आदिवासी बांधवांच्या जगण्यासाठी...

    05-Jun-2026   
Total Views |

Serving Tribal Lives Selflessly 
 
आदिवासी पाड्यातील विद्यार्थी, एकल वृद्ध आणि निराधार बालकांच्या समस्या कमी व्हाव्यात,यासाठी झटणार्‍या मुंबईच्या मनोजकुमार घरत यांच्याविषयी...
 
साधारण २५ वर्षांपूर्वीची घटना. ‘या मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे,’ संध्या त्यांच्या पतीला म्हणजेच, मनोजकुमार घरत यांना म्हणाल्या. पालघरच्या आदिवासी परिसरातील त्या गरीब, गरजू आणि सगळ्याच सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांना पाहून, खरेतर मनोजकुमार यांच्याही मनात हेच विचार सुरू होते. पत्नीच्या बोलण्याने त्यांच्या विचारांना बळ मिळाले, साथ मिळाली. त्यांनी ठरवले की, आपण स्वामी समर्थांचे भक्त! समर्थांनी आपल्याला दोन वेळच्या अन्नाचा आणि चांगले जीवन जगण्याचा आशीर्वाद दिला आहे. आपल्याकडे एक भाकरी असेल, तर अर्धी भाकरी या मुलांचे आयुष्य सुंदर करण्यासाठी उपयोगात आणायला हवी.
 
तेव्हापासून आजपर्यंत, शेकडो मुलांच्या शिक्षण-साहित्याचा आणि दैनंदिन जगण्याचा खर्च घरत कुटुंब आनंदाने करत आहे. पालघरमधील गणेशपुरी ते वाडा, या परिसरातील ६० एकल वृद्धांनाही त्यांनी दत्तक घेतले. या कुटुंबांच्या महिन्याचे रेशन आणि औषध-खर्च वगैरे ते करतात. त्याचप्रमाणे पालघरमधील तीन शाळा दत्तक घेतल्या असून, त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि इतर खर्चही उचलतात. त्यांची ‘आई अमृत फाऊंडेशन’ नावाची संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातूनच ते अहोरात्र आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी झटत आहेत. याकामासाठी स्वामी बळ देते असून, त्यांच्या़कृपेने काहीही कमी पडत नाही, असा त्यांचा दृढ विश्वास आहे.
 
नीतिमत्ता जपणारे आणि सामाजिक न्यायाची असलेले मनोजकुमार ‘मुंबई अग्निशमन दला’मध्ये नोकरीला होते. महानगरपालिकेमध्ये नोकरी करणारे पहिले ‘रायफल शूटर’ म्हणूनही त्यांची नोंद आहे. क्षत्रिय समाजाचे घरत कुटुंब, हे मूळचे पालघरच्या खारेकुरण गावचे. पण, कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले. हरेश्वर घरत आणि हर्षला घरत हे मनोजकुमार यांचे आईवडील. घरत कुटुंब अत्यंत समाजशील आणि धार्मिक प्रवृत्तीचे. इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याने हे कुटुंब सायन प्रतीक्षानगरमध्ये आले, ते ७०च्या दशकात. तेव्हा प्रतीक्षानगरमध्ये पाच ते सहाच चाळी होत्या. हळूहळू लोक वसू लागले, चाळींची संख्याही वाढली. हरेश्वर यांचा पिंड संघर्षशील सामाजिक कार्यकर्त्याचा होता. तेही स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे या परिसराचे नेतृत्व आपसूकच त्यांच्याकडे आले. परिसरातील लोक, त्यांच्याकडे समस्या घेऊन येत असत. अगदी पहाटे ५ पासून ते रात्री एक-दीडपर्यंत, त्यांच्या घरी लोकांचा राबता असे. याच परिसराचे पोलीस स्टेशन, माटुंग्याला होते. त्यामुळे या परिसरात चोर्‍यामार्‍यांचे प्रकार वाढतेच. मात्र, अनेकदा लोक चोराला रंगेहाथ पकडून, हरेश्वरांसमोर उभे करत असत. मग, हरेश्वर पहिल्यांदा एक थप्पड चोराला लगावत आणि सगळ्यांना सांगायचे की, थांबा कुणी मारू नका. त्याला बसायला सांगून विचारायचे की, ‘तू चोरी का केलीस?’ चोर कारणे सांगे. बहुतेकवेळा परिस्थितीमुळे ती व्यक्ती चोरीचे काम करत असे. मग हरेश्वर चोराला विचारत, ‘जेवलास का?’ ते हर्षलाबाईंना सांगत, ‘जा याच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन या.’ त्या चोराला ते पोटभर जेवू घालत, समुपदेशन करत. अनेक चोरांना यामुळे उपरती होई. मग चोरी सोडून ते कष्टाची कामे करत.
 
या सगळ्याचे संस्कार मनोजकुमार यांच्यावर नकळत होत होते. ते त्यांच्या बाबांना विचारत, ‘तुम्ही चोराला मारले आणि जेवूही घातले, असे का?’ तेव्हा ते म्हणत, "परिस्थितीमुळे माणूस हतबल होतो. सगळेच काही हौसेने चोर होत नाहीत. आपल्या हातात असेल, तर आपण नेहमी दुसर्‍यांचे कल्याण करावे, त्याला चांगला मार्ग दाखवावा.” या संस्कारातूनच मनोजकुमार घडत गेले.
 
मनोजकुमार यांना सैन्यामध्ये जाऊन, देशसेवा करण्याची इच्छा होती. पण, घरातल्यांनी त्याला परवानगी नाकारली. मग, बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर, मनोजकुमार यांनी पोलीस दलात नोकरी केली. पण, पाप-पुण्यावरचा आणि मनातील करुणा भाव असल्याने, मनोजकुमार यांचे मत या नोकरीत रमले नाही. पुढे, काहीकाळ अर्थार्जनासाठी त्यांनी ट्रकही चालवला. त्यानंतर त्यांनी अग्नीशमन दलात ‘फायरमॅन’ म्हणून नोकरी स्वीकारली.
 
त्याकाळातही ते पालघरला गावी जात असत, त्यावेळी आदिवासी पाड्यातील बांधवांसाठी काही करायलाच हवे, असे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला वाटत असे. या जाणिवेतूनच हे एक मोठे सेवाकार्य उभे राहिले. एकवेळ अशीही आली की, सेवाकार्यासाठी पैशांची चणचण भासू लागली होती. तेव्हा त्यांच्या पत्नीने, अंगावरचे दागिने काढून दिले.
 
असो, याचकाळात स्व. विष्णू सवरा यांच्याशी त्यांचा संपर्क झाला, तेव्हा ते आमदार किंवा मंत्रीही नव्हते. आदिवासी बांधवांच्या दृष्टीने काय करता येईल? याबद्दल ते दोघेही अनेकदा चर्चा करत, उपाययोजना शोधत. सध्या हरेश्वर यांचे एकल आणि गरजू वृद्धांसाठी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम सुरू करण्याचे नियोजन सुरु आहे. ते म्हणतात, "स्वामी समर्थ बांधवांच्या कल्याणाची इच्छा आणि त्यासाठीचा मार्ग दाखवतात असतात. २०२१ साली सेवानिवृत्त झालो, आता पूर्णवेळ आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि एकल वृद्ध आणि अनाथ बालकांच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणार आहे.” समाजातील उपेक्षितांच्या कल्याणासाठी तळमळीने झटणार्‍या मनोजकुमार घरत यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.