सत्य नाकारण्याची शिक्षा

    04-Jun-2026
Total Views |
 
Europe
 
दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’ या मराठी म्हणीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच युरोप! जगाला अक्कल शिकवण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेणार्‍या युरोपला, स्वत:च्या समस्यांकडे बघण्यास मात्र उसंत नसल्याचेच म्हणता येते. कारण असे की, नुकतेच ब्रिटनमधील स्त्रियांच्या दुरवस्थेचे जळजळीत वास्तव समोर आणणारे कथन ब्रिटनच्या संसदेत करण्यात आले. ब्रिटनमधील खासदार रुपर्ट लोवे यांनी कशाप्रकारे पाकिस्तानी घुसखोरांकडून चालवली जाणारी ‘ग्रुमिंग गँग’ ब्रिटनच्या महिलांना लक्ष्य करते आहे, याचे पुरावेच संसदेच्या पटलावर ठेवले. यामध्ये त्यांनी न्यायालयासमोर दिलेल्या साक्षींचे वाचनही जाहीरपणे केले. ते वाचूनच सभ्य समाजाची तळपायाची आग मस्तकात गेल्यावाचून राहणार नाही.
 
लोवे यांनी वाचन केल्यानुसार, या ‘ग्रुमिंग गँग्स’मधील नराधमांनी काही मुलींना पिंजर्‍यात डांबून त्यांच्यावर बलात्कार केले. तसेच बलात्कार करणार्‍यांची संख्या ७००च्या वर असल्याचेही एका मुलीने न्यायालयाला साक्षीमध्ये सांगितल्याचे खासदार लोवे यांनी संसदेला सांगितले. तसेच हे अत्याचार इतके पाशवी असतात की, प्राण्यांचाही वापर अत्याचार करण्यासाठी झाल्याचेही काही पीडित मुलींनी त्यांच्या साक्षीमध्ये सांगितले आहे. काही मुलींनी स्थानिक पोलीसदेखील या सगळ्यात सहभागी असल्याचेही त्यांच्या साक्षीमध्ये सांगितले आहे.
 
ब्रिटनमध्ये ‘ग्रुमिंग गँग’च्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या मुलींमध्ये वय वर्षे ११ ते १६ वयोगटातील मुलींची संख्या लक्षणीय आहे. यामध्येही बहुसंख्य मुली या गरीब घरातील असल्याचे समोर आले आहे. ‘ग्रुमिंग गँग’च्या कार्यपद्धतीमध्ये मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांना दारू आणि अमली पदार्थांचे व्यसन लावणे, त्यानंतर अत्याचार करण्याचा प्रकार सर्रास आढळला आहे. तसेच ईदच्या दिवसामध्ये हे प्रकार वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. ब्रिटनमध्ये ‘ग्रुमिंग गँग’च्या नावाची चर्चा २००२ पासून होते आहे. मात्र, आजवर गेली २४ वर्षे तेथील शासनाला याला आवर घालणे शक्य झाले नाही. स्वत:ला सभ्यतेचे मेरुमणी म्हणवत, जगाला सभ्य-संस्कृतीचे ज्ञानामृत पाजण्याचे व्यसन जडलेल्या या युरोपीय देशांना काहीच कसे वाटत नाही, हे देवच जाणे. युरोपीय युनियनच्या उपाध्यक्षा काजा कल्लास यांनी अलीकडच्या पाकिस्तानच्या दौर्‍यात, काश्मीर प्रश्नात नाक खुपसण्यापेक्षा युरोपातील लेकींवर पाकिस्तानी घुसखोर करत असलेल्या अन्यायाचा जाब विचारला असता, तर ती पीडितांच्या वेदनांवरची फुंकर ठरली असती.
 
‘अति सर्वत्र वर्जयेत्’ याचाच विसर पडलेल्या युरोपीय देशांनी उदारतेचे सेतू बांधत घुसखोरांना कवटाळले. त्यावेळी मानवतेचे फलक घेऊन तेथील नागरिकच रस्त्यावर स्वागताला उभे राहिले होते. आज या घुसखोरांनी युरोपच्या केलेल्या अवस्थेला, फक्त ‘भयावह’ हाच शब्द योग्य ठरू शकतो. म्हणूनच, या घटना युरोपच्या स्थलांतर धोरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतात. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपने मानवतावाद, बहुसांस्कृतिकता ही तत्त्वे स्वीकारली. परंतु, कोणत्याही मूल्याची कसोटी त्याच्या अंमलबजावणीत असते. स्थलांतरित प्रस्थापितांशी कसे वागतात हे बघणे, ही राज्याची जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडण्यात अनेक युरोपीय देश अपयशी ठरल्याचे चित्र दिसते.
 
यातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, या अत्याचारांवर जागतिक स्त्रीवादी धुरिणांचे सोयीस्कर मौन! स्त्रीसुरक्षेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत असणार्‍या अनेक संघटनांनी, या प्रकरणांबाबत मात्र कमालीचे मौन बाळगण्यातच धन्यता मानली आहे. अलीकडे स्त्रीवादी चळवळ भरकटल्याची होणारी टीका, हे स्त्रीवाद्यांच्या अशाच वर्तनाचे फळ आहे.
 
ब्रिटनमधील ही ‘ग्रुमिंग गँग’ची प्रकरणे एका व्यापक वास्तवाची आठवण करून देतात. मानवतावाद आवश्यकच आहे. परंतु, तो वास्तवदर्शी असला पाहिजे. बहुसांस्कृतिकताही महत्त्वाचीच; परंतु तिचा पाया समान कायदा आणि समान उत्तरदायित्व यांवरच उभा राहू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही समाजात पीडितांच्या आक्रोशापेक्षा राजकीय सोयीस प्राधान्य दिले गेले; तर त्याची किंमत अखेरीस संपूर्ण समाजालाच मोजावी लागते. ब्रिटनमधील स्त्रियांवरील अन्यायांनी दिलेला हा धडा केवळ त्या देशापुरताच मर्यादित नाही; तो आधुनिक युरोपसमोरील एका गंभीर प्रश्नाचे प्रतीक आहे.
 
- कौस्तुभ वीरकर