व्ही. एन. देसाई रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला;-रुग्णांना मोठा दिलासा

    03-Jun-2026
Total Views |
V N Hospital
 
मुंबई : (V N Desai Hospital) मुंबईतील व्ही. एन. देसाई महापालिका रुग्णालयात मयुरा नागले यांनी वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतच रुग्णसेवा, स्वच्छता, तपासण्या आणि वैद्यकीय सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
रुग्णालयात सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देत सर्व मजल्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. औषधांचा तुटवडा दूर करून आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असून रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याची वेळ येऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. पूर्वी रक्त, लघवी, एचआयव्ही आणि इतर अनेक तपासण्यांसाठी रुग्णांना बाहेर पाठविले जात होते. मात्र आता आवश्यक किट्स, रिएजंट्स, एक्स-रे फिल्म्स आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिल्याने बहुतांश तपासण्या रुग्णालयातच होत आहेत. प्रयोगशाळा चोवीस तास आणि तिन्ही पाळ्यांमध्ये सुरू ठेवण्यात आली असून आपत्कालीन रुग्णांनाही तत्काळ सेवा मिळत आहे.
 
अनेक दिवसांपासून बंद असलेली गर्भवती महिलांसाठीची सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बाह्य तज्ज्ञ रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे. सीटी स्कॅन सेवेमध्येही पारदर्शकता आणण्यात आली असून पूर्वी कॉन्ट्रास्ट इंजेक्शनसाठी रुग्णांना सुमारे १८०० रुपये खर्च करावे लागत होते. आता हे इंजेक्शन रुग्णालयाकडून उपलब्ध करून दिले जात असल्याने रुग्णांचा आर्थिक भार कमी झाला आहे. महानगरपालिकेने निश्चित केलेल्या किमान शुल्कामध्येच सीटी स्कॅनचा अहवाल आणि प्लेट उपलब्ध करून दिली जात आहे.
 
 
रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील अपूर्ण दुरुस्ती आणि गळतीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गळती झाल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी छताच्या वॉटरप्रूफिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा गळतीची समस्या उद्भवू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रुग्णालयातील स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी करण्यात आली असून निष्प्रयोज्य साहित्य आणि कचरा हटविण्यात आला आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी ५७ मल्टिपर्पज लेबर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छता आणि सहाय्यक सेवांमध्ये सुधारणा झाली आहे.
 
रुग्ण आणि नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वॉटर प्युरिफायर, डिस्पेंसर, बसण्यासाठी बाके, पंखे आणि प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करण्यात आली असून डॉक्टरांनी ओपीडी, वॉर्ड, आयसीयू आणि शस्त्रक्रिया विभागातील जबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णालयात दररोज सुमारे १५०० रुग्णांची ये-जा होत असून १८२ कार्यान्वित खाटांपैकी सुमारे १४० खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत.(V N Desai Hospital)
 
"व्ही. एन. देसाई रुग्णालयात पूर्वी अनेक सेवा उपलब्ध नव्हत्या. काही तपासण्या बाहेर कराव्या लागत होत्या, औषधांचा प्रश्न होता आणि काही विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता होती. माझ्या पूर्वीच्या प्रशासकीय आणि वैद्यकीय अनुभवाच्या आधारे या सर्व अडचणी टप्प्याटप्प्याने दूर करण्याचा प्रयत्न केला. आज सर्व विभागांमध्ये डॉक्टर उपलब्ध आहेत, प्रयोगशाळा तिन्ही पाळ्यांमध्ये सुरू आहे, आवश्यक औषधे उपलब्ध आहेत आणि शक्य तितक्या सर्व सेवा रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांना योग्य वेळी, चांगल्या वातावरणात आणि कमीत कमी खर्चात उपचार मिळावेत, यालाच आमचे प्राधान्य आहे," असे वैद्यकीय अधीक्षक मयुरा नागले यांनी सांगितले.
 
"रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षा लक्षात घेऊन सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळाली असून कामकाजातील पारदर्शकताही वाढली आहे,"
- मयुरा नागले, वैद्यकीय अधीक्षक,व्ही एन देसाई(V N Desai Hospital)