कै. अच्युतराव जनार्दन टिळक अर्थात अच्युतकाका यांचे जीवन हे समर्पित, संघनिष्ठ, सेवाभावी आणि साधेपणाच्या आदर्शाने उजळून निघालेले होते. समाजकारण, राष्ट्रकारण आणि संघकार्य यांना त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले आणि अखेरपर्यंत त्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
सन १९८९ मध्ये रायगड जिल्ह्यावर आलेल्या भीषण महापुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. त्या संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीमार्फत मोठ्या प्रमाणावर मदतकार्य उभारण्यात आले होते. पेण येथील 'मीठ खरेदी विक्री' पेढीत मदत वाटप केंद्र व कार्यालय कार्यरत होते. याच मदतकार्यात अच्युतराव अग्रेसर होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते अक्षरशः झोकून देऊन काम करीत. सकाळी साडेसात वाजता कामाला सुरुवात करून रात्री नऊपर्यंत ते अखंड कार्यरत असत. अन्नधान्याच्या पाकिटांचे पॅकिंग, याद्या तयार करणे, मदतीचे नियोजन, प्रत्यक्ष वाटप अशा सर्वच कामांमध्ये ते अग्रेसर असत. पेणच्या पश्चिम भागातील पूरग्रस्त वस्त्यांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. या मदतकार्यामुळे निर्माण झालेली कार्यकर्त्यांची साखळी पुढे श्रीराम जन्मभूमी आंदोलन, श्रीराम ज्योत, श्रीराम शिलापूजन यांसारख्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागात अत्यंत प्रभावीपणे कार्यरत झाली.
पेणमध्ये अच्युतराव प्रारंभी समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने ते मुंबईतील पार्ले आणि गोरेगाव परिसरात आले. तेथे त्यांचा परिचय प्रा. ग. भा. कानिटकर यांच्याशी झाला. त्यांच्या सान्निध्यातून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जोडले गेले. त्या काळात मुंबईत समाजवादी विचारसरणी आणि संघ-जनसंघ विचारसरणी यांच्यात तीव्र वैचारिक संघर्ष चालत असे. या संघर्षातून तावून-सुलाखून निघत अच्युतराव संघनिष्ठ कार्यकर्ते म्हणून घडले.
पुढे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले. त्यावेळी धाराशिव (तेव्हाचा उस्मानाबाद) जिल्ह्यात बाळासाहेब दीक्षित जिल्हा प्रचारक म्हणून कार्यरत होते. प्रचारक जीवन संपल्यानंतरही त्यांची राष्ट्रकार्याची वाटचाल थांबली नाही. त्यांनी काही काळ जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून मुंबईतील कथ्थक भवन येथून व्यवस्था प्रमुखाची जबाबदारी सांभाळली.
जनसंघातील कार्यकाळात अच्युतरावांचा परिचय पुढे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान राज्यपाल राहिलेले रामभाऊ नाईक यांच्याशी झाला. या परिचयाचे रूपांतर घट्ट मैत्रीत झाले. विशेष म्हणजे, अच्युतरावांनी कधीही या मैत्रीचे भांडवल केले नाही. आपल्या जवळच्या संबंधांची फुशारकी मारणे हा त्यांच्या स्वभावात नव्हताच.
पेणमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन संघकार्याला अर्पण केले. विवाहानंतर त्यांच्या संसाराला अल्पावधीतच दुःखाचा स्पर्श झाला. त्यांच्या पत्नीचे २२ मे २००० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या वैयक्तिक आघातानंतरही त्यांनी समाजकार्याचा ध्यास सोडला नाही. त्यांचे घर हे हळूहळू संघकार्याचे केंद्र बनले. प्रचारक, विस्तारक, स्वयंसेवक किंवा बाहेरगावाहून आलेले कार्यकर्ते त्यांच्या ओसरीवर आपली झोळी टांगत आणि आपली निवास-भोजन व्यवस्था निश्चित झाल्याचे समजत. त्यांच्या घराचे दार स्वयंसेवकांसाठी सदैव खुले असे.
पुढे संघकार्यासाठी अधिक जागेची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या भावकीतील ऐतिहासिक, दुमजली, भव्य आणि चिरेबंदी ‘टिळकवाडा’ संघकार्यासाठी उपलब्ध करून दिला. आज पेणमधील कुलाबा जिल्ह्याचे सुसज्ज संघ कार्यालय म्हणून टिळकवाडा कार्यरत आहे. संघकार्याच्या इतिहासात अच्युतकाकांचे हे योगदान विशेष स्मरणीय राहील.
अच्युतराव केवळ संघकार्यापुरते मर्यादित नव्हते. समाजजीवनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पेणच्या कोळीवाड्यात त्यांनी रेशन दुकान चालवून सामान्य जनतेशी जवळीक निर्माण केली. ते जनसंघाचे नगरसेवक म्हणून पेण नगरपालिकेवर निवडून आले. तसेच दीनदयाळ सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काही वर्षे जबाबदारी सांभाळली. वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या निधीतून त्यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ "स्व. यमुनाबाई जनार्दन टिळक कल्याणकारी संस्था" स्थापन केली. आपल्या राहत्या घराचा उपयोगही त्यांनी संस्थेच्या कार्यालयासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला.
त्यांचे संपूर्ण जीवन साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या घराची ओसरी ही सर्वांसाठी खुली होती. वनवासी बांधव, धनगर समाजातील लोक, दूध व्यावसायिक, ग्रामीण भागातील परिचित-अपरिचित व्यक्ती दुपारी तेथे विश्रांती घेत. त्यांनी आपल्या पडवीत विनामूल्य शैक्षणिक वर्ग चालविण्यासही परवानगी दिली होती. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि संयमी होता. राग आला तरी ते कधीही कटू शब्द वापरत नसत. त्यांची नाराजीही सात्त्विक आणि सुसंस्कृत भाषेत व्यक्त होत असे. प्रकृती साथ देत होती तोपर्यंत ते नियमित गणवेशात प्रभात शाखेत उपस्थित राहत.
कै. अच्युतराव टिळक यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकत्वाचे जिवंत उदाहरण होते. त्यांनी उभारलेली कार्यपरंपरा, संघकार्याला दिलेली दिशा, स्वयंसेवकांवरील प्रेम, समाजाविषयीची आस्था आणि साधेपणातून जगलेले आयुष्य हीच त्यांची खरी ओळख आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी निर्माण केलेले संस्कार, त्यांनी घडविलेले कार्यकर्ते आणि त्यांनी जपलेली सेवाभावाची परंपरा यांमधून त्यांचे अस्तित्व कायम जिवंत राहील.