जपानमध्येही ‘बुलडोझर’ न्याय!

    05-Jun-2026
Total Views |
Japan
 
उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून परिचित असलेल्या जपानची प्रतिमा जगभरात शिस्त, कायद्याचे पालन, सांस्कृतिक एकसंधता आणि आधुनिकतेचा आदर्श म्हणून आहे. अमेरिकेच्या अण्वस्त्र हल्ल्यानंतर जपानने ज्या पद्धतीने ‘फिनिक्स’ भरारी घेतली, त्याने नक्कीच जगाला बोटे तोंडात घालण्यास बाध्य केले. असे असले तरीही, गेल्या काही दशकांत जपानसमोरच्या समस्या सातत्याने वाढताना दिसतात. यामध्ये घटती लोकसंख्या, वाढते वृद्धत्व या काही प्रमुख समस्या. त्यामध्ये सध्या भर पडलेली दिसते, ती इस्लामी स्थलांतरणाची!
 
जपानमधील मुस्लिमांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढली. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण अत्यल्प असले, तरीही त्याचे दुष्परिणाम जपानला जाणवू लागले आहेत. जपानमधील मुस्लिमांची वाढती संख्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, अलीकडेच सैतामा प्रांतातील कावागोए शहरातील एका मशिदीवरून निर्माण झालेला वाद. ही मशीद कोणतीही परवानगी न घेता बांधल्याने, जपानी प्रशासनाने ती पाडली. पुढे त्या मशिदीच्या उद्घाटनाला पाकिस्तानी राजदूत हजर असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर समोर आले. मग, लाजेखातर पाकिस्तानी वकिलातीने समोर येऊन पाकिस्तानी नागरिकांना जपानमध्ये कायद्याचे पालन करण्याबाबत सज्जड दम भरला वगैरे वगैरे.
 
सध्या जपानमधील मोठी समस्या म्हणजे, तरुण लोकसंख्येची कमतरता. जपानी नागरिकांचे सध्याचे सरासरी वयोमान हे ५२च्या आसपास. यामुळे जपानला मोठ्या प्रमाणावर परदेशी मनुष्यबळ स्वीकारावे लागते. यातूनच जपानमध्ये आशियाई स्थलांतरितांची संख्या वाढली असून, यामध्ये इंडोनेशियन मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांची लोकसंख्या आहे. मुस्लिमांच्या या वाढत्या संख्येमुळे जपानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनेतही महत्त्वपूर्ण बदल घडताना दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
काही दशकांपूर्वी जपानमध्ये मुस्लिमांची संख्या अत्यंत मर्यादित होती. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात, जपानने स्थलांतरावर कठोर नियंत्रण ठेवले. त्यामुळे देशाची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख मोठ्या प्रमाणावर एकसंध राहिली. मात्र, जागतिकीकरण आणि देशातील मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी हे नियंत्रण शिथिल झाले. पुढे, रोजगारासाठी जपानमध्ये आलेल्या मुस्लिमांच्या धार्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी मशिदी, इस्लामी सांस्कृतिक केंद्रे आणि हलाल सुविधांचा विकास होऊ लागला. टोकियो, ओसाका, नागोया, योकोहामा यांसारख्या जपानच्या आर्थिक केंद्रांमध्ये मशिदींची संख्या वाढली. यातही सर्वाधिक मशिदी जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहरात आहेत.
 
आज अनेक जपानी विद्यापीठे, औद्योगिक क्षेत्रे आणि स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये मशिदी आणि कबरी सर्रास दिसून येतात. हे आजूबाजूच्या परिसरात वाढलेल्या मुस्लीम लोकसंख्येचेच प्रतीक आहे.
 
१९९९ मध्ये जपानमधील मशिदींची संख्या जवळपास १५च्या आसपास होती. आज जग २०२६च्या मध्यावर आले असताना, ती संख्या १६० वर पोहोचली आहे. अर्थातच, गेल्या दोन दशकांत ९०० टक्के दराने जपानमधील मशिदींची संख्या वाढली. याच काळात जपानमधील मुस्लिमांची संख्याही दुप्पट झाल्याचे समोर आले. जपानी समाज वाढत्या स्थलांतरामुळे बहुविध बनत आहे. त्यातूनच जपानी नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर परिणाम होण्याची भीती सतावू लागली आहे. युरोपचा आजवरचा अनुभव लक्षात घेता, जपानी नागरिकांना वाटणारी ती भीती अवास्तव नाहीच. एखाद्या देशात स्थलांतरित म्हणून जायचे, रोजीरोटी कमवायची, मग लोकसंख्येच्या बळावर त्या देशातील कायद्यालाच आव्हान द्यायचे, हा मुस्लीम स्थलांतरितांचा आजवरचा जागतिक इतिहास. त्यामुळे जपानमध्येही याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः समाजमाध्यमांवर ‘जपानचे इस्लामीकरण’ हा शब्दप्रयोगही सातत्याने चर्चेला आल्याचेही दिसते.
 
अर्थात, जपान हे युरोपसारखे आत्ममग्न राष्ट्र नसल्याने युरोपसारखी स्थिती येईल, याची शक्यता कमीच. राष्ट्राप्रतिचे आणि नियमपालनाबाबतचे प्रेम, ती मशीद पाडण्याचे आदेश देऊन जपानी प्रशासनाने दाखवून दिले आहे. तरीही, जपानने एकूणच वाढत्या मुस्लीम लोकसंख्येबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.
 
-कौस्तुभ वीरकर