५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ; मंत्री लोढा यांच्या पुढाकारातून अमली पदार्थमुक्त मुंबईसाठी व्यापक मोहीम

    05-Jun-2026   
Total Views |
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : (Mangal Prabhat Lodha) मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, मुंबई शहर व उपनगरांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर अंमलात आणली जाणार आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या २५ जून २०२६ रोजी या मोहिमेचे उद्घाटन होणार असून, त्याच दिवशी ५ लाखांहून अधिक मुंबईकर तब्बल ५ हजार ठिकाणी एकत्र येऊन व्यसनमुक्तीची शपथ घेणार आहेत.
 
महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालये, रहिवासी संकुले, हौसिंग सोसायट्या तसेच विविध सामाजिक व धार्मिक संस्था या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.या मोहिमेच्या तयारीसंदर्भात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
 
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “व्यसनमुक्त मुंबई घडवणे हे सरकार, शासन, समाजाच्या सक्रिय सहभागातूनच हे शक्य होणार आहे. आपल्या पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक लोकचळवळ आहे आणि यातून निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडेल. या उपक्रमामुळे युवकांमध्ये जनजागृती वाढून अमली पदार्थांविरोधात मजबूत सामाजिक वातावरण निर्माण होईल."(Mangal Prabhat Lodha)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....