पावसाळ्यापूर्व तयारीला वेग; पालिकेची यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत

    05-Jun-2026
Total Views |
Monsoon Preparedness
 
​मुंबई : (Monsoon Preparedness) पावसाळा तोंडावर आला असताना महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व तयारीच्या कामांना युद्धपातळीवर वेग देण्यात आला आहे. आगामी पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य राखणे आणि शहरातील दैनंदिन जनजीवन सुरळीत ठेवणे या उद्देशाने पालिकेने विविध प्रतिबंधात्मक व आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.
 
​सखल भागांत पाणी साचू नये म्हणून शहरातील लहान-मोठे नाले, सांडपाणी व पर्जन्यजल वाहिन्यांची (गटारे) साफसफाई करून गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासोबतच वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडू नये म्हणून धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची शास्त्रोक्त छाटणी केली जात आहे. रस्त्यांवरील राडारोडा (डेब्रिज) आणि कचरा हटवून त्यांची त्वरित विल्हेवाट लावली जात आहे. तसेच पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी कीटकनाशक फवारणी आणि धूर फवारणीवर भर दिला जात आहे.
 
 
​महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि सफाई कामगार स्वतः प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्ड) उपस्थित राहून ही सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पावसाळ्यापूर्वी मुंबई सज्ज करण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा सध्या मुंबईतील विविध वॉर्डांमध्ये सक्रिय झाली आहे.(Monsoon Preparedness)