शिवकालीन शस्त्रविद्येतील उगवता तारा...

    04-Jun-2026   
Total Views |
Rising Star of Shastravidya
 
शस्त्रासोबत शास्त्राचेही शिक्षण घेत, तेच ज्ञान अनेक विद्यार्थ्यांना देण्याचे कार्य करणार्‍या नाशिकच्या जुई महेंद्र नाईक हिच्याविषयी...
 
आजच्या आधुनिक युगात, अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य विकसित करत आहेत. मात्र, आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा अभिमान बाळगत, त्या दिशेने वाटचाल करणारे तरुण तुलनेने कमीच दिसतात. अशा काळात शिवकालीन शस्त्रविद्या, संस्कार आणि राष्ट्रभक्ती यांचा सुंदर संगम घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जुई महेंद्र नाईक. जुई ही मूळची मनमाडची. वडिलांच्या नोकरीनिमित्त ती सध्या नाशिकमध्ये वास्तव्याला आहे. नाशिकच्या ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इयत्ता दहावीत असलेली जुई, गेल्या काही वर्षांपासून शिवकालीन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेत आहे. शस्त्र हाताळण्याबरोबरच, ती भारतीय संस्कृती, इतिहास आणि सनातन मूल्यांचे जतन करण्याच्या व्यापक ध्येयाशीही जोडली गेली आहे.
 
सन २०२१-२२ पासूनच जुईने, कोल्हापूरच्या वेगळूरमधील ‘सव्यासाची गुरुकुल’च्या माध्यमातून, शिवकालीन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये आयोजित एका उन्हाळी शिबिरात, तिच्या शस्त्रविद्येच्या प्रवासाला प्रारंभ झाला. त्यानंतर तिने कोल्हापूरातील दोन आणि नाशिक येथील तीन शिबिरांमध्ये सहभागी होत, आपले कौशल्य सातत्याने विकसित केले.
‘सव्यासाची गुरुकुल’ हे मर्दानी खेळ, धनुर्विद्या, योग, वैदिक शिक्षण, तसेच विविध शस्त्रे आणि शास्त्रांचे प्रशिक्षण देणारे अग्रगण्य गुरुकुल आहे. गुरुकुलाचे प्रधान आचार्य लखन जाधव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली, जुईने शस्त्रविद्येचा अभ्यास जोमाने सुरू ठेवला. शिवाजी महाराजांच्या काळात वापरलेली शस्त्रे आणि विकसित झालेल्या युद्धकलेचा अभ्यास म्हणजेच शिवकालीन शस्त्रविद्या. या प्रशिक्षणामध्ये २०पेक्षा अधिक प्रकारची शस्त्रे शिकवली जातात.
 
जुई सध्या लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा, भाला यांचे प्रशिक्षण घेत असून, ‘नियुद्धा’चेही शिक्षण घेत आहे. ‘नियुद्धा’मध्ये स्वतःकडे कोणतेही शस्त्र नसताना, लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर, हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. नाशिकची ‘वारसा’ संस्था ‘सव्यासाची गुरुकुल’शी संलग्न असून, येथे विद्यार्थी शिवकालीन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेतात. जुई याच संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये सहभागी होते.
 
नाशिकच्या प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘वारसा’ संस्थेचे धारकरी, सलग १४ ते १६ तास शस्त्र-प्रात्यक्षिके सादर करतात. ‘डीजे’ संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर, हा उपक्रम समाजासमोर एक आदर्श निर्माण करतो. नवरात्रोत्सवातही शक्ती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी, विविध मंडळांमध्ये असे कार्यक्रम केले जातात. जुई यामध्येही उत्साहाने सहभागी होते.
 
‘सव्यासाची गुरुकुला’चे वैशिष्ट्य म्हणजे, येथे शस्त्रांबरोबरच शास्त्रांचेही ज्ञान दिले जाते. शिवाजी महाराजांचा इतिहास, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भगवद्गीता’, राष्ट्रजीवनातील घडामोडी आणि भारतीय संस्कृतीवर नियमित बौद्धिक सत्रे होतात. यामुळे जुईच्या व्यक्तिमत्त्वात लक्षणीय बदल झाले आहेत. नियमित व्यायाम आणि प्राणायामांचा तिने, दिनचर्येत समावेश केला आहे. त्यामुळे तिची शारीरिक क्षमता, मानसिक स्थैर्य आणि बौद्धिक विकास अधिक वृद्धिंगत झाला.
 
तिच्यामध्ये आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि सनातन हिंदू धर्माविषयी अभिमानाची भावनाही निर्माण झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ, पाळल्या जाणार्‍या ‘बलिदान मासा’त ती सर्व प्रकारच्या गोड पदार्थांचा त्याग करते. एवढ्या लहान वयात बलिदानाचे महत्त्व समजून त्यानुसार आचरण करणे, हीच तिच्या संस्कारांची साक्ष आहे.
 
जुई आज स्वतः अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही देत आहे. सध्या ती ‘गणशिक्षक’ म्हणून कार्यरत असून, विविध शिबिरांमध्ये नव्या विद्यार्थ्यांना शस्त्रविद्येचे धडे देते. त्यामुळे तिच्यातील नेतृत्व, संघटनकौशल्य आणि जबाबदारीची भावनेचाही विकास होत आहे. जुईच्या कलेची दखल विविध स्तरांवर घेतली गेली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौर्‍यावर असताना, जुई आणि तिच्या समूहाने त्यांच्या समोरच या शस्त्रविद्येची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. ही तिच्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना ठरली.
 
जुईला राज्यस्तरीय ‘हिरकणी पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला आहे. तसेच तिच्या विशेष कलेसाठी, ‘समीद्न्या फाऊंडेशन’तर्फे ‘गुणवंत’ राज्यस्तरीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. आजच्या पिढीसमोर अनेक आकर्षणे आणि आव्हाने आहेत. अशा काळात इतिहास, संस्कृती, आत्मसंरक्षण, शिस्त, व्यायाम आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम साधणारी जुई, अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. शिवकालीन शस्त्रविद्येचा वारसा जपत, शस्त्र आणि शास्त्र यांचा समतोल साधत, नेतृत्वगुण विकसित करत आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन करत असलेली जुई, ही निःसंशयपणे शिवकालीन शस्त्रविद्येतील एक उगवता तारा आहे. तिची ही वाटचाल भविष्यात आणखी उज्ज्वल होवो, हीच अपेक्षा. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक