‘सीजेपी’च्या प्रवक्त्यांचेही ‘आप’शी लागेबांधे; देशद्रोही समर्थकांशीही संबंध उघडकीस आल्याने नामुष्की
05-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Cockroach Janata Party) अमेरिकेत राहून ‘कॉकरोच जनता पक्षा’ (सीजेपी)च्या स्थापनेची घोषणा करणारा अभिजीत दीपकेने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, दि. 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे अंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यासाठी अभिजीत भारतात येणार असून, त्याने ‘सीजेपी’च्याच्या प्रवक्त्यांचीही घोषणा केली. यामध्ये सौरभ दास, विजेता दहिया आणि आशुतोष रांका यांच्या खाद्यांवर ही जबाबदारी देण्यात आली असून, यामुळे ‘सीजेपी’वर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
‘सीजेपी’ने नेमलेल्या तिन्ही प्रवक्त्यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन, त्यांच्या पुढील कार्यक्रमाची माहिती दिली. यामध्ये सहभागी तिन्ही प्रवक्त्यांची पार्श्वभूमी तपासली असता सौरभ दास हे पत्रकार असून, विजेता दहिया हे चित्रपट निर्माता असून, राजकारणातही सक्रीय आहेत. तसेच, आशुतोष रांका यांना आयआयटीची पार्श्वभूमी लाभली आहे.
‘सीजेपी’वर प्रारंभीपासूनच ‘आप’शी संबंध असल्याचे आरोप झाले होते. अभिजीत यांनीही ‘आप’साठी काम केल्याचे मान्यही केले होते. त्यातच ‘सीजेपी’चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही राजस्थानमध्ये ‘आप’साठी कार्य केल्याचे समोर आले आहे, तर विजेता दहियादेखील अरविंद केजरीवाल यांचे प्रशंसक राहिल्याचे त्यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशांतून उघड झाले आहे. (Cockroach Janata Party)
या दोघांच्या तुलनेत सौरभ दास यांची पार्श्वभूमी वादग्रस्त असून, याआधी सौरभ यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातच उमर खालिदशी भेट झाल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. तसेच, त्यामध्ये उमर खालिदला ‘धाडसी’ संबोधतानाच, त्याच्याविषयी प्रचंड आदरभाव असल्याचेही त्या संदेशात म्हटले होते.
तर, बाबरी पाडल्याबद्दल दु:ख व्यक्त करणारे संदेश सौरभ यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले होते. तसेच, ‘कलम 370’ रद्द करणे हे घटनात्मक उल्लघंन असल्याचेही सौरभ यांनी म्हटले होते. तसेच, माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्यवरही जातीवाचक टीका सौरभ यांनी समाज माध्यमांवर केली होती.
दरम्यान, ‘सीजेपी’च्या या पत्रकार परिषदेसाठी ‘कॉन्स्टिट्युशन क्लब’ची परवानगी मिळावी यासाठी राजदचे खासदार मनोज कुमार झा यांनी पत्र दिल्याचे समोर आले असून, त्यामुळे ‘सीजेपी’ला ‘इंडी’ आघाडीचाही पाठिंबा असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.
नेपाळसारखे आंदोलन करण्याचा कट!
समाजमाध्यमांवर ‘सीजेपी’च्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर अभिजीतला अटक केल्यास, अथवा परवानगी नाकारल्यास विमानतळावरच हिंसक विरोध करण्याचा संदेश देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलिसांचा विरोध करण्यासाठी पेपर स्प्रे, लाठी खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पोलिसांनी लाठीचार्ज केल्यास नेपाळसारखे आंदोलन करण्याच्या सूचनाही या व्हिडीओच्या माध्यमातून दिल्या आहेत. (Cockroach Janata Party)