टीसीएस-विप्रोपाठोपाठ पुण्यातील एका विमा कंपनीतही कॉर्पोरेट जिहाद; मोहम्मद सादिकविरोधात तक्रार दाखल; पोलिसांनी मुसक्या आवळला

    05-Jun-2026   
Total Views |
Corporate Harassment
 
मुंबई : (Corporate Harassment) पुण्यातील युनियन बँकेच्या शाखेत नियुक्ती असलेल्या आणि स्टार युनियन दाई-इची लाइफ इन्शुरन्समध्ये कार्यरत २७ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात दीर्घकाळ मानसिक, शाब्दिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. महिलेने केलेल्या तक्रारी व पुराव्यांच्या आधारे पुणे पोलिसांनी आरोपी व्यवस्थापकाला अटक करून तपास सुरू केला आहे.
 
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहम्मद जाफर उर्फ सादिक मद्रासाब सय्यद यांनी नोकरीदरम्यान तिचा वारंवार छळ केला. महिलेने आरोप केला की, आरोपी वारंवार अयोग्य टिप्पण्या करत असे आणि आपल्या पदाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होता. तिने म्हटले की, माझे वरिष्ठ मोहम्मद सिद्दीकी यांनी माझा मानसिक तसेच शारीरिक छळ केला.
 
ते मला विशिष्ट पद मिळवून देण्याचे आश्वासन देत आणि आपण दोघे एकत्र फिरायला जाऊ, असे सांगत असत. मला सतत त्रास देत ते म्हणायचे की, मी त्यांना खुश ठेवले तर माझ्यासाठी सर्व काही चांगले होईल. अन्यथा त्यांना न पटणाऱ्या कोणालाही ते नोकरीतून काढून टाकू शकतात. त्यांनी अनेकदा अश्लील आणि अयोग्य वक्तव्ये केली.
 
महिलेने मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाची दखल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही घेतली. बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी सांगितले की, संबंधित महिला सुमारे सहा महिन्यांपासून विमा कंपनीत कार्यरत होती आणि तिच्या व्यवस्थापकाकडून वारंवार व्यावसायिक मर्यादा ओलांडल्या जात असल्याची तिने तक्रार केली.
 
२९ तारखेला हे प्रकरण आमच्या निदर्शनास आले. एका गावातील तरुणी खासगी विमा कंपनीत नोकरीसाठी आली होती. तिचे क्षेत्रीय व्यवस्थापक मोहम्मद सादिक हे कामाशी संबंधित नसलेल्या वैयक्तिक बाबींवर चर्चा करत असत. तिच्या खासगी आयुष्याबाबत आणि महिलांशी संबंधित वैयक्तिक विषयांबाबत माहिती विचारत असत, ज्याचा तिच्या कामाशी काहीही संबंध नव्हता. महाजन यांनी असा आरोपही केला की, आरोपी वारंवार वैयक्तिक संवाद साधून व्यावसायिक नात्याच्या आडून अनुचित संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
 
या प्रकरणाबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळाजी पंढरे यांनी सांगितले की, पोलिसांना महिलेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिने दिलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यात आली. ते म्हणाले, २७ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीनुसार, तिचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद जाफर उर्फ सादिक मद्रासाब सय्यद यांनी वारंवार छळ केला आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने तिला लोणावळ्यातील एका रेस्टॉरंटमध्ये नेले, तिचा हात पकडला आणि अनुचित वर्तन केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अतिरिक्त पुरावे आणि साक्षींची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.(Corporate Harassment)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक