आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट; मंत्री ॲड. आशिष शेलार; भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करणार

    05-Jun-2026   
Total Views |
ashish shelar
 
मुंबई : (Aarey forest) मुंबई उपनगर जिल्ह्यात आरे परिसरातील (Aarey forest) तब्बल ८० एकर रिक्त जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आरे कॅम्प परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी आमदार मुरजी पटेल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, “आरेला कागदावर जंगल म्हणून ओळख मिळाली होती. आता आम्ही ते केवळ नोंदीपुरते न ठेवता प्रत्यक्षात हिरवाईने बहरलेले, समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आहोत. आरे परिसरातील ८० एकर जागेमध्ये ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्याची सुरुवात आज करण्यात येत आहे.”
 
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
 
ते पुढे म्हणाले की, “मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम आहे. या मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीआयएस आधारित नियोजन, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि वृक्षसंवर्धनासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाची वाढ, त्याचे संवर्धन आणि टिकाव यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
 
याशिवाय पारंपरिक वृक्षारोपण पद्धतीसोबतच घनदाट, स्वयंपोषक आणि जैवविविधतेने समृद्ध शहरी जंगले निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीचाही अवलंब करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधत मुंबई उपनगराला अधिक हिरवे, अधिक सुंदर आणि अधिक पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प यामागे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Aarey forest)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....