राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ; एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता होणार

Total Views |
Environment Day
 
मुंबई : (Environment Day) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
 
परळ बसस्थानक येथे शुक्रवार दि. 5 जून रोजी आयोजित कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्याने नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.(Environment Day)
 
यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीच्या सेवांचा लाभ घेतात. त्यामुळे त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली ही राज्यव्यापी स्वच्छता मोहीम प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, आनंददायी आणि समाधानकारक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
 
 
प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचे पुनर्वापरासाठी संकलन
 
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता मोहिमेदरम्यान आढळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या संकलित करून त्यांचे पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून विविध टिकाऊ व उपयुक्त उत्पादने तयार करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
 
विस्तारित चार्जिंग केंद्राचे भूमिपूजन
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने आपल्या सर्व २५१ आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
 
कार्यक्रमानंतर सरनाईक यांनी परळ बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.(Environment Day)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.