मुंबई : (Devendra Fadnavis) मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने महत्त्वाकांक्षी पुनर्विकास आराखडा सादर केला आहे.
ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली परिवहनचा आढावा घेण्यात आला.
बेस्टच्या मालकीच्या बस डेपो आणि इतर मालमत्तांच्या विकासासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, मुंबईतील १३२ एकर क्षेत्रावर पसरलेल्या एकूण २२ बस आगारांचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन बेस्ट उपक्रमाच्या विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भात आयोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, आमदार अमित साटम (व्हीसीव्दारे), नगरविकास (१) विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, नगरविकास (२) विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.के. एच. गोविंदराज, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव नवीन सोना, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन बेस्ट उपक्रमाच्या विद्यमान महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्यमंत्री यांचे गुंतवणुक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.
सादरीकरणादरम्यान बेस्ट प्रशासनाने संस्थेची आर्थिक स्थिती, परिवहन व्यवस्थेतील सध्याची आव्हाने, वाढत्या प्रवासी संख्येनुसार बसांची आवश्यकता, तसेच डेपो, पार्किंग आणि ई-बस चार्जिंग सुविधांच्या कमतरतेबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईच्या वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेता भविष्यात सुमारे ७,००० बसांचा ताफा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद करण्यात आले.
या प्रकल्पासाठी सिंगापूर, पॅरिस, हाँगकाँग आणि लंडन येथील अत्याधुनिक बस डेपो आणि ट्रान्झिट हबच्या संकल्पनांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील बस आगारांचे बहुउद्देशीय केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी ‘डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर’ मॉडेलवर खासगी भागीदारांच्या सहकार्याने केली जाणार आहे.
पुनर्विकासानंतर डेपो परिसरात अत्याधुनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग सुविधा, चालक-वाहक व कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुले, प्रशासकीय कार्यालये आणि आधुनिक प्रवासी सुविधा उभारल्या जातील. तसेच उपलब्ध जमिनीचा अधिकतम वापर करून कमर्शियल कॉम्प्लेक्स, रिटेल मॉल्स, अर्बन प्लाझा, आर्ट गॅलरी, मल्टिलेव्हल कार पार्किंग आणि सार्वजनिक उपयोगाच्या विविध सुविधा विकसित करण्याची योजना आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे बेस्टच्या महसुलात मोठी वाढ होण्याची अपेक्षा असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. यासोबतच बस डेपो हे केवळ वाहनतळ न राहता शहराच्या विकासाला चालना देणारे आधुनिक नागरी केंद्र म्हणून विकसित होणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.