तणावरहित वातावरणात नीट परीक्षा पार पाडावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुणे आणि लातूर केंद्रावर विशेष लक्ष द्या

    05-Jun-2026   
Total Views |
devendra fadanvis
 
मुंबई: (Chief Minister Devendra Fadnavis) 'राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा' (नीट) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्व तयारीसंदर्भात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचे नियंत्रण करावे, तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची तपासणी व ओळख पडताळणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. परीक्षेसंदर्भातील अचूक माहिती विद्यार्थी, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करण्यात यावी, तसेच परीक्षा प्रक्रियेबाबत अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्यास त्याचा तातडीने खुलासा करून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मानत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी."
 
 
 
पुणे आणि लातूर केंद्रावर विशेष लक्ष द्या
 
ते पुढे म्हणाले की, "पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पावसाच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे."(Chief Minister Devendra Fadnavis)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....