मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हिंदू कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण, फसवणूक, तसेच धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने नाशिक न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १,५०० पानांच्या या आरोपपत्रात साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि तपासातील निष्कर्षांचा समावेश असून अनेक नव्या नावांचा आणि आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचाही उल्लेख यात असल्याचे दिसते आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे हे पहिले आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. यात दानिश एजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार, निदा एजाज खान आणि एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन माजिद पटेल यांना मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे, फसवणुकीद्वारे शारीरिक संबंधांसाठी संमती मिळवणे, बलात्कार, धार्मिक भावना दुखावणे आणि आरोपींना आश्रय देणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्याही तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.
या आरोपपत्रातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो इम्तियाज जलील यांच्या नावाचा. तपासादरम्यान निदा खान फरार असताना तिच्या ठिकाणाबाबत चौकशी करताना त्यांचे नाव समोर आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून मतीन पटेल यांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी वारंवार 'तुम्हाला इम्तियाज जलील साहेबांनाच विचारावे लागेल' असे उत्तर दिले. पोलिसांनी हे जबाब आरोपपत्रात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले आहे.
आरोपपत्रात आपले नाव आल्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी आपणास त्याबाबत सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. ते म्हणालेत की, कोणतीही चौकशी झाली तरी त्याला सामोरे जाण्यास मी तयार आहे. मी यापूर्वीही संबंधित मुलीच्या कुटुंबाला भेटल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले आहे आणि जे योग्य वाटते त्यावर मी ठाम राहीन. दरम्यान, मतीन पटेल यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी आपल्या अशिलाचा मुख्य आरोपांशी कोणताही संबंध नसून त्यांना राजकीय हेतूने लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला आहे.
निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप
आरोपपत्रानुसार, नाशिक न्यायालयाने निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मतीन पटेल यांनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव-कौसर सिडको परिसरात आश्रय दिला होता. यामध्ये तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी यांचाही समावेश होता. तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे की, सखोल चौकशीनंतर मतीन पटेल यांनी संबंधित ठिकाणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून निदा खानला अटक केली. त्यानंतर ती लपून राहत असलेली इमारत बेकायदेशीर बांधकाम असल्याचा दावा करत प्रशासनाने ती पाडली. या कारवाईवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. इम्तियाज जलील यांनी सार्वजनिकरित्या या पाडकामाला विरोध केला होता आणि एआयएमआयएमतर्फे त्या जागेवर अधिक चांगली इमारत उभारून देण्याचे आश्वासन दिल्याचेही वृत्त आहे.
डिजिटल पुराव्यांवर भर
एसआयटीच्या आरोपपत्रात तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पोलिसांनी पीडित महिला आणि आरोपी यांच्या मोबाईल फोनमधून व्हॉट्सअॅप संभाषणे, स्क्रीनशॉट्स, ई-मेल्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक नोंदी जप्त केल्याचे सांगितले आहे. पहिल्या एफआयआरमधील तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे कथित शोषण २०२२ मध्ये सुरू झाले. दानिश शेखने लग्नाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक केली आणि दीर्घकाळ संबंध ठेवताना शारीरिक, आर्थिक व मानसिक शोषण केल्याचा आरोप तिने केला आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक