हिंदवी स्वराज्यातील मराठी भाषाकोश - स्वभाषेची जाणीव

    05-Jun-2026
Total Views |
Marathi Lexicon of Swarajya
 
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला, तरीही छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेनंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता. भाषेमुळेच इतिहास आणि इतिहासामुळे संस्कृती जिवंत राहते, हेच सूत्र जपण्याचा शिवरायांचा उद्देश त्यामागे होता. दि. ६ जून रोजी साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने सुरु असलेल्या लेखमालेच्या तिसर्‍या पुष्पात, राज्यव्यवहारकोश निर्मिती आणि शिवकालीन मराठीच्या प्रवासाचा घेतलेला मागोवा...
 
मनुष्याच्या मनातील भावना, मनोगत व्यक्त करण्याचे ‘भाषा’ हे एक साधन आहे. आपल्या अंतरंगातील भावना व्यक्त करण्यासाठी, प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेचा आधार घ्यावा लागतो. यामुळे मनातील भावना अधिक प्रभावीपणे मांडता येते. ‘भाषा’ हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील ‘भाष’ म्हणजेच बोलणे, या धातूवरून तयार झालेला शब्द. आपली मराठी भाषा ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक मानली जाते. अत्यंत प्रगल्भ आणि वैभवशाली असलेली आपली मराठी भाषा, आपल्या महाराष्ट्र राज्याची प्रमुख बोलीभाषा आहे. समृद्ध अशा या आपल्या महाराष्ट्रात, मराठीची ज्ञानगंगा ओसंडत वाहत होती. महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी या मराठी भाषेला एक वेगळीच झळाळी प्राप्त करून दिली. यादवकाळात वारकर्‍यांच्या मुखातून साधे-सोपे अध्यात्म, या मराठी भाषेतच उदयास आले. सर्व जातिपातींची ही मराठी भाषा भागवत धर्माची पताका घेऊन, उंच-उंच फडकत राहिली. संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, सोपान देव, जनाई, मुक्ताई, तसेच ज्ञानेश्वर माऊलींनी, मराठी भाषेचे हे मौल्यवान धन सर्व जनमानसाच्या पदरात टाकले.
 
यादवकाळात आलेल्या इस्लामिक आक्रमकांनी, आपली ही संस्कृती बदलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. एखादी संस्कृती बदलायची असेल, तर त्याच्या भाषेवर संस्कार करावे लागतात. मुसलमानांची सत्ता या महाराष्ट्रात नांदू लागल्याबरोबर, ‘फारसी’ भाषेचा प्रभाव मराठीवर दिसू लागला. या कारणास्तवच मराठीचे अनेक शब्द लुप्त होऊन, त्याची जागा फारसी शब्दांनी घेतली. कारण, या सत्ताधीशांचा सर्व दरबारी कारभार हा ‘फारसी’तूनच चाले. प्रशासकीय व्यवस्थेत आलेल्या या फारसी भाषेमुळे मराठी भाषेत अनेक फारसी शब्द आणि वायप्रचार सहजरीत्या येऊन, मराठी भाषा हळूहळू अशुद्ध होऊ लागली. जवळजवळ ३०० वर्षे राज्य करणार्‍या या राज्यकर्त्यांनी, आपल्या संस्कृतीवर अशाप्रकारे प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. उत्तरेत जशी हिंदी भाषेच्या अतिअशुद्ध स्वरूपाच्या जागी ‘उर्दू’ भाषा म्हणजेच, यावनी हिंदी ही नवीन भाषा निर्माण झाली. तद्वतच दक्षिणेत ‘बहामनी’ आणि नंतर आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही यांसारख्या मुसलमानांनी, राज्यकारभारात फारसी भाषेच्या मराठीवरील अतिक्रमणामुळे ‘दख्खनी उर्दू’ भाषा निर्माण होऊ लागली. मराठीच्या या बोलीभाषेवर जसा प्रभाव पडला, तसाच या भाषेच्या लिखाणावरदेखील फारसीचा प्रभाव दिसू लागला. यादवकाळापासून अस्तित्वात असलेली मराठीची दुसरी लिपी म्हणजे ‘मोडी लिपी’ हीचेदेखील, फारसी लिपी ‘शिकस्ता’ लिपीशी साधर्म्य दिसू लागले.
 
‘ज्येष्ठशुद्ध त्रयोदशी शके १५९६ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर वेदघोषात संपन्न झाला,’ याअर्थी स्वसंस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मराठी संस्कृतीचीही स्वभाषा, ज्या यावनी सत्तेच्या आक्रमणामुळे नष्टप्राय होऊ पाहत होती. ती मराठ्यांच्या सत्तास्थापनेमुळे पुनर्जीवित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेमुळे स्वत्वाची जाणीव होऊन, या भाषिक अतिक्रमणावर पायबंद बसला. फारसी शब्दांच्या अतिवापरामुळे मराठी भाषा अशुद्ध झाली होती. या मराठी भाषेला नवसंजीवनी देण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस केले. आपली संस्कृती, कला, विद्या यांच्याकडे लक्ष देताना, शिवरायांनी विद्वान पंडित आणि बुद्धिवंतांना आश्रय दिला. कवी परमानंद, जयराम पिंडे, समर्थ रामदास, गागाभट्ट अशा अनेकांनी, शिवकाळात मराठीची ग्रंथसंपदा परिपूर्ण केली. मराठी भाषेत घुसखोरी केलेल्या फारसी, अरबी, तुर्की शब्दांना पर्यायी मराठी शब्द वापरण्यात यावे यासाठी, फारसी-मराठी शब्दकोश तयार करण्याची महत्त्वाची योजना शिवरायांनी आखली. अशाप्रकारे राज्यव्यवहारांमध्ये मराठी शब्द वापरात यावेत, यासाठी एक कोश तयार करण्याचे कार्य त्यांनी प्रसिद्ध मुत्सद्दी रघुनाथ नारायण हनुमंते यांच्याकडे सोपविले. इ. स. १६७८ मध्ये धुंडीराज व्यास यांच्या साहाय्याने, ‘राजव्यवहारकोश’ हा ग्रंथ सिद्ध करण्यात आला. ‘राजव्यवहारकोशा’च्या सुरुवातीलाच रघुनाथ पंडितांनी ‘राजव्यवहारकोश’ लिहिण्याचे प्रयोजन काय, यासंबंधी पुढीलप्रमाणे म्हटले आहे :
कृते म्लेंच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला -वतंसेनात्यर्थं यवनवचनैलुप्तसरणिम् |
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम् नियोक्तोभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥ 
अर्थ : या पृथ्वीतलावरून म्लेंच्छांचा पूर्ण उच्छेद केल्यानंतर सूर्यवंशाला ललामभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजीने, यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पद्धतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी (रघुनाथ) पंडिताची नियुक्ती केली.
 
राज्यव्यवहारात फारसी शब्द प्रचलित असल्याने, लोकांच्या तोंडी फारसी भाषेतील असंख्य शब्द दक्षिणी उर्दूच्या द्वारे प्रकट होऊ लागले. दक्षिणी उर्दूचा संपर्क मराठी भाषेशी असल्याने ते शब्द मराठीत आले. या शब्दांचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने, ‘राजव्यवहारकोश’ निर्मितीसाठी रघुनाथ पंडितांची नियुक्ती करण्यात आली. ‘राजव्यवहारकोशा’च्या उपोद्घातात रघुनाथ पंडित लिहितात की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आज्ञेला मस्तकी धारण करून, श्रेष्ठ अमात्य रघुनाथ हा राज्यव्यवहारकोश रचित आहे.’
 
‘राजव्यवहारकोशा’त दिलेल्या मराठी शब्दांची संख्या एक हजार ३८० इतकी आहे. त्या शब्दांत फारसी भाषेतील शब्द आहेतच पण, फारसीशी यत्किंचितही संबंध नसलेले; पण दख्खनी उर्दू प्रचलित असलेले अनेक शब्द आढळतील. उदा. अडकित्ता, आडेकरी, कत्ता, चोळी, छीट, ढाल, दुटा, दुर्मा, दुवल, दौड इ. असे अनेक शब्द आल्यामुळे, या कोशाचे स्वरूप फारसी-संस्कृत कोशाचे म्हणता येईल. या कोशात योजलेल्या अनेक शब्दांपैकी, काही संस्कृत शब्द पुढील काळात चालू राहिले. उदा. अमात्य-मुजुमदार, सचिव-सुरनीस, मंत्री-वाकनीस, देशाधिकारी-सुभेदार, मुद्राधारी-किल्लाहवालदार, देशलेखक-मुजुमदार, तसेच सचिव, मंत्री, सभासद, न्यायाधीश, दुर्ग, कोशागार, शस्त्रागार, चषक, आदाय, सभा, लेखा, आय-व्यय, वेतन, ऋण (कर्ज), प्रतिभू (जामीन), कारागृह, आयपत्र, सहकारी, अनुक्रमणिका, संवाद, गणना असे काही शब्द प्रचलित झाले.
 
स्वराज्य संकल्पक शहाजीराजांनी शिवरायांना दिलेली ‘राजमुद्रा’ ही, स्वत्वाची जाणीव करून देणारी स्वराज्यप्रेरक अशी मुद्रा होती. जिथे शहाजीराजांची स्वतःची व जिजाऊ मांसाहेबांची मुद्रा ‘फारसी’मध्ये पाहायला मिळते; तिथेच आपल्या सुपुत्राची मुद्रा शहाजीराजांनी ‘संस्कृतप्रचुर’ मराठी शब्दांत ‘देवनागरी’ लिपीमध्ये तयार केली. छत्रपती शिवरायांच्या नंतर त्यांच्या वंशजांच्या व अधिकारी वर्गाच्या सर्वच मुद्रा, मराठी भाषेतच पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांनी राजकीय क्षेत्रात मराठी भाषेला प्राधान्य देऊन, राजभाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठी संतांनी सामान्य जनांच्या मायबोलीत, तसेच धार्मिक बाबतीत यवनी, फारसी वगैरे भाषेचा विटाळ न होऊ देता, शुद्ध मराठीतूनच ग्रंथरचना आणि वाङ्मयनिर्मिती सातत्याने केली. तसेच राजकीय सत्तेतील फारसी-उर्दू भाषेपासून फटकून वागून, मराठी भाषा सामान्य जनतेत प्रचलित केली.
 
मुसलमानांचे राज्य चालू असता, इ. स. १६२८ मधील दस्तऐवज पाहिले; तर १०० शब्दांतून सरासरीच्या मानाने १४ शब्द मराठी येत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर इ. स. १६७७ पर्यंत, शेकडा ६२ शब्द मराठीत येऊ लागले. छत्रपती शाहू महाराज राज्यावर असता, इ. स. १७२८ मध्ये याचा आकडा शेकडा ९३ इतका पोहोचला होता. परराज्याचा भाषेवरती केवढा परिणाम होतो, त्याचा हा रोख-ठोकताळा आहे. राज्यकारभारात ‘राजव्यवहारकोश’ वापरात आल्यानंतर, ४५ टक्के बदल हा शिवकाळातच पाहायला मिळतो. पुढे पेशवेकाळात, ६५ ते ७० टक्के यावनी शब्दांची हकालपट्टी मराठी भाषेतून करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरची पत्रे, तसेच संभाजी महाराज, राजाराम महाराज इत्यादींची पत्रे पाहिली; तर भाषेच्या दृष्टीने त्यातील फरक जाणवतो. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर पत्राची सुरुवात ‘अज रख्तखाने राजश्री शिवाजी राजे दामदौलत हु बजानेब कारकुनानी हाल व इस्तकबाल’ याने होत असे, राज्याभिषेकानंतर ही पत्रे ‘स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ३ नल संवत्सर मार्गशीर्ष वदी प्रतिपदा’ या मराठी शब्दांनी सुरू झाली. शिवरायांच्या पत्रव्यवहारात झालेला हा बदल, स्वत्वाची जाणीव करून देणारा ठरला. भाषेमुळेच इतिहास आणि इतिहासामुळे संस्कृती जिवंत राहते. स्वभाषेचा ‘राजव्यवहारकोश’ अमलात आणून, भाषेचे हे अनन्यसाधारण महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने अचूक ओळखले होते.
 
आज आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यव्यवहारात या मराठी भाषेला प्राधान्य देऊन, राजभाषेचा दर्जा मिळवून दिला. समृद्ध असलेली आपली मराठी भाषा शुद्ध राहण्यासाठी विविध ग्रंथांची निर्मिती करून, या भाषेचे स्थान सामान्य जनतेत टिकून राहिले. योग्य वेळी ‘राजव्यवहारकोश’ या ग्रंथाची निर्मिती करून, मलिन झालेल्या या मराठी भाषेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. आज मराठी भाषा स्वाभिमान मिरवताना, प्रत्येक मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे.
 
-पंकज भोसले