अर्जुनाची प्राप्ती करण्यासाठी साधकरूप कुंतीला पुन्हा ‘दुर्वास मंत्र’ म्हणजेच, सहन करण्यास कठीण असलेल्या साधनेचा उपयोग आणि इंद्र अवस्थेशी एकरूप होण्यासाठी इंद्राला आपला पती निवडावे लागले. म्हणूनच अर्जुन इंद्राचा पुत्र दाखविला असला, तरी तो पंडुपुत्रच मानला आहे. इंद्र म्हणजे इंद्रियांचा स्वामी जीवात्मा. याचा ऋग्वेदात पुढील उल्लेख आहे.
ये अर्वाञ्चस्ताँ उ पराच आहूर्ये पराञ्चस्ताँ उ अर्वाच आहुः|
इंद्रश्च या चक्रथुः सोम तानि धुरा न युक्ता रजसो वहन्ति॥
(ऋग्वेद १|१६४|१९)
अर्थात, ‘जे अगदी जवळ आहे (अर्वाञ्चस्ताँ उ) ते अति दूर आहे (पराच आहुर्य) आणि जे अति दूर आहे, ते अगदी जवळ आहे. (पराञ्चस्ताँ उ अर्वाच आहुः) बैल जसा आपल्या खांद्यावर नांगराची धुरा घेऊन, एका शेताचा बांध उल्लंघून दुसर्या शेतात जातो. त्याचप्रमाणे इंद्र म्हणजे जीवात्मा जन्मप्राप्त जीवदशेचा त्याग करून, दुसर्या जन्मप्राप्त जीवदशेत मागील कर्माची धुरा म्हणजे संस्कार घेऊन जातो. जीवसृष्टीचे सारे ज्ञान आणि विज्ञानसुद्धा उपरोक्त ऋग्वेदाच्या ऋचेमध्येच आहे.
ख्रिश्चन आणि मुस्लिमांप्रमाणे साम्यवादीही पुनर्जन्म मानीत नाहीत! ख्रिश्चन आणि मुस्लीम त्यांच्या प्रेषिताला मानतात, तर साम्यवादी काहीच मानत नाहीत. त्यांच्या मते, शरीरातील रासायनिक क्रियांमुळेच शरीर जिवंत असते. ज्यावेळी, त्या बंद पडतात, त्याला ‘मृत्यू’ म्हणतात. जीवनयात्रा चालवण्यासाठी कोणताही जीवात्मा असतो, असे समजण्याची जरासुद्धा आवश्यकता नाही. वैदिक परंपरेचा चार्वाकही हेच सांगत होता. तो सांगत असे, ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः?’ हे शरीर मृत्यूनंतर भस्म होऊन जाते, जे पुनः मिळत नाही. म्हणून पुनर्जन्म नाही, आत्मा नाही आणि परमात्माही नाही. आहे तो केवळ जडाचा व्यवहार. आजच्या साम्यवाद्यांनी चार्वाकाची हीच कल्पना उचलली आहे. चार्वाकाच्या या सिद्धांताचा त्यानंतरच्या विचारधारांवर, धर्मपंथांवर खूपच परिणाम झाला. चार्वाकानंतर बौद्ध परंपरा उत्पन्न झाली. ही बौद्ध परंपरा आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक आणि स्वर्गप्राप्तीसाठी केल्या जाणार्या यज्ञयागाला मानीत नव्हती. ते म्हणत असत, ‘सर्वं चञ्चलं, सर्वं क्षणिकं!’ सर्व गतिमान आहे, म्हणूनच सर्व क्षणिक आहे. अज्ञेयवाद आणि षड्दर्शनांचे अधिकांश सिद्धांतसुद्धा, याच चार्वाकाच्या मतावर आधारित आहेत. हा सिद्धांत सांगणार्याचे नाव ‘चार्वाक’च ठेविले आहे; परंतु त्याचे मूळ नाव जगाला माहीत नाही. ‘चार्वाक’ नावाचा अर्थ मोठाच सुंदर आहे. ‘चारु वाकः इति चार्वाकः’. म्हणजेच ज्याची वाणी चारु म्हणजे सुंदर व आकर्षक आहे, तो चार्वाक! म्हणजे चार्वाक सर्वांनाच मोहित करतो आणि तो आजही करीत आहे. आजच्या साम्यवाद्यांच्या ‘डायलेटिस’ सिद्धांत यावरच आधारित आहे.
वैदिक परंपरेने शरीराला चालविणारी एक स्वतंत्र जीव अवस्था मानली आहे, ज्याला जीवात्मा म्हणतात. जीवदशेपासून मुक्त जीवात्म्याला ‘आत्मा’ म्हणतात. तो सर्वांपासून दूर, सर्वस्थित, सर्वचालक आहे. याच ‘आत्मा’ शब्दावरून पाश्चात्य जगतात ‘एतम’ अर्थात ’अॅटम’ शब्द आला. जीवात्मा किंवा आत्मा ही आता काल्पनिक अवस्था मानण्याची आवश्यकता नाही. अलीकडेच एका रशियन वैज्ञानिकाने नव्या छायाचित्रणाचा शोध लावला आहे. त्या छायाचित्रणाचे नाव ‘किरलिअन छायाचित्रण’ आहे. ज्यामुळे शरीराभोवताली जो दिव्य प्रकाश असतो, त्याचे छायाचित्र घेणे शय झाले आहे. प्रत्येक शरीराभोवताली हे प्रकाशवलय असतेच. हे प्रकाशवलय झाडांभोवती, तसेच झाडांच्या पानाभोवतीसुद्धा असते. मानवी शरीराच्या बाबतीत, त्याचा प्रभाव अधिक आणि परिपूर्ण दिसून येतो. विशेष करून मानवी शरीराच्या डोयाभोवती हे प्रकाशवलय अधिक व्यापक आणि दिव्य असते. ‘किरलिअन छायाचित्रणा’द्वारे शरीराची अनेक सूक्ष्म छायाचित्रे घेतली असून, स्वतः लेखकाने कॅनडामध्ये तयार केलेल्या छायापट्टीमध्ये ते बघितले आहे. एका व्यक्तीचा डावा हात सहा महिन्यांपूर्वी खांद्यापासून तुटला होता. त्याचे ‘किरलिअन छायाचित्रण’ घेतल्यानंतर, त्याच्या तुटलेल्या हाताचे चित्र आले नाही. पण, त्या तुटलेल्या हाताच्या सभोवती पसरलेल्या प्रकाशवलयाचे प्रकाशचित्र स्पष्ट दिसत होते. आता नसलेल्या हाताच्या प्रकाशवलयाचे ‘किरलिअन छायाचित्रण’ कसे आले, याचे वैज्ञानिकांना कोडे पडले आहे. अशाच प्रकारे सर्व शरीर जरी नष्ट झाले, तरी या सूक्ष्म ‘किरलिअन छायाचित्रा’मध्ये मानवी शरीराभोवती संपूर्ण प्रकाशवलय अवश्यच दिसेल. या प्रकाशमय अस्तित्वालाच ‘जीवात्मा’ म्हणतात, जो जडशरीर नष्ट झाल्यावरही कधीच नष्ट होत नाही. हाच जीवात्मा पूर्व शरीर नष्ट झाल्यावर मातेच्या गर्भात असलेल्या नव्या शरीरात जन्म घेतो. आयुर्मर्यादा असेपर्यंत या नव्या शरीरात संचार करतो आणि ते शरीर नष्ट झाल्यावर, पुनः नव्या शरीराच्या शोधार्थ जातो. यासाठी ‘जीवात्मा’ नावाची अवस्था मानावी लागते, ज्याचा उल्लेख आधी दिलेल्या ऋग्वेदाच्या ऋचेत आहे.
आणखी एका सूक्ष्म निरीक्षणावरून जीवात्मा दशा मानावी लागते. एखादा पुरुषाच्या निधनानंतर त्याचे शरीर जर आठ दिवसांपर्यंत ठेवल्यास असे दिसून येते की, त्या मृत शरीराच्या चेहर्यावर दाढीमिशा वाढलेल्या आहेत. सर्व शरीर एकदम मृतवत होत नाही. शरीराचे काही भाग जशी त्वचा, काही काळापर्यंत कार्यरत राहते. याच कारणामुळे शरीराच्या मृत्यूनंतर त्वचेवर केस वाढतात. म्हणजेच शरीरात जीवात्मा नसतानासुद्धा, शरीर आपले वृद्धिकार्य चालूच ठेवते. जीवनयात्रेत शरीर किंवा प्रकृतीसुद्धा एक स्वयंभू अवस्था आहे, जी जीवात्म्याच्या आधीनही आहे व जीवात्म्यापासून स्वतंत्रही आहे. म्हणूनच प्रथम पुरुष (गॉड, अल्ला वा भगवान) की, प्रथम प्रकृती या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर भगवद्गीतेत १३व्या अध्यायाच्या १९व्या श्लोकामध्ये दिलेले आहे. हे उत्तर आजच्या ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी लोकांना चिंतनीय आहे. गीतेद्वारे भगवान वेदव्यास सांगतात,
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादि उभावपि|
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्॥
अ.१३. श्लो.१९
पुरुष आणि प्रकृती या दोघांनाही, तू अनादि म्हणजे सृष्टीचे मूळ मान. रागद्वेषादी विकार, त्याचप्रमाणे त्रिगुणात्मक पदार्थसुद्धा प्रकृतिपासून उत्पन्न झाले आहेत, हे जाण. म्हणूनच पुरुष म्हणजे आत्मा-जीवात्मासुद्धा आदि आहेत आणि प्रकृतीसुद्धा आदिच आहे. ते एकमेकांशिवाय राहू शकतात, पण काही काळपर्यंतच.
- योगिराज हरकरे