जगभरात शाश्वत विकास आणि संसाधनांच्या पुनर्वापराला वाढते महत्त्व प्राप्त होत असताना, गुजरातमधील अलंग हे ‘चक्रीय अर्थव्यवस्थे’चे (सर्युलर इकोनॉमी) एक प्रभावी उदाहरण म्हणून पुढे आले आहे. ‘अलंग-सोसिया जहाज पुनर्वापर यार्ड’च्या अभ्यास दौर्यात या उद्योगाचे विशाल स्वरूप, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना जवळून पाहण्याची नुकतीच संधी मिळाली. जगभरातील महाकाय जहाजांना येथे नवजीवन मिळते आणि त्यातून रोजगार, उद्योग व संसाधन बचतीची नवी विकासगाथा घडताना दिसते. त्याविषयी...
समुद्रावर सेवा बजावलेली महाकाय जहाजे अखेरीस कुठे जातात? हजारो टन स्टील, अत्याधुनिक यंत्रसामग्री, इलेट्रॉनिक उपकरणे आणि विविध संसाधनांनी सज्ज असलेल्या या जहाजांचे आयुष्य संपल्यानंतर त्यांचे काय होते? या प्रश्नाचे उत्तर गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे मिळते. जगातील सर्वांत मोठ्या जहाज पुनर्चक्रण केंद्रांपैकी एक असलेले अलंग हे केवळ जहाज तोडणी यार्ड नाही, तर संसाधनांचे पुनर्वापर, औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणीय शाश्वततेचे प्रभावी उदाहरण आहे. गेल्या चार दशकांत अलंगने भारताला जागतिक जहाज पुनर्चक्रण क्षेत्रात अग्रस्थानी आणले आहे.
अलंगची निवड का झाली?
अलंगच्या यशामागे निसर्गाची मोठी देणगी आहे. येथील समुद्रकिनार्याला उच्च भरती-ओहोटी, सौम्य उताराचा किनारा आणि मजबूत रेतीमय भूभाग लाभला आहे. त्यामुळे मोठी जहाजे थेट किनार्यावर आणणे शक्य होते. या नैसर्गिक सुविधांमुळे १९८२-८३ मध्ये येथे जहाज पुनर्वापर उद्योगाची सुरुवात झाली. सुरुवातीला अवघ्या पाच जहाजे आणि ०.२४ लाख ‘एलडीटी’ (लाईट डिस्प्लेसमेंट टनेज) क्षमतेपासून सुरू झालेला हा उद्योग आज दहा किमी लांबीच्या किनारपट्टीवर पसरलेल्या १५३ प्लॉट्समध्ये विकसित झाला आहे. आज अलंग हे जगभरातील जहाजमालकांसाठी विश्वासार्ह पुनर्चक्रण केंद्र म्हणून ओळखले जाते.
पुनर्चक्रणातून संसाधनांची बचत
एखाद्या जहाजामध्ये हजारो टन स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियम, यांत्रिक उपकरणे, विद्युत साहित्य आणि फर्निचर असते. जहाज पुनर्चक्रणामुळे ही सर्व संसाधने पुन्हा अर्थव्यवस्थेत वापरली जातात. नवीन स्टील उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने लागतात. त्याऐवजी जहाजांमधून मिळणार्या स्टीलचा पुनर्वापर केल्यामुळे ऊर्जाबचत, कार्बन उत्सर्जनात घट आणि नैसर्गिक संसाधनांवरील ताण कमी होतो. त्यामुळे अलंग हे भारताच्या ‘चक्रीय अर्थव्यवस्थे’चे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
हरित जहाज पुनर्चक्रणाची वाटचाल
गेल्या काही वर्षांत जहाज पुनर्चक्रण उद्योगात मोठे बदल झाले. अलंगमधील अनेक यार्ड्स आता आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि पर्यावरणीय मानकांचे पालन करतात. अभ्यास दौर्यादरम्यान भेट दिलेल्या ‘प्रिया ब्ल्यू’ या कंपनीने हरित जहाज पुनर्चक्रणाच्या क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे. हे केंद्र ‘लास एनके’प्रमाणित असून ‘हाँगकाँग कन्व्हेन्शन’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यरत आहे. धोकादायक कचर्याचे सुरक्षित व्यवस्थापन, कामगार सुरक्षा आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धती यांमुळे हे केंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाले आहे. अलंग-सोसिया परिसरातील ६७ हजार, ५०० चौ. मीटर क्षेत्रफळाच्या आधुनिक बॅक यार्डमध्ये जहाजांचे विघटन आणि साहित्य वर्गीकरणाची प्रक्रिया केली जाते. यामुळे कार्यक्षमता वाढण्याबरोबरच पर्यावरणीय जोखीमही कमी होते.
जहाज पुनर्चक्रणाची प्रक्रिया
१. जहाज आगमनापूर्वीची पूर्वतयारी : जहाज भारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणांना आगाऊ सूचना दिली जाते. जहाजाची मालकी, तांत्रिक तपशील, धोकादायक पदार्थांची यादी आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली जातात. ‘राज्य मेरीटाईम बोर्ड’, ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’, ‘सीमाशुल्क विभाग’ आणि इतर संस्थांकडून कागदपत्रांची तपासणी केली जाते.
२. नांगरणी : सर्व परवानग्या मिळाल्यानंतर जहाजाला बाह्य नांगरणी क्षेत्रात उभे करण्याची मुभा दिली जाते. सीमाशुल्क, ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’, सुरक्षा संस्था आणि इतर संबंधित विभाग जहाजाची प्रत्यक्ष तपासणी करतात. धोकादायक पदार्थ, किरणोत्सर्गी सामग्री, इंधन व वायू यांची पडताळणी केली जाते.
३. बीचिंग : आवश्यक परवानग्या आणि ‘नो ऑब्जेशन’ प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर जहाज किनार्यावर आणले जाते. बीचिंगनंतर जहाज सुरक्षितपणे स्थिर केले जाते. सर्वप्रथम जहाजातील उर्वरित इंधन, तेल आणि इतर द्रव पदार्थ सुरक्षित पद्धतीने बाहेर काढले जातात.
४. डी-कंटॅमिनेशन : जहाजातील तेल, स्लज, हायड्रोकार्बन्स आणि इतर धोकादायक अवशेष पूर्णपणे हटवले जातात. ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’कडून ‘डी-कंटॅमिनेशन’ प्रमाणपत्र मिळवले जाते. ‘ॠरी ऋीशश’ आणि ‘ऋळीं षेी केीं थेीज्ञ’ प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कापणीची प्रक्रिया सुरू करता येते.
५. धोकादायक पदार्थांचे व्यवस्थापन : सबेस्टॉस, ‘पीसीबी’, तेलयुक्त कचरा, रसायने आणि इतर घातक पदार्थांची ओळख करून त्यांचे सुरक्षित विलगीकरण केले जाते. धोकादायक कचर्याची साठवण, वाहतूक आणि विल्हेवाट पर्यावरणीय नियमांनुसार केली जाते.
६. जहाज विघटन : मंजूर जहाज-विशिष्ट पुनर्चक्रण आराखड्यानुसार जहाजाचे टप्प्याटप्प्याने विघटन केले जाते. प्रथम उपकरणे, यंत्रसामग्री आणि पुनर्वापरयोग्य साहित्य काढले जाते. त्यानंतर स्टील संरचनेचे नियंत्रित पद्धतीने तुकडे केले जातात. क्रेन, विंच आणि इतर यांत्रिक साधनांच्या मदतीने साहित्य वर्गीकृत केले जाते.
७. पुनर्वापर आणि संसाधन पुनर्प्राप्ती : स्टील, यंत्रसामग्री, विद्युत उपकरणे आणि इतर साहित्य पुनर्वापरासाठी पाठवले जाते. वापरण्यायोग्य वस्तूंची पुनर्विक्री केली जाते. उर्वरित कचर्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षण या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कामगारांसाठी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, अग्निशमन यंत्रणा, वायूशोधक, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, सबेस्टॉस हाताळणी सुविधा आणि प्रदूषण नियंत्रण उपाय अनिवार्य असतात. जहाज पुनर्चक्रण प्रक्रियेचे प्रत्येक टप्प्यावर निरीक्षण आणि नियमन केले जाते, ज्यामुळे मानवी आरोग्य, कामगार सुरक्षा आणि पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित करण्यात येते.
भावनगरच्या अर्थव्यवस्थेचा आधार
अलंगचे महत्त्व केवळ जहाज पुनर्चक्रणापुरते मर्यादित नाही, तर या उद्योगामुळे भावनगर आणि आसपासच्या क्षेत्रात मोठी आर्थिक परिसंस्था विकसित झाली आहे. हजारो कामगार, तंत्रज्ञ, वाहतूक व्यावसायिक, व्यापारी आणि लघुउद्योजक या उद्योगाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज कमी झाली आहे. जहाजांमधून बाहेर पडणार्या वस्तूंची विक्री, वर्गीकरण, दुरुस्ती आणि पुनर्विक्री यांमुळे हजारो कोटी रुपयांचा व्यापार निर्माण झाला आहे.
अलंगची अनोखी बाजारपेठ
अलंग आणि भावनगरमधील कुंभारवाडा परिसर हा जहाज पुनर्चक्रणातून मिळणार्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. येथे जहाजांमधील फर्निचर, औद्योगिक यंत्रसामग्री, इलेट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाकघरातील साहित्य, केबल्स, जनरेटर्स आणि हार्डवेअर वस्तू उपलब्ध असतात. कॅप्टनच्या खुर्च्यांपासून ते मोठ्या औद्योगिक मोटर्सपर्यंत आणि जहाजांवरील क्रॉकरीपासून ते लाईफबोट्सपर्यंत अनेक वस्तूंना येथे नवे आयुष्य मिळते. त्यामुळे ही बाजारपेठ व्यापारी, इंटेरियर डिझायनर्स आणि संग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
डिजिटल युगातील अलंग
एकेकाळी जहाजातून निघालेल्या वस्तूंसाठी ग्राहकांना प्रत्यक्ष बाजारात यावे लागत असे. आता परिस्थिती बदलली आहे. अलंगमधील अनेक व्यापारी जागतिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. एखाद्या जहाजाला मध्य समुद्रात तातडीने सुटा भाग हवा असल्यास तो काही तासांत शोधून पाठवला जाऊ शकतो. यामुळे अलंगची बाजारपेठ आता गुजरात किंवा भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनली आहे.
आधुनिक पायाभूत सुविधा
‘गुजरात मेरीटाईम बोर्ड’ने अलंग-सोसिया परिसरात भक्कम सुविधा उभारल्या आहेत. दहा किमी लांबीचा काँक्रीट सेवा रस्ता, कामगार वसाहती, पाणीपुरवठा व्यवस्था, अग्निशमन केंद्र, सुरक्षा प्रशिक्षण संस्था आणि प्रकाश व्यवस्था यांमुळे हे केंद्र अधिक सक्षम झाले आहे. कामगारांच्या कल्याणासाठी निवास, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अलंग शिपयार्ड आणि केसर आंब्याचे उत्पादन
अलंग जहाज तोडणी यार्ड हे गुजरातमधील एक सुप्रसिद्ध अवजड औद्योगिक केंद्र असले, तरी त्याचा पर्यावरणीय परिणाम प्रामुख्याने भावनगरच्या किनारी भरती-ओहोटीच्या क्षेत्रांपुरता मर्यादित आहे. त्याचा अलंगमधील कृषी क्षेत्रावर कोणताही परिणाम होत असल्याचे उदाहरण आजपर्यंत आढळून आलेले नाही. जहाज कापण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणारे धूरकण आणि सबेस्टॉसचे सूक्ष्म कण बहुतेक वेळा समुद्राच्या दिशेनेच विखुरले जातात. त्यामुळे त्यांचा अंतर्गत कृषी भागांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत नाही.
शाश्वत विकासाचे उदाहरण
आज जगभरात संसाधनांची बचत, कचरा व्यवस्थापन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात आहे. अशा काळात अलंगचे मॉडेल विशेष महत्त्वाचे ठरते. एकीकडे जहाजांचे सुरक्षित पुनर्चक्रण होत असताना, दुसरीकडे लाखो टन साहित्य पुन्हा वापरासाठी उपलब्ध होते. रोजगारनिर्मिती, औद्योगिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न येथे दिसून येतो. म्हणूनच अलंग हे केवळ जहाजांचे अंतिम ठिकाण नसून संसाधनांच्या पुनर्जन्माचे, शाश्वत विकासाचे आणि आधुनिक भारताच्या औद्योगिक क्षमतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.