धर्मांधतेचा बळी

    04-Jun-2026   
Total Views |
Victims of Blind Extremism
 
अखिला या महिलेचे दीड वर्षांचे बाळ वारले. त्याच्या शरीरावर ५१ जखमा होत्या. त्याच्या छातीवर कुणीतरी उभे राहिल्याने, त्याच्या बरगड्या तुटल्या होत्या. त्याच्या गुप्तांगाला आणि पायाच्या तळव्यांना, सिगारेटने चटके देण्यात आले होते. अत्यंत क्रूर पद्धतीने त्या बाळाचा खून झाला. या बाळाचा खून त्याच्या सावत्र पिता अश्करने केला. अश्कर याने त्याची पहिली बीवी अमिना हिच्यावरही असेच अत्याचार केले होते. आता तो अखिला या हिंदू महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होता. पण, तिला पहिल्या पतीपासून झालेल्या बाळाची अश्करला अडचण वाटे. त्यातूनच अश्करने बाळाची हत्या केली. निव्वळ भयानकच!
 
मान्य आहे, पती वारल्यामुळे अखिला एकाकी झाली असेल, तिला आधार हवा असेल; पण अखिलाला अश्करच भेटला? ‘लव्ह जिहाद’मध्ये, अनेक निष्पाप मुली बळी पडत आहेत. कधी या मुली फ्रिजमध्ये, तर कधी सुटकेसमध्ये तुकडे-तुकडे केलेल्या मृतावस्थेत सापडतात. पण, तरीही काही हिंदू महिला-मुलींच्या डोक्यात प्रकाश काही पडत नाही. बकर्‍याने स्वतः कसायाकडे मान द्यावी, तशा या मुली प्रेमाच्या नावाखाली स्वतःहून बळी जाण्यासाठी फसतात. केरळमच्या घटनेत अखिलाचा बळी गेला नाही, तर तिचे पोटचे पोरही क्रूररीत्या बळी गेले. विशेष म्हणजे, या बाळाचा हात काही दिवसांपूर्वीच मोडला होता. त्याबाबत चौकशी केल्यावर तिने उत्तर दिले की, बाळ खाली पडले होते म्हणून त्याचा हात मोडला. मात्र, आता बाळाच्या खुनाने हे उघड झाले की, बाळ पडले म्हणून त्याचा हात मोडला नव्हता. तर, त्या इवल्याशा बाळाला मारहाण झाली म्हणूनच त्याची ती अवस्था झाली होती. हे लिहितानाही हात थरथरतात की, या लहान बाळावर असे अत्याचार करण्याची राक्षसी प्रवृत्ती, त्या अश्करमध्ये कुठून आली? तो सावत्र मुलगा होता. त्याचा बाप अखिल हा हिंदू होता. ते बाळ ‘काफिर’ होते म्हणून? पण, हिंदू म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव, अश्करने ‘अरशद’ ठेवले होते. निष्पाप बाळाचेही धर्मांतरण झालेच होते. दुसरीकडे बाळावर अत्याचार होताना, बाळाच्या आईने सगळे उघड्या डोळ्यांनी पाहिले? तिचे मातृत्व कसे गप्प बसले? बाळाचा खुनी एकटा अश्करच नाही, तर अखिलाही आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये महिला बळी जातात, या घटनेत महिलेचे बाळ बळी गेले. कधी थांबणार हे?
 
वास्तव जगाची जाणीव
 
नुकतीच विरारमध्ये एक घटना घडली. मोबाईल दुरुस्तीसाठी १७ वर्षांच्या मुलीने, तिच्या आईकडे पैसे मागितले. पण, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये मुलांना दोनवेळचे अन्न मिळावे म्हणून राबणार्‍या तिच्या आईने, पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. या रागातून आणि निराशेतून म्हणे त्या मुलीने आत्महत्या केली. या घटनेसारखीच दुसरी घटना म्हणजे, अमृतसरमध्ये बारावी शिकणार्‍या मुलीने आत्महत्या केली. कारण, तिचे वर्गशिक्षक, मुख्याध्यापक तिच्या मैत्रिणीसमोर तिला शालेय शुल्काबाबत हटकायचे. तिला हे सगळे अपमानास्पद वाटले आणि तिने आत्महत्या केली. या कोवळ्या वयाच्या मुलींनी त्यांचे भावविश्व, जीवन उमलण्यापूर्वीच स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केले. त्या अल्पवयीन मुलींबाबत वाईट वाटते पण, या मुलींच्या पालकांच्या मनात आणि आयुष्यात काय वादळ उठले असेल, याची कल्पनाही न केलेलीच बरी.
 
विरारच्या घटनेत एक शल्य कायम आहे की, मोबाईलशिवाय आपण जगूच शकत नाही, इतकी भयाण मानसिकता त्या मुलीची का झाली? जगण्यासाठी तिच्या पालकांना करावा लागणारा संघर्ष आणि लाचारी तिला कधीच दिसली नसेल का? दुसरीकडे शिक्षकांच्या बोलण्याने व्यथित होऊन आत्महत्या करणारी ती मुलगी. या मुलींच्या मनातल्या वेदना शब्दातीत आहेत. पण, तरीही वाटते की अमुक गोष्ट इच्छेविरोधात झाली, म्हणून आत्महत्या करणार्‍यांना स्वतःच्या आयुष्याचे काहीच पडलेले नसते आणि घरातल्यांचेही काही सोयरसुतक नसेल, असेच वाटते. कारण, बहुसंख्य पाल्यांना त्यांच्या पालकांचा संघर्ष माहितीच नसतो. आईबाबांनी जन्म दिला, आता त्यांनी आमचे सगळे हट्ट पुरवलेच पाहिजेत, अशी मानसिकता पाल्याची असते. मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवयच कुठे असते? एखाद्या वळणावर आयुष्याचे क्रूर वास्तव समोर आले की, मग अशी मुले कोलमडून जातात. संघर्षाची जिद्द ते आणणार कुठून? त्यामुळे आपण जे जगतो, त्यापलीकडे ते खूप मोठे जग आहे. कष्ट केले, ध्येयासाठी संघर्ष केला, तर चांगल्या माणसांसाठी जग खूपच सुंदर आहे हे सत्य पाल्यांच्या पुढे आणायलाच हवे. तरीही, प्रश्न आहेच की, आत्महत्या करणारे हे दुर्बल मानसिकतेचे बळी असतात की, काल्पनिक आभासी जगण्याचे बळी असतात?




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.