मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमध-स्तस्य तदधो
हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषि ते मन्मथकलाम्|
स सद्यः सङ्क्षोभं नयति वनिता इत्यतिलघु
त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवीन्दु-स्तनयुगाम्॥१९॥
या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी, त्यामागील पार्श्वभूमी ज्ञात असणे आवश्यक आहे. म्हणूनच श्री ललिता सहस्रनामावलीत या श्लोकाच्या अनुषंगाने पंचदशी मंत्राचे जे विवेचन आहे, ते प्रथमतः इथे मांडत आहे. ते आत्मसात केल्यावरच या श्लोकाचा अर्थ आत्मसात होऊ शकेल. हे निरूपण ललितादेवीच्या अत्यंत गूढ सूक्ष्मतम, चितशक्ती स्वरूपाचे वर्णन आहे. देवीचे हे रूप पंचदशाक्षरी मंत्रातून व्यक्त होते. भौतिक पातळीवर तिच्या शरीराच्या तीन भागांतून हा मंत्र आणि हे रूप, पृथकपृथक् स्वरूपात कसे व्यक्त होते त्याचेच वर्णन हे तीन श्लोक करतात. हे वर्णन म्हणजे श्रीविद्या उपासनेचा पाया आहे.
देवीच्या सूक्ष्म रूपाचे वर्णन करणारा पंचदशाक्षरी मंत्र हा वाग्भव कुट, मध्य कुट आणि शक्ती कुट यापासून बनला आहे.
वाग्भव कुट बीजाक्षरे : क ए ई ल ह्रीं
मध्य कुट बीजाक्षरे : ह स क ह ल ह्रीं
शक्ती कुट बीजाक्षरे : स क ल ह्रीं
यांपैकी ‘क’ हे बीजाक्षर तीनवेळा आले आहे आणि ‘ह’ हे बीजाक्षर दोनवेळा आले आहे. ही दोन बीजाक्षरे शिवतत्त्व निदर्शकच आहेत. ‘ह्रीं’ हे बीजाक्षर तीनवेळा आले असून, ते शिवशक्ती ऐयरूपाचे निदर्शक आहे. बाकीची सात बीजाक्षरे ही शक्तितत्त्वाची निदर्शक आहेत. संपूर्ण पंचदशाक्षरी मंत्र हा शिवशक्तैय स्वरूपाचे शब्दबद्ध रूप आहे. त्यामुळेच या मंत्राचे पठण साधकाच्या सर्व इच्छांची पूर्तता करू शकते.
श्रीमद्वाग्भवकुटैक स्वरूप मुखपंकजा : पंचदशाक्षरी मंत्राची सुरुवात येथून होत आसल्याने, त्या मंत्राला सन्मानरूपी ‘श्रीमद्’ हा शब्द वापरला आहे. वाग्भवकुट हे साधकाला ज्ञान आणि बुद्धी देते. इथे देवीच्या मुखकमलाची तुलना, पंचदशाक्षरी मंत्रातील वाग्भव कुटाशी केलेली आहे. हे नाम ज्ञानशक्ती सूचक आहे.
कंठाधः कटिपर्यंत मध्यकुट स्वरूपिणी : देवीच्या गळ्यापासून कमरेपर्यंतचा भाग म्हणजे, पंचदशाक्षरी मंत्राचे मध्य कुट आहे. हे नाम इच्छाशक्ती सूचक आहे. मध्यभागाला कामराज कुट असेही म्हटले जाते; कारण तिच्या अन्तःकरणात सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा असते.
शक्तीकुटैकतापन्न कट्यधोभाग धारिणी : देवीच्या नितम्बापासून तळपायापर्यंतचा भाग म्हणजेच, पंचदशाक्षरी मंत्राचे शक्तिकुट. हे नाम क्रियाशक्ती सूचक आहे. शक्तिकुट हे देवीचे सामर्थ्य, वैभव आणि तिच्या भक्तांच्या कल्याणकारी घटनांचे दर्शन आहे. या नामात ती सृष्टी उत्पन्न करते, त्या सामर्थ्याचे वर्णन आहे. ही तिन्ही नामे अर्थात तिन्ही कुट मिळून देवीचे सूक्ष्म, चिन्मय स्वरूप संसिद्ध होते. हे तिन्ही नाम मिळून पंचदशाक्षरी मंत्र प्रकटतो, जो श्री ललितात्रिपुरसुन्दरी देवीचा आत्मा आहे.
श्री यंत्रातील शिव शक्तैय स्वरूप बिंदूला, वेष्टून असणारा मूलत्रिकोण हा सर्वसिद्धिप्रद चक्र. या त्रिकोणाचे तीन कोण आणि त्यांना अनुक्रमे असणारी नामे खालीलप्रमाणे. पहिले नाम ‘कामेश्वरी’ अर्थात ज्ञानशक्ती. ‘कामेश्वर’ हे शिवाचे सर्वोच्च नाम, अर्थात सगुण ब्रह्म रूपातील नाम आहे. ब्रह्म म्हणजे पूर्ण ज्ञान, त्या अर्थाने कामेश्वरी हे ज्ञानशक्ती सूचक आहे. दुसरे नाम ‘वज्रेश्वरी’ अर्थात इच्छाशक्ती सूचक असून, तिसरे नाम ‘भगमालिनी’ अर्थात क्रियाशक्ती सूचक आहे.
आता आपण मानवी शरीरासंदर्भात हा उल्लेख पाहूया. ‘कामेश्वरी’ हे ईश्वरी चेतनेचे रूप आहे. जीवात्म्याची भौतिक स्वरूपाची इच्छा म्हणजेच काम. काम या इच्छेला जडत्व आणि स्थिरत्व प्रदान करणारी ‘वज्रेश्वरी’ इच्छा शक्ती, म्हणजेच मानवी अस्थी. या भौतिक रूपाला पूर्णत्व येण्यासाठी, त्याला सभोवतालचे पूर्ण ज्ञान होणे आवश्यक असते. तर, तो क्रियारूप होऊ शकतो. त्यासाठी ‘भगमालिनी’ अर्थात, मानवी देह हा नऊ भग अर्थात रंध्रांचा बनलेला आहे. दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, गुदद्वार, लिंग अथवा योनी आणि मुख ही नऊ रंध्रे आहेत. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रिया शक्ती या तिन्ही शक्तीच्या एकत्रीकरणातूनच मानवी देह संपूर्ण होतो. अर्थात, अमूर्त अशा चेतनेला मूर्तत्व प्राप्त होते.
श्रीयंत्र सिद्ध करणारे पंचदशाक्षरी मंत्र, हे देवीचे मंत्र स्वरूप झाले. श्रीयंत्र हे आरेखन तंत्र स्वरूप झाले. मानवी शरीर हे श्रीयंत्राचे भौतिक स्वरूप झाले. संपूर्ण ब्रह्मांड हे व्यापक श्रीयंत्र झाले. अर्थात ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हे तत्त्व या प्रकारे सिद्ध होते. ईश्वरी चेतनेचे हे सर्वव्यापकत्व आणि जीवात्म्याशी त्याचे असणारे हे अद्वैत प्रत्येकानेच समजून घेणे आवश्यक आहे.
मुलमन्त्रात्मिका : मूलमंत्र म्हणजे श्री ललितादेवीच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान देणारा मंत्र. पंचदशाक्षरी मंत्र हा मूलमंत्र आहे. श्री ललितादेवीच्या भौतिक स्वरूपावर हा मूलमंत्र अध्यारोपित केलेला आहे. मूलमंत्राच्यामध्ये श्री ललितादेवीची चैतन्यशक्ती अंतर्भूत असते. साधक जसा जसा मूलमंत्राचे पठण करतो, ती मंत्रशक्ती त्याच्या पठनातून, उच्चारणातून व्यक्त होऊ लागते. ही शुद्ध चेतना त्याच्या शरीरात असणार्या, कुंडलिनीस्वरूप श्री ललितादेवीच्या चेतना शक्तीशी एकरूप होते आणि साधकाची कुंडलिनी जागृत होते.
संपूर्ण विश्वाला व्यापून असणारे चेतनातत्त्व, आपण मंत्रांच्या स्वरूपातून विशिष्ट वारंवारता वापरत उच्चारणाला प्रारंभ करतो. आपल्या शरीरातील निद्रिस्त चेतना ज्यावेळी त्या वारंवारतेच्या पातळीवर येते, त्या क्षणी कुंडलिनी जागृती सुरू होते. आपले शरीर हे जर या चेतनेचे ग्राहक असेल, तर त्याला शुद्ध ठेवणे आवश्यकच आहे, जेणेकरून ते या लहरी स्वीकारू शकेल. त्यासाठी आपली जीवनशैली अधिकाधिक निसर्गानुरूप ठेवणे आणि चित्त शुद्ध ठेवणे महत्त्वाचे. यामुळे या लहरी स्वीकारण्यासाठी आपला ग्राहकेंद्रिये कार्यक्षम राहू शकेल. शिवाय, त्या लहरींचे आपला मेंदू पृथक्करणही करू शकेल. हे साधकानेच करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या अनुरूप जीवनशैली असेल, तर तुमचे चित्त अधिक शुद्ध असते. त्यावरील षड्रिपुंचे लेपन सामान्य असते. मग अशा मानवाच्या नैसर्गिक संवेदना अधिक जागृत आणि अधिक सक्षम असतात. या संवेदना अधिक जागृत असल्यानेच, त्याचा मेंदू सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकतो. असा मानव निसर्गातील ज्ञानतरंगेसुद्धा ग्रहण करण्यास अधिक सक्षम असतो. देवी मूलमंत्र स्वरूप आहे. ती मूर्तिमंत चेतना आहे आणि चेतना ही लहरींच्या रूपात असते. तिचे हे स्वरूप जाणून घेण्यासाठी, साधकानेसुद्धा असे तिच्याशी शुद्ध एकरूप होणे आवश्यक आहे.
मुलकुटत्रय कलेवरा : या मंत्रात देवीचे अतिसूक्ष्म स्वरूप अशा ‘कामकला’ या बीजमंत्राचे वर्णन आहे. ज्यात संपूर्ण पंचदशाक्षरी मंत्र सामावला आहे. देवीच्या सूक्ष्मस्वरूपाचे वर्णन करणारी तीन कुटे ही मूलकुटे असून, ‘कामकला’ हा पंचदशाक्षरी मंत्राचा पाया आहे. त्यामुळे ‘कामकला’ हे बीज तिचे भौतिक आणि सूक्ष्म दोन्ही स्वरूप दर्शवते. त्या अर्थाने ‘कामकला’ हे बीज तिचे अतिसूक्ष्म स्वरूपनिदर्शक आहे. ‘काम’ म्हणजे शिव, त्याची पत्नी अर्थात ‘कला’ म्हणजे ‘कामकला.’ ‘कामकला’चे ‘ईं’ हे बीजाक्षर आहे. या बीजातील वरचा बिंदू हा रविस्वरूप तेजस्वी, शिवशक्त्यैक स्वरूपातील परमात्मा आहे. खालील दोन बिंदू हे अग्नी आणि सोम स्वरूप अर्थात जगत्पोषात्मक आहेत. त्याच्या खालील तत्त्व हे योनी अर्थातच जगत्कारण स्वरूप आहे.
भौतिक स्वरूपात विचार केल्यास, रविरूप बिंदू हे महात्रिपुरसुंदरीचे मुख आहे, अशी कल्पना करावी. त्याखालील दोन बिंदूंच्या रूपाने तिचे स्तनद्वय आहेत, असे समजावे. त्याखालील भाग म्हणजे तिची नाभी ते खालील भाग समजावा. अर्थात ‘ईं’ हे बीजाक्षर संपूर्ण ‘कामकला’ मंत्र आहे. ‘कामकला’ बीज म्हणजे ‘हंस सोहम’ याचे एकरूप मानले जाते. अर्थात, विश्वचेतना शक्ती आणि जीवात्म्यातील चेतना तत्त्व, यांचे एकरूपत्व म्हणजे कामकला बीज. या चेतना तत्त्वाच्या अनुपस्थितीत, जीव हा कलेवर स्वरूप अर्थात शवस्वरूप होऊन जाईल. ‘कामकला’ बीजाशिवाय जीवात्म्याचे भौतिक अस्तित्व असूच शकत नाही. ज्याला ‘हंस सोहम’ म्हटले जाते, तो आपण नाकाने श्वास घेताना येणारा ध्वनी आहे. श्वासाशिवाय जशी जिवंत असण्याचीच कल्पना होऊ शकत नाही, तशी ‘कामकला’ बीजाशिवाय शुद्ध चेतनेची कल्पना येणेही अशक्यच आहे.
- सुजीत भोगले