मालाडमध्ये बेस्ट बसची ओला कारला जोरदार धडक; कार स्वच्छ करत असलेल्या चालकाचा जागीच मृत्यू
05-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Best Bus Crash) मालाड पूर्व येथील पुष्पा पार्क परिसरात आज, गुरुवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात बेस्टच्या बसने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 'ओला' कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कार साफ करत असलेला ओला चालक बसखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त बस 'मातेश्वरी ट्रान्सपोर्ट' या खासगी कंत्राटदाराची असून, ती वडाळा आगाराची असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वडाळा आगाराची बस क्रमांक ८१८४, मार्ग क्रमांक ४४० गुरुवारी सकाळी ६:५० वाजण्याच्या सुमारास आपली फेरी पूर्ण करून आगाराकडे परतत होती. मालाड येथील पुष्पा पार्कजवळ आली असता, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या ओला कारला पाठीमागून भीषण धडक दिली. अपघात घडला त्या वेळी ओला कारचा चालक गाडीच्या बाहेर उभा राहून कार साफ करत होता. बसने कारसह चालकालाही जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच बेस्ट प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. घटनास्थळाच्या जवळ असलेल्या दिंडोशी आगाराच्या व्यवस्थापकांना आणि अपघात तपासणी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले.
गेल्या काही दिवसांत बेस्टच्या ओल्या भाडेतत्त्वावरील कंत्राटी बसेसच्या अपघातांचे सत्र वाढले असून, या अपघातामुळे कंत्राटी चालकांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, बस चालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Mumbai Best Bus Crash)