मुंबई : (Grand Cyclothon) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मुंबई भाजप युवा मोर्चातर्फे शुक्रवारी बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन’ आयोजित करण्यात आले होते. यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्यासह २ हजारांहून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला.
यासोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)चे अध्यक्ष अजिंक्य नाईक, आ. संजय उपाध्याय, भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळेक, मुंबई महानगरपालिका सभागृह नेते गणेश खणकर, नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना, भाजयुमोचे अध्यक्ष दीपक सिंह यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. शहराच्या विविध भागांतील युवक, नागरिक आणि सायकलप्रेमींनी या सायक्लोथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना आ. अमीत साटम म्हणाले की, “‘पेडल फॉर प्लॅनेट’ हा केवळ सायक्लोथॉन नव्हता, तर पर्यावरण संरक्षण, निरोगी जीवनशैली आणि शाश्वत विकासासाठी मुंबईतील तरुणांनी घेतलेली सामूहिक प्रतिज्ञा होती. हजारो सायकलपटूंच्या उत्स्फूर्त सहभागातून पर्यावरणीय जबाबदारीबाबत वाढती जनजागृती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज अधोरेखित झाली.
मुंबई पारंपरिकदृष्ट्या सायकलिंग शहर नसले तरी लहान अंतरासाठी सायकलचा वापर वाढवल्यास आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींचा लाभ होईल. भविष्यात समुद्राची वाढती पातळी यांसारख्या आव्हानांचा विचार करता सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देणे हे पर्यावरण संरक्षणासाठी दूरदृष्टीचे पाऊल आहे.”
निरोगी मुंबई घडविण्याचा सामूहिक संकल्प – दीपक सिंह
भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह म्हणाले की, “जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘पेडल फॉर प्लॅनेट’ हा केवळ सायक्लोथॉन नसून स्वच्छ, हरित आणि निरोगी मुंबई घडविण्याचा एक सामूहिक संकल्प आहे. वाढते प्रदूषण, घटणारे हरित क्षेत्र आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी समाजाने, विशेषतः युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘पेडल फॉर प्लॅनेट’ हा केवळ कार्यक्रम नसून एक लोकचळवळ आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद ही युवा शक्ती आहे. युवक जागृत झाला तर देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जातो.”(Grand Cyclothon)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....