पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला मोठी भरती -१४ ते १९ जूनदरम्यान सलग सहा दिवस अलर्ट
05-Jun-2026
Total Views |
मुंबई : (High Tide) यंदाच्या पावसाळ्यात मुंबई किनारपट्टीवर २४ वेळा मोठी भरती येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात १४ ते १९ जूनदरम्यान सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत समुद्रातील लाटांची उंची ४.६४ मीटर ते ४.८७ मीटरदरम्यान असणार आहे. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतही विविध दिवशी मोठी भरतीची नोंद होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक उंचीची भरती १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३६ वाजता येणार असून त्यावेळी लाटांची उंची ४.८९ मीटर इतकी असेल. (High Tide)
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या भरतीच्या काळात समुद्रकिनाऱ्यांवर जोरदार लाटा उसळण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारे, खडकाळ भाग तसेच किनारपट्टीलगतची धोकादायक ठिकाणे टाळावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः मुसळधार पाऊस आणि मोठी भरती एकाच वेळी आल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता वाढू शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
जून महिन्यात १४ ते १९ तारखेपर्यंत सलग सहा दिवस मोठी भरती राहणार असून जुलैमध्ये १३ ते १८, ऑगस्टमध्ये १२ ते १६ आणि सप्टेंबरमध्ये १० ते १३ तसेच २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान मोठ्या भरतीचा कालावधी असणार आहे. या काळात महापालिकेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (High Tide)