बेस्ट बस सुरक्षेसाठी कडक धोरण; कंत्राटी चालकांना अनिवार्य प्रशिक्षण, ११ बसेस सेवेतून बाहेर

    05-Jun-2026
Total Views |
Mumbai BEST
 
मुंबई : (Mumbai BEST) मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' बसेसचे अपघात, तांत्रिक बिघाड आणि आगीच्या वाढत्या घटनांमुळे बेस्ट प्रशासन अखेर जागे झाले आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये ओल्या भाडेतत्त्वावरील (वेट लीज) बसेसचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने खाजगी कंत्राटदारांविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आता सर्व कंत्राटी चालकांसाठी ४ आठवड्यांचे तांत्रिक व सुरक्षा प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांना प्रति उल्लंघन १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे.
 
​मे महिन्यातच बेस्ट बसेसचे तब्बल १० अपघात आणि आगीच्या विविध घटना समोर आल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी कंत्राटदारांचा विरोध डावलून चालकांसाठीचे ४ आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारकच राहील, असे स्पष्ट केले आहे. या प्रशिक्षणामध्ये सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेसचे सुरक्षित संचालन, तांत्रिक ज्ञान आणि शिस्तीचा समावेश असणार आहे.
वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेस्ट आणि खाजगी कंत्राटदारांमार्फत मुंबईतील सर्व २७ बस डेपोंमध्ये संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान तांत्रिक बिघाड आणि त्रुटी आढळलेल्या खाजगी कंत्राटदारांच्या ११ बसेस तात्काळ रस्त्यावरून हटवण्यात आल्या आहेत.(Mumbai BEST)
 
 
बेस्टच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत बेस्ट अपघातांमध्ये एकूण ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २०२४-२५ मध्ये २४ (५ बेस्टच्या मालकीच्या आणि १९ कंत्राटी), तर २०२५-२६ मध्ये २४ (३ बेस्टच्या मालकीच्या आणि २१ कंत्राटी) मृत्यूंची नोंद झाली आहे. यावरून कंत्राटी बसेसच्या देखभालीतील आणि चालकांच्या निष्काळजीपणाचा मोठा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
नुकत्याच झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी चालकांच्या अकार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौर रितू तावडे यांच्या दौऱ्यादरम्यान बस बंद पडली आणि ड्रायव्हरला ती सुरू करता येत नसल्याने कर्मचाऱ्यांना बसला धक्का मारावा लागला, ज्यामुळे बेस्टच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. तर समिती सदस्य अजय सिंग यांनी या वाढत्या आगीच्या घटना म्हणजे कंत्राटदारांचा ढिसाळ कारभार आणि निष्काळजीपणाचा कळस असल्याचे सांगत संपूर्ण व्यवस्थेच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रतिक्षा नगर आगारात आयपीएल सामना पाहून आलेल्या शाळकरी मुलांना सोडल्यानंतर दोन बसेस जळून खाक झाल्याची घटनाही त्यांनी निदर्शनास आणून दिली.(Mumbai BEST)
 
​गेल्या महिनाभरातील काही प्रमुख घटना:
 
​३ मे: बसच्या बॅटरीमधून धूर निघाला.
​१४ मे: अंधेरी येथे ४ बसेसचा एकमेकांना अपघात.
​१९ मे: महापौर रितू तावडे प्रवास करत असलेल्या बसमध्ये तांत्रिक बिघाड.
​२५ मे: प्रतीक्षा नगर आगारात २ बसेसना भीषण आग.
​२७ मे: सांताक्रूझ येथे विना-एसी सीएनजी बसला आग.
​३१ मे: मानखुर्द येथे बेस्ट बसचा अपघात.
​१ जून: दहिसर येथे बसने घोडागाडीला धडक दिली, घोडा गंभीर जखमी.(Mumbai BEST)