भारताची प्राचीन परंपरा असलेली चारधाम यात्रा सध्या सुरु असून, भविकांचा उत्साह या धामांमधील गर्दीतूनच दिसून येत आहे. भारत हा परंपरांनी नटलेला देश आहे. येथे सगळ्याच परंपरा या श्रद्धेने साजर्या होतात. चारधाम यात्राही देखील त्यापैकीच एक. मात्र, याचा इतिहास फार प्राचीन आहे, आदि शंकराचार्यांनी प्रारंभ केलेल्या या यात्रेच्या एका वेगळ्या स्वरुपाचा घेतलेला मागोवा...
भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मामध्ये तीर्थयात्रेला मानवी जीवनाचा, सर्वोच्च आध्यात्मिक प्रवास या दृष्टीने पाहिले जाते. या प्रवासाचे अंतिम शिखर म्हणजेच ‘महा चार धाम यात्रा’ होय. मोक्षप्राप्ती, आत्मशुद्धी आणि ईश्वराशी एकरूप होण्यासाठी, अनादि काळापासून चालत आलेली ही एक अत्यंत पवित्र आणि शास्त्रोक्त परंपरा आहे. आदि शंकराचार्यांनी पुनरुज्जीवित केलेली ही यात्रा, आजही कोट्यवधी भाविकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. सनातन धर्मातील ‘धाम’ या शब्दाचा खरा अर्थ, ‘निवासस्थान’ किंवा ‘पवित्र गृह’ असा होतो. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू जेव्हा भूतलावर मानवाच्या कल्याणासाठी प्रकट झाले, तेव्हा त्यांनी भारताच्या चारही दिशांना आपली चार विशेष निवासस्थाने निर्माण केली. या चार दिशांना असलेल्या चार मिंदिरांच्या एकत्रित प्रवासालाच, ‘महा चार धाम यात्रा’ असे संबोधले जाते.
या भौगोलिकदृष्ट्या विशाल असलेल्या चार धामांमध्ये, उत्तर दिशेला उत्तराखंडच्या गढवाल हिमालयात अलकनंदा नदीच्या काठी वसलेले भगवान विष्णूंचे ‘बद्रीनाथ’ हे पहिले धाम आहे. येथे भगवान नारायण आजही तपश्चर्येत लीन असल्याचे मानले जाते. पूर्व दिशेला ओडिशामधील समुद्रकिनार्यावर स्थित ‘जगन्नाथ पुरी’ हे दुसरे धाम. येथे भगवान श्रीकृष्ण त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह, लाकडी मूर्तींच्या रूपात निवास करतात. येथील वार्षिक रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेला तामिळनाडूतील एका बेटावर वसलेले ‘रामेश्वरम्’ हे तिसरे धाम असून, जे एक अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंग आहे. प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी, येथे महादेवाची स्थाापना करून पूजा केली होती. चौथे धाम म्हणजे पश्चिम दिशेला गुजरातच्या समुद्रकिनार्यावर वसलेली ‘द्वारका’ नगरी होय. जी भगवान श्रीकृष्णाची कर्मभूमी आणि ‘द्वारकाधीश मंदिर’ म्हणून ओळखली जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू बद्रीनाथ येथे स्नान करतात, द्वारकेत वस्त्र परिधान करतात, पुरी येथे भोजन करतात आणि रामेश्वरम् येथे विश्रांती घेतात. म्हणूनच या चार क्षेत्रांना संपूर्ण विश्वात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये ‘प्रदक्षिणा’ किंवा ‘परिक्रमा’ या संकल्पनेला महत्त्व असून, चार धाम यात्रेची एक शास्त्रोक्त पद्धत प्राचीन काळापासून निश्चित आहे. ही यात्रा नेहमी घड्याळाच्या काट्याच्याच दिशेने पद्धतीने पूर्ण केली जाते. याची सुरुवात भारताच्या पूर्व दिशेकडून होते. नियमांनुसार, यात्रेकरू सर्वप्रथम पूर्व किनार्यावरील जगन्नाथ पुरी येथे जाऊन, महाप्रभू जगन्नाथाचे आशीर्वाद घेतात. पुरीहून निघालेला हा भक्तीचा प्रवास, पुढे दक्षिणेकडे सरकतो. यात्रेकरू दुसर्या टप्प्यात तामिळनाडूतील रामेश्वरम् धामामध्ये पोहोचतात. जेथे समुद्रस्नान करून महादेवाची आराधना केली जाते. त्यानंतर, परिक्रमेचा रोख पश्चिमेकडे वळतो. तिसर्या टप्प्यात भाविक गुजरातच्या द्वारका नगरीत, द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होतात. यानंतर परिक्रमेचा अंतिम आणि चौथा टप्पा, उत्तर दिशेकडील बद्रीनाथ धामामध्ये संपतो. येथे भगवान विष्णूंचे दर्शन घेतल्यानंतरच, चार धाम यात्रा पूर्ण मानली जाते.
या चार धाम यात्रेची धार्मिक परंपरा, परिक्रमा स्वरूपात आदि शंकराचार्यांनी सुरू केली. आदि शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार पीठांची, म्हणजेच मठांची स्थापना केली. तसेच, या चार प्राचीन धामांचेही पुनरुज्जीवित रूप समाजासमोर आणले. त्यांनी भारताला केवळ भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही एका सूत्रात बांधण्यासाठी चार धाम यात्रेची घडी बसवली. जेणेकरून उत्तरेतील माणूस दक्षिणेत आणि पूर्वेतील माणूस पश्चिमेत जाऊन, तिथली संस्कृती अनुभवू शकेल.
सनातन धर्माच्या नियमांनुसार, चार धाम यात्रा ही मानवासाठी संपूर्णपणे ‘ऐच्छिक’ आहे. कारण, हिंदू भक्तिमार्गात शारीरिक क्षमता आणि मानसिक तयारीला सर्वाधिक प्राधान्य दिलेले आहे. ही यात्रा सर्व वयोगटातील आणि सर्व आश्रमांतील व्यक्तींसाठी खुली आहे. विशेषतः विवाहित व्यक्तीने, ही यात्रा आपल्या पत्नीसह करावी. कारण पती-पत्नीने सोबत केलेली यात्रा कुटुंबासाठी अत्यंत कल्याणकारी मानली जाते. अविवाहित तरुण किंवा संन्यासी पुरुष व स्त्रियादेखील आपल्या आत्मोन्नतीसाठी, ही यात्रा एकट्याने करू शकतात.
शास्त्रानुसार ही यात्रा पूर्ण श्रद्धेने पूर्ण करतो, त्याला मोक्षप्राप्ती होते. व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास, संपूर्ण भारताचे दर्शन घेतल्यामुळे मानवाचा संकुचित प्रांतीय दृष्टिकोन नष्ट होतो. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची भावना त्याचेठायी निर्माण होते.
जर एखाद्या भाविकाला गरिबी, आर्थिक चणचण, शारीरिक दुर्बलता, गंभीर आजारपण किंवा वृद्धत्वासारख्या मर्यादांमुळे ही यात्रा साध्य झाली नाही, तर त्यासाठी शास्त्रात अत्यंत सोपे पर्यायी मार्ग सांगितले आहेत. आपल्या घरातच एका शांत ठिकाणी बसून, चारही धामांचे मनोमन स्मरण करून ‘मानसिक यात्रा’ही करू शकता. आपल्या राहत्या घराच्या जवळील पवित्र स्थानिक नद्यांमध्ये, स्थानिक देवतेचे दर्शन घेणेदेखील पुण्यकारक मानले गेले आहे. तसेच एखाद्या भुकेलेल्याला अन्न देणे, असाहाय्य व्यक्तीची सेवा करणे आणि विशेषतः आपल्या वृद्ध माता-पित्याची मनोभावे सेवा करणे, ही तर चार धाम यात्रेपेक्षाही मोठीच तीर्थयात्रा.
आपल्या प्राचीन धार्मिक साहित्यात चार धाम यात्रेचे आणि तिच्या अमोघ फळांचे असंख्य गौरवशाली उल्लेख आढळतात. लंकेवर चढाई करण्यापूर्वी, प्रभू श्रीरामचंद्रांनी रामेश्वरम् येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. तर, ‘विष्णू पुराणा’त आणि ‘भागवत पुराणा’त बद्रीनाथ क्षेत्राचा उल्लेख ‘बदरिकाश्रम’ म्हणून येतो, जिथे नर आणि नारायण यांनी सृष्टीच्या कल्याणासाठी हजारो वर्षे तपश्चर्या केली. महाभारताच्या ‘वनपर्व’ आणि ‘तीर्थयात्रा पर्व’ यांमध्ये, भारतातील या सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांचे, नद्यांचे आणि त्यांच्या दर्शनामुळे मिळणार्या पुण्याचे विवेचन आहे. पांडवांनी आपल्या अज्ञातवासात आणि नंतर स्वर्गारोहणाच्यावेळी, हिमालयातील पवित्र क्षेत्रांची यात्रा केली होती. पुराणांनुसार या धामांच्या केवळ स्मरणाने किंवा दर्शनानेच, मनुष्याला एकाचवेळी अनेक अश्वमेध यज्ञ आणि वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य लाभते.
देशातील अनेक महान विभूतींनी, या यात्रेच्या माध्यमातून भारताला जोडण्याचे काम केले. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाने अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या होत्या; तर महाभारताच्या काळात धर्मराज युधिष्ठिरानेही आपल्या सर्व भाऊ आणि द्रौपदीसह संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली होती. आदि शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर पायी प्रवास करून, या धामांची पुनर्स्थापना केली. तर, मध्ययुगीन काळात संत कबीर, गुरू नानक देव, संत नामदेव महाराजांसारख्या थोर संतांनीही या धामांना भेटी दिल्या.
गुरू नानक देवांनी आपल्या प्रसिद्ध ‘उदासी’ प्रवासादरम्यान, पुरी आणि रामेश्वरम् या दोन्ही क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट दिली होती. मराठा साम्राज्याच्या सुवर्णकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे रक्षण केले, तर त्यानंतरच्या काळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीही या चारही धामांच्या दुर्गम मार्गांवर यात्रेकरूंसाठी भव्य धर्मशाळा, घाट बांधले. तसेच, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारही केला, अन्नछत्रे सुरू केली. चार धाम यात्रा हा केवळ एक बाह्य प्रवास नसून, तो माणसाला स्वतःच्या अंतरात्म्याकडे आणि ईश्वराकडे घेऊन जाणारा एक महान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सेतू आहे. यात्रेतून भारतीयत्व दृढ होते.
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज