राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट

    05-Jun-2026   
Total Views |



मुंबई, दि. ०६ : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या चित्रपट आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या गोरेगावातील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेतला.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. या भेटीदरम्यान गोरेगाव चित्रनगरी, एन. डी. स्टुडिओ (कर्जत) तसेच विदर्भातील चित्रपट, मनोरंजन आणि सांस्कृतिक उद्योगांना चालना देणाऱ्या प्रस्तावित नागपूर चित्रनगरी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील चित्रपट, ओटीटी, डिजिटल कंटेंट, अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.

पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल

तसेच त्यांनी चित्रनगरीतील आकर्षण ठरलेल्या बॉलिवूड पार्क आणि फ्रेम स्टुडिओ येथे भेट देऊन तेथील अत्याधुनिक सुविधा, व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) अनुभव, मनोरंजन संकल्पना आणि पर्यटकांसाठी विकसित करण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली. बॉलिवूड पार्कमधील विविध सांस्कृतिक सादरीकरणे, मनोरंजन तंत्रज्ञान आणि पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचीही त्यांनी दखल घेतली.

यावेळी बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, “महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक आणि चित्रपट राजधानी आहे. दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेला हा वारसा अधिक भक्कम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नव्या संधींची जोड देणे आवश्यक आहे. प्रस्तावित नागपूर चित्रनगरीमुळे विदर्भातील तरुण कलाकार, तंत्रज्ञ आणि उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील. चित्रपट, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही क्षेत्रांना याचा लाभ होईल.”







अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....