्या पुनर्विकासात नागरिक, कर्मचारी आणि मुंबईच्या भविष्यास प्राधान्य द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
05-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Transport System) बेस्ट उपक्रमाच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी तयार करण्यात येत असलेल्या मास्टर प्लॅनमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि मुंबईच्या दीर्घकालीन विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. डेपो विकास, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, सार्वजनिक सुविधांची उभारणी आणि आर्थिक स्वावलंबन यांचा विचार करून पारदर्शक व दूरदृष्टीपूर्ण आराखडा तयार करून शासनास सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत बेस्टच्या विविध बस डेपोच्या आधुनिकीकरण व पुनर्विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस मंत्री आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, महापौर ऋतु तावडे, उपमहापौर संजय घाडी, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, बेस्ट ही केवळ परिवहन संस्था नसून मुंबईची जीवनवाहिनी आहे. तिचे भविष्य सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय आवश्यक आहे. बेस्ट डेपोचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात यावा आणि भविष्यात बससंख्या वाढविण्याच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
बेस्टची जमीन विकली जाणार नाही
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, बेस्टची कोणतीही जमीन विकली जाणार नाही. सर्व प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित केले जातील. जमीन व मालमत्तेची मालकी बेस्टकडेच राहील आणि विकासकामे दीर्घकालीन भाडेपट्टा (लीज) तत्त्वावर राबविली जातील. प्रत्येक डेपोकडे केवळ व्यावसायिक प्रकल्प म्हणून पाहू नये. तेथे संग्रहालये, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे आणि इतर सामाजिक सुविधा विकसित करून नागरिकांनाही त्याचा लाभ मिळेल, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
काही निवडक डेपोमध्ये ३०० ते ४०० आसनक्षमतेची मराठी चित्रपटांसाठी समर्पित चित्रपटगृहे उभारण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना सवलतीच्या दरात स्क्रीन उपलब्ध करून देता येतील.
कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक निवासस्थाने आणि सुविधा
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी आधुनिक निवासी संकुलांच्या उभारणीवर फडणवीस यांनी भर दिला.
‘विकसित भारत २०४७’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ‘मुंबई २०४७’चा आराखडा तयार करावा, असे त्यांनी सांगितले. यासाठी पुढील २२ वर्षांतील गरजा, बससंख्या, कर्मचारी आवश्यकता, उत्पन्न व खर्च यांचा सखोल अभ्यास करून दीर्घकालीन आर्थिक नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले.(Mumbai Transport System)
मुंबईच्या प्रवेशद्वारांवर उभारले जाणार ट्रान्सपोर्ट हब
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या सीमेवरील जुन्या जकात नाक्यांचे आधुनिक ट्रान्सपोर्ट हबमध्ये रूपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दहिसर, मानखुर्द, मुलुंड येथील आनंदनगर, एलबीएस रोड आणि ऐरोली नाका परिसरात बस पार्किंग व प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. बाहेरील भागांतून येणाऱ्या बसांना शहराबाहेरच पार्किंग व ट्रान्झिट सुविधा उपलब्ध करून दिल्यास मुंबईतील खासगी बसांची वर्दळ कमी होईल आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले.
२२ बस डेपोचे होणार अत्याधुनिक पुनर्विकास
बैठकीत बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांनी १३२ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या २२ बस डेपोच्या पुनर्विकासाचे सादरीकरण केले. सिंगापूर, पॅरिस, हाँगकाँग आणि लंडन येथील आधुनिक बस डेपोच्या धर्तीवर मुंबईतील डेपो विकसित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर’ (DBFOT) मॉडेलअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत ७,००० नव्या बसांची व्यवस्था, स्मार्ट ईव्ही चार्जिंग केंद्रे, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, व्यावसायिक संकुले, किरकोळ विक्री केंद्रे, अर्बन प्लाझा, कला दालने आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहनतळ उभारण्याचा समावेश आहे. प्रकल्पासाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करून कामे जलदगतीने आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व संबंधित विभागांना दिले. यामुळे बेस्टचे पुनरुज्जीवन वेळेत पूर्ण होऊन मुंबईला जागतिक दर्जाची सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Mumbai Transport System)