प्रसिद्ध मराठी सिने कलावंत सांगणार वनदुर्गेची महती
04-Jun-2026
Total Views |
मुंबई (World Environment Day): जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ने आयोजित केलेल्या ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल अॅवॉर्ड फॉर स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स - २०२६’ (World Environment Day) या पुरस्कार सोहळ्यात ‘वनदुर्गेचा जागर’ अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘वन्यवाणी फाऊंडेशन’च्या दिग्दर्शनाअंतर्गत प्रसिद्ध मराठी कलावंत ६० लोककलावंतांसह ‘वनदुर्गेचा जागर’ सादर करतील. सोमवार, दि. ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात रंगणार्या या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेनोलॉजीज प्रा. लि.’ आहेत.
पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील दुर्लक्षित वन्यजीव प्रजाती आणि अधिवासासंदर्भात काम करणार्या १८ संवर्धकांचा सन्मान करण्यात येईल. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, भाजप मुंबई अध्यक्ष अमीत साटम आणि महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. याशिवाय, प्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. मयुर वैद्य, अभिनेत्री मानसी नाईक, मेघा घाडगे, अनघा ठाकूर यांच्या पर्यावरणविषयक नृत्यसादरीकरणाने पुरस्कार सोहळ्याला रंगत येणार आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता विराजस कुलकर्णी तर दिग्दर्शन मकरंद सावंत करणार आहेत. सोहळ्यात सहयोगी संस्था म्हणून ‘आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशन’ सहभागी झाली असून ‘झी २४ तास’ हे टेलिव्हिजन पार्टनर, ‘रेडिओ सिटी ९१.१ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आणि ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ हे रिसर्च पार्टनर आहेत. ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’, ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय’, ‘सह्याद्री निसर्ग मित्र’, ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’, ‘नॅचरलिस्ट फाऊंडेशन’, सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान आणि वनश्री फाऊंडेशन या संस्था ‘इन्स्टिट्यूशनल पार्टनर’ आहेत. पुरस्कार सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. (World Environment Day)
यंदाचे यंग रिसर्चर अवॉर्ड विजेते
डॉ. अमृत भोसले, गोगलगाय संशोधक, कोल्हापूर
पश्चिम घाटामध्ये आढळणार्या गोगलगायींसारख्या दुर्लक्षित वन्यजीवांवर डॉ. भोसले संशोधनाचे काम करत आहे. गोगलगायींच्या सहा नव्या प्रजाती आणि एका पोटजातीचा शोध त्यांनी लावला आहे. दोन विंचू व दोन बेडकांच्या नव्या प्रजातींचा उलगडाही त्यांनी केला आहे. दुर्लक्षित जीवांवर काम करणार्या मोजक्या संशोधकांमध्ये त्यांचा समावेश होतो. (World Environment Day)
डॉ. रेश्मा पितळे, सागरी जीवशास्त्रज्ञ, मुंबई
सागरी जीवांमधील ’फ्लॅटवर्म’ म्हणजेच ’पॉलील्याड’ वर्गावर डॉ. पितळे अभ्यास करत आहेत. असा अभ्यास करणार्या त्या भारतामधील एकमेव शास्त्रज्ञ आहे. त्यांनी ’पॉलील्याड’मधील ३१ प्रजातींची भारतात प्रथमच नोंद केली. तीन प्रजातींचा शोध लावला आहे. सध्या त्या डब्लूडब्लूएफमध्ये कार्यरत असून कांदळवनांवर संशोधन करतात. (World Environment Day)
राकेश आहुजा, बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी, चंद्रपूर
विदर्भातील मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना गंभीर आहेत. या घटनांमध्ये मार्ग दाखवण्याचे काम राकेश आहुजा करत आहे. १२ वर्षांपासून तो विदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनात कार्यरत आहे. ९८ हून अधिक मानवहानीच्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव व वीसहून अधिक प्रोब्लमॅटिक वाघांच्या रेस्यूमध्ये त्याचा सहभाग आहे. एनसीबीएससोबत वाघांच्या आहार विश्लेषण संशोधनात सहभागी आहे. (World Environment Day)