सोन्यानंतर आता चांदीचे हॉलमार्किंगही बंधनकारक होणार; ग्राहकांना मिळणार शुद्धतेची हमी

    04-Jun-2026
Total Views |
Silver Hallmarking Mandatory In India
 
नवी दिल्ली (Silver Hallmarking Mandatory In India) : सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता चांदीच्या दागिन्यांवर आणि वस्तूंवरही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) सध्या चांदीच्या अनिवार्य हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तयारी करत आहेत.
 
ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी या निर्णयाचे समर्थन करताना गुणवत्ता ही ग्राहकांच्या विश्वासाचा पाया असल्याचे सांगितले. गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन केल्याशिवाय देशांतर्गत उद्योगांची प्रगती आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.(Silver Hallmarking Mandatory In India)
 
सध्या चांदीसाठी हॉलमार्किंग व्यवस्था ऐच्छिक स्वरूपात लागू आहे. मात्र, १ सप्टेंबर २०२५ पासून HUID (Hallmark Unique Identification) आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. आता पुढील टप्प्यात चांदीच्या दागिन्यांवर आणि वस्तूंवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत अंतिम अधिसूचना आणि अंमलबजावणीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. (Silver Hallmarking Mandatory In India)
 
 
 
या निर्णयामुळे ग्राहकांना खरेदी करताना चांदीची शुद्धता निश्चितपणे तपासता येणार आहे. बनावट किंवा कमी दर्जाची चांदी विक्रीला आळा बसणार असून प्रत्येक हॉलमार्क केलेल्या वस्तूवर असलेल्या HUID क्रमांकाद्वारे तिची माहिती ऑनलाइन पडताळता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक कमी होऊन सराफा बाजारातील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, सोन्यानंतर चांदीच्या हॉलमार्किंगला बंधनकारक स्वरूप दिल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल, तसेच भारतीय सराफा उद्योगाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांशी सुसंगत बनविण्यास मदत होईल. त्यामुळे देशांतर्गत बाजारासह निर्यात क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Silver Hallmarking Mandatory In India)