देवगिरीची हिंदूंची सत्ता इस्लामी आक्रमकांनी संपवल्यानंतर, या देशात हिंदूंवरील अन्यायसत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रदीर्घकाळ इस्लामी सत्ताधीशांची सेवा चाकरी करत, त्यांचे अन्याय सहन करण्यातच गेला. या काळात देव, देश, धर्म आणि संस्कृती या सर्वांवर आलेला घाला, उघड्या डोळ्यांनी बघण्यावाचून पर्यायच हिंदूंसाठी ठेवला गेला नाही. मात्र, शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या ध्येयाने ही अन्यायाची काळरात्र संपवली, तर शिवरायांचा राज्याभिषेक हा तर हिंदू साम्राज्याचा सूर्योदय ठरला. त्यानंतर या राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या राजकारण, समाजकारणावर मोठा प्रभाव पडला. या लेखमालेतील या दुसर्या विचारपुष्मामध्ये या प्रभावाचा घेतलेला मागोवा...
भारतीय इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १५९६, आनंदनाम संवत्सरे म्हणजे, फिरंगी दि. ६ जून १६७४ रोजी दुर्गदुर्गेश्वर रायगडावरती शिवरायांचा राज्याभिषेक ‘वेद’घोषात संपन्न झाला. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर हिंदू सार्वभौम सत्तेचे स्वतंत्र सिंहासन, महाराष्ट्राच्या भूमीत स्थापन झाले. भारतावर विविध काळात राज्य करणार्या यावनी सत्तांवर मात करून, महाराजांनी दक्षिणेतील पातशाही दक्षिणेत ठेवून, स्वतःला छत्रपती घोषित केले. ‘सभासद बखर’कार सांगतात, ’या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मर्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट कही सामान्य झाली नाही.’ अखंड भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण घटना होती. ‘आसेतुहिमाचल’ या हिंदुस्थानात सम्राट भरत, प्रभू श्रीराम, सम्राट युधिष्ठिर ते गौतमीपुत्र सातकर्णी, सम्राट अशोक, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप असे लोककल्याणकारी पराक्रमी राजे झाले. त्यापैकी एक राजे म्हणजेच, छत्रपती शिवाजी महाराज.
भारतावर राज्य करणार्या इस्लामिक शासनकर्त्यांनी, भारताची मूळ संस्कृती बदलून त्यांची इस्लामिक संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. येथील जनतेचा हिंदू म्हणून जगण्याचा अधिकारच हिरावून घेण्यासाठी, नानाविध अत्याचारही केले. हिंदूंना जगण्यासाठीही ‘जिझिया कर’ द्यावा लागत होता. यामुळे हिंदूंच्या पुढे दोनच पर्याय उपलब्ध होते, एकतर मुसलमान होणे किंवा जीव गमावणे. मूर्तिभंजन, मंदिरांचे विध्वंस हे सर्वही राजरोसपणे सुरू होते. स्त्रियांची विटंबना, प्रजेला गुलाम म्हणून विकणे, धर्मांतरणेही सुरू होते. अशा काळातच महाराजांनी स्वतःचा, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेक करून घेतला. हा राज्याभिषेक दिवस सर्व हिंदू बांधवांसाठी, एक गौरवशाली व अभिमानास्पदच क्षण होता. कविराज भूषण त्याच्या काव्यात म्हणतात.
बेद राखे बिदित पुरान परसिद्ध राखे
राम नाम राख्यो अति रसना सुघर में|
हिंदुन की चोटी रोटी राखि है
सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो मालाराखी गरमें|
मीड़ि राखे मुग़ल मरोड़ि राखे
पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में|
राजन की हद्द राखी
तेगबल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में॥
कविराज सांगतात, ’छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘वेदां’चे व प्रसिद्ध ‘पुराणां’चे रक्षण केले. प्रभू श्रीरामांचे नाव प्रत्येकाच्या मुखावर राखले, हिंदूंच्या शेंडीचे व त्यांच्या उदरभरणाचे रक्षण केले. शिपायांच्या जानव्याचे व गळ्यातील माळांचेही रक्षण केले. मुघल, तुर्क अशा उन्मत्त झालेल्या सत्ता (पातशाही) यांना रगडून टाकले. शिवरायांनी आपल्या सरहद्दीचे रक्षण करून, आपल्या तलवारीच्या बळावर देवांचे, देवालयांचे व स्वधर्माचे रक्षण केले.’
मुघल राजवटीच्या अभ्यासानंतर असे कळते, सार्वभौम सत्तेसाठी त्यांनी ज्या गोष्टी केल्या, त्याची काही प्रमुख लक्षणे म्हणजे बादशाह प्रत्येक बादशहाने स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी पाडली. संपूर्ण देशभर ‘खुतबा’ (सर्व-सार्वभौमत्वासाठी प्रार्थना करणे) पाडत असे. प्रत्येक बादशहा आपापल्या नावाने ‘जुलूस’ म्हणजे, कालगणना सुरू करत होता. अनेक हिंदू सरदार त्याकाळी मुघलांचे मांडलिक होऊन, त्यांची चाकरी करत होते. शिवाजी महाराजांनी हे सर्व धुडकावून, स्वतःच्याच मस्तकावर छत्र धारण करत स्वतःला ‘छत्रपती’ म्हणवले. राज्याभिषेकनंतर स्वतःची सोन्याची नाणी पाडून घेतली. राज्याभिषेकच्या दिवसापासून हिंदू कालगणनेप्रमाणे ‘शक’ सुरू करुन, त्यास ‘स्वस्ति श्री राज्याभिषेक शक’ असे नावही दिले.
स्वराज्य ते सुराज्याची निर्मिती करताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील प्रत्येक जनतेला प्रेरित केले. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी समृद्ध झाला, तरच देश समृद्ध होतो. याच धोरणाकडे महाराजांनी विशेष लक्ष दिले. यवनांच्या आक्रमणामुळे तुडवल्या गेलेल्या शेतकर्यांना सुरक्षा देऊन, त्यास शेतीसाठी प्रेरित केले. बालपणी जिजाऊ मांसाहेबांसोबत सोन्याचा फाळ लावून नांगरणी केली असताना, सोन्याचे पीक काढण्याचे सामर्थ्य या शेतकर्यांमध्ये असल्याचा संदेश प्रत्येक शेतकर्याला त्यांनी दिला होता. शिवकाळात शेतीसाठी सरकारातून बैलजोडी, बी-बियाणे व अवजारे दिली जात होती. कर-प्रणालीमध्ये सुधारणा करून, शेतकर्यांकडून हा कर जिन्नस किंवा रोखीने स्वीकारला जाई. वेळप्रसंगी शेतकर्यास विना व्याजाचे वामकर्जही दिले जाई आणि शेतकर्याच्या कुवतीप्रमाणे त्याची परतफेड करुन घेतली जाई. शिवरायांच्या ‘आज्ञापत्रा’त रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, असे सांगण्यात आले आहे. रयतेच्या सुखासाठी व कल्याणासाठी, महाराजांनी आपल्या सर्व सैन्याला नियम घालून दिले होते. मुघल आणि मराठासत्तेचा फरक जनतेला दिसू लागल्याने, बळीराजा सुखावला व समृद्धही झाला. मुघल शासनात शेतीची मोजणी, ही बादशहाच्या हातावर अवलंबून असे. शिवकाळात हे नियम बदलून, एका काठीच्या साहाय्याने मोजणी करून देण्यात आली. जमिनीची प्रतवारी करून, कर-प्रणाली ठरवण्यात आली. शेतसारा वसूल करताना प्रजेवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेतली गेली.शिवकालात जिन्नस स्वरूपातील कर ४० टक्के इतका होता व रक्कम स्वरूपात ३३ टक्के इतका घेतला जाई. कोणास नवीन जमिनीत ‘सांचणी’ करायची असेल, तर त्यास काही वर्षे कर माफ असे. शेतकरी सुखावला, गावगाडा व्यवस्थित सुरू झाला. अनेकांचे उद्योगधंदे पूर्ववत सुरू झाले. कर्तव्यदक्ष-प्रजाहित राजा म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती वाढू लागली.
शिवकाळात जी ‘वतनदारी’ पद्धत सुरू होती, ती रद्द करून स्वराज्याच्या संपत्तीचे आम्ही विश्वस्त आहोत, ही भावना सर्वांमध्ये दृढ केली. ज्या सरदार व जहागीरदारांचे खासगी सैन्य होते, त्या सैन्याला स्वराज्याच्या सेवेत सामावून घेऊन त्यास रोख वेतन सुरू केले. तसेच, अशा सैनिकांना स्वराज्यासाठी प्राणपणाने लढण्यासाठीही प्रेरित केले. याच सैन्याच्या बळावर महाराजांनी, अनेक आघाड्यांवरती स्वतः नेतृत्व करत स्वराज्याच्या सीमा वृद्धिंगत केल्या. स्वराज्याचा विस्तार दक्षिणेपर्यंत करण्यात महाराज यशस्वी झाले. साडेतीनशे वर्षांनंतर हिंदुस्तानात स्वतंत्र आरमार निर्माण करून, स्वराज्याच्या सीमा संरक्षित करण्याचे काम महाराजांनी केले. १८ टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंय जाहला, असा ‘सिंधुदुर्ग’ किल्ला पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठीच बांधण्यात आला. त्याचबरोबर जंजिरेकर सिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी, कासा बेटीवर ‘पद्मदुर्ग’ किल्ला बांधण्यात आला. इंग्रजांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘खांदेरी’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. समुद्रावर सत्तासंपादन करून, समुद्रवाटेने येणार्या शत्रूंपासून व्यापारी जहाजांवर लक्ष केंद्रित करून, अनेक साहुकारांना संरक्षण दिले. जागोजागी पेठा वसवत, साहुकारांना तिथे गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. राज्याभिषेकानंतर इंग्रजांनी महाराजांकडे, ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची नाणी चलनात घेण्याची विनंती केली. मात्र, महाराजांनी त्यास साफ नकार देत त्यांना, "आमची नाणी आम्ही पाडून घेत आहोत आणि तीच चलनात येणार,” असे सांगितले. शिवरायांची ही तांब्याची नाणी बराच काळा चलनात होती. बारदेशमधील पोर्तुगीजांचे मीठ स्वस्त दरात विकले जात असल्याने, स्वदेशी मिठाची विक्री कमी होऊ लागली. शिवरायांनी पोर्तुगीजांच्या मिठावरती जबर कर बसवला. स्वराज्यातील स्वदेशी व्यापाराला संरक्षण देत, महाराजांनी स्वदेशी उद्योगधंद्यांना उत्तेजनही दिले.
चारित्र्यसंपन्न शिवाजी महाराजांनी, स्वराज्यातील महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शासन केले. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी, स्त्रीबरोबर बदअंमल करणार्या रांजाच्या पाटलाला ‘चौरंगा’ करत, महिलांवर अन्याय करणार्या प्रत्येकास धाक घालून दिला. आपल्या राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गात कर्तव्याची जाणीव निर्माण केली. यात कुचराई व भ्रष्टाचार करणार्यास कठोर शासन होईल, हे उदाहरणही घालून दाखवून दिले. स्वराज्यासाठी लढणार्या प्रत्येक सैनिकाच्या कुटुंबाची जबाबदारी, त्याच्या पश्चात महाराजांनी घेतली. म्हणूनच, त्यांना ‘लोककल्याणकारी राजा’ असे म्हटले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांना शंभूराजांनी त्यांच्या एका पत्रात ‘म्लेंछक्षयदीक्षित’ म्हणजेच, ‘म्लेंछांचा क्षय करणारे’ असे संबोधले आहे. म्लेंछ राजवटीत हिंदुस्तानातील मठ, मंदिरे व धर्मक्षेत्र उद्ध्वस्त करण्यात आली होती. विविध ठिकाणी मंदिरे पाडून, त्यावर मशिदी बांधण्यात आल्या. शिवरायांनी हिंदूंच्या स्वाभिमानाचे रक्षण करत, मंदिरांचा जीर्णोद्धार सुरू केला. गोव्यातील नार्वे येथील सप्तकोटेश्वराचे मंदिर, त्यांनी पुन्हा बांधले. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम आणि तामिळनाडूमधील समुद्रत्तीरपेरूमल येथील मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे कार्य केले. कल्याण-भिवंडीतील मशिदी उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख, कवींद्र परमानंद यांच्या ‘शिवभारतम्’ या ग्रंथात येतो. देव, देश आणि धर्म या सर्वांचे रक्षण करणार्या महाराजांनी मुसलमानी सत्तांना संदेश दिला की, तुम्ही जर मंदिरे पाडून आमच्या स्वाभिमानाचा अपमान कराल; तर आम्हीही हट्टाने त्याचे पुन्हा पुनर्निर्माण करू. वेंगुर्लेमधील पोर्तुगीज पादर्यांची मस्तके मारून, धर्मांतर करणार्या विघातक राज्यकर्त्यांनाही एक दहशत निर्माण केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून, हिंदू धर्माचे रक्षण करणार्या शिवरायांवर रामदास स्वामी लिहितात-
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही तुम्हा कारणे ॥
भारतात आलेल्या प्रत्येक आक्रमकाने, आपल्या संस्कृतीवर व भाषेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. ‘फारसी’ आणि ‘अरबी’ भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेमध्ये घुसल्यामुळे, ती दूषित झाली होती. त्यामुळे स्वत्व जपण्यासाठीच स्वराज्य संकल्पक शहाजीराजांनी, शिवाजी राजांची मुद्रा ‘संस्कृत’ भाषेतूनच केली. पुढे शिवाजी महाराजांनी मराठीतील ‘फारसी’ आणि ‘अरबी’ शब्द काढून, त्याऐवजी संस्कृतप्रचुर मराठी शब्दांचा एक शब्दकोश निर्माण करून घेतला. या कार्यासाठी रघुनाथपंत हनुमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यासांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याच हस्ते ‘राजव्यवहारकोश’ या ग्रंथाची निर्मिती झाली. एकूण १३८० फारसी शब्दांऐवजी, संस्कृतप्रचुर मराठी शब्द तयार करुन, राज्यव्यवहारात त्यांचा वापरही सुरु केला.
शिवकाळात अनेक ग्रंथांचीही निर्मिती झाली. राज्याभिषेकप्रसंगी गागाभट्ट यांनी ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ रचला. राज्याभिषेकाचे अनेक शास्त्रोक्तविधी त्यामध्ये त्यांनी मांडले. कवी परमानंद यांनी ‘शिवभारतम्’ ग्रंथाची रचना केली. उत्तरेमधील एक कवी कविराज भूषण हे रायगडावर आले होते. त्यांनी वीररसातील ‘ब्रज’ भाषेतील एक काव्यग्रंथ रचला, तो म्हणजे ‘शिवराजभूषण’. शिवकाळातील ‘मोडी लिपी’ ही अधिक सुधारित करण्यासाठी, ‘लेखनप्रशस्ती’ ग्रंथाची रचना झाली. पंचांगशुद्धी करण्यासाठी ‘कर्णकौस्तुभ’ ग्रंथाचीही निर्मिती केली गेली. मीमांसाशास्त्रावर ‘शिवकार्योदय’ हा ग्रंथ, गागाभट्ट यांनीच रचला. शिवपूर्वकाळात जिथे ग्रंथनिर्मिती मंदावली होती, त्याचे पुनरुत्थान करून शिवकाळात व उत्तर काळात विविध ग्रंथांचे निर्माणकार्य सुरू झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव यांच्या नेतृत्वाखाली, मराठ्यांनी आलमगीर औरंगजेबाशी एक प्रदीर्घ काळ झुंज दिली. मराठ्यांचे साम्राज्य जिंकण्याच्या अभिलाषेने दख्खनमध्ये उतरलेल्या औरंगजेब बादशहाला, महाराष्ट्राच्या मातीत गाढण्यातच आपण यशस्वी झालो. कर्तृत्ववान मराठा सरदारांनी महाराजांचीच प्रेरणा घेऊन, कालांतराने स्वराज्याचे एका मोठ्या साम्राज्यात रूपांतरित केले. भारतावर आक्रमण करणार्या अब्दालीला राष्ट्ररक्षणाच्या कर्तव्यभावनेने पराभूत करून, मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला. मराठ्यांनी अहत तंजावर ते तहद पेशावर व अटक ते कटकपर्यंत, हिंदवी साम्राज्याचा विस्तार करत शिवरायांचे स्वप्न साकार केले. १८व्या शतकात भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागांमध्ये, मराठेशाहीचा विस्तार होऊन देशाच्या संस्कृतीरक्षणासाठी मराठ्यांनी फार मोठे योगदान दिले. जिथेपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या, तो भाग हिंदुबहूलच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर, भारतावर पुन्हा कधीच बाह्यशक्तींचे आक्रमण झाले नाही. मंदिर विध्वंस थांबला, मूर्तिभंजन जवळजवळ थांबले, हिंदूंना कधीही ‘जिझिया कर’ द्यावा लागला नाही, गुलामांची विक्री बंद झाली, स्त्रियांवरचे अत्याचार बंद झाले, गावागावांचे नामांतरण थांबले, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मराठेशाहीमुळे साध्य झाल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची कल्पना ही राष्ट्रव्यापी होती. त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या अनुयायांची दृष्टीदेखील तीच होती. शिवाजी महाराजांच्या चरित्राने प्रेरित होऊन, देशाच्या संरक्षणासाठी अनेक योद्ध्यांनी प्राणपणाने या देशाचे संरक्षण केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातदेखील अनेक क्रांतिकारकांना शिवाजी महाराज हे प्रेरणादायी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, या राज्याभिषेक शकाचे हे ३५०वे वर्ष. भारतीय इतिहासातील हा एक सुवर्णक्षण आपण सर्वजण साजरा करत आहोत. शिवरायांचा गौरवशाली व प्रेरणादायी इतिहास हा आदर्शवतच आहे. ‘शिवचरित्रा’तून राष्ट्रउन्नतीचे अनेक धडे आपल्याला पाहायला मिळतात. देव, देश, धर्म आणि संस्कृती टिकवायची असेल; तर ‘शिवचरित्र’ हे एकमेव साधन आहे, ते आजच्या पिढीने अभ्यासले पाहिजे.
- पंकज भोसले