‘काँग्रेस नेते आणि केरळमच्या तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरुर यांनी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ हे ‘अनावश्यक लादलेले पाऊल’ असल्याचे विधान केले. ‘वन्दे मातरम्’ विषयी आदर असल्याचे सांगत, प्रत्येक शासकीय कार्यक्रमापूर्वी संपूर्ण राष्ट्रीय गीताच्या नियमाबाबत मात्र थरुर साहेबांना आक्षेप! एवढेच नाही, तर केरळममधील काँग्रेस सरकारने संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ आवश्यक नसल्याचा निर्णय घेतल्याचेही थरुर म्हणाले. पण, मुळात प्रश्न हाच की, संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ला थरुर यांचा विरोध तो का? ‘वन्दे मातरम्’चे एक कडवे गाण्यासाठी अवघ्या ३० ते ३५ सेकंदांचा वेळ लागतो, तर सहा कडव्यांच्या संपूर्ण ‘वन्दे मातरम्’साठी साधारण ३ मिनिटे, १० सेकंदांचा अवधी लागतो. त्यामुळे देशाच्या, भारतमातेच्या सन्मानासाठी अवघी तीन मिनिटेही थरुर यांना उभे राहवत नाही का? आता नाही म्हणायला, शशी थरुर यांचे वयवर्षे ७० असून, ते वयोमानापरत्वे ‘ज्येष्ठ नागरिक’, तरी ‘अभी तो में जवान हूँ’ असाच त्यांचा ‘चिरतरुण’ तोरा! मग मनाने आणि शरीरानेही ‘फिट’ असलेल्या थरुरांना तीन मिनिटांसाठी देशाप्रति आदर व्यक्त करणे मुळात जड जाण्याचे कारणच नाही.
परंतु, इथे प्रश्न थरुरांच्या वैयक्तिक स्वास्थ्याचा नव्हे, तर पक्षीय प्राधान्याचा आहेच. म्हणजे, एरव्ही काँग्रेस सरकारविरोधात थरुर रोखठोक भूमिका जरुर घेतात. मोदी सरकारच्या समर्थनार्थही भाष्य करतात. पण, आता प्रश्न केवळ काँग्रेस हायकमांडचा नाही. कारण, त्यांच्या स्वतःच्या गृहराज्यात आता काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’चे सरकार स्थापन झाले आहे. थरुरांविषयी केरळमच्या काँग्रेसमध्ये दीर्घकालीन नाराजीच्याही चर्चा अधूनमधून माध्यमांत झळकतात. तेव्हा, आपण अजूनही ‘काँग्रेसी’ आहोत, हे सिद्ध करण्याबरोबरच, नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्याशीही जुळवून घेण्यासाठी थरुरांनी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची पक्षीय भूमिकाच पुढे दामटवलेली दिसते. ‘वन्दे मातरम्’ला काँग्रेसचा विरोध म्हणा लपून राहिलेला नाहीच. कारण, काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या ‘मुस्लीम लीग’साठी ‘वन्दे मातरम्’ म्हणजे जणू कानात शिसे ओतल्याचीच भावना! एवढेच काय, तर सतीशन यांच्या शपथविधीवेळीही ‘वन्दे मातरम्’ सुरू होताच, प्रियांका गांधींनी राहुल यांना खुणावले आणि राहुल यांनी हाताशी धरून सतीशन यांना लगोलग उभे केले. त्यामुळे, काँग्रेसला जसे ‘वन्दे मातरम्’चे वावडे, तीच गत थरुरांची!
तृणमूलचा तुकडा पडता...
२०२२ साली जी गत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची झाली, तशीच परिस्थिती आता प. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची होऊ घातली आहे. फरक एवढाच की, शिवसेना ठाकरे मुख्यमंत्री असतानाच फुटली आणि तृणमूल काँग्रेसचा दीदींच्या पराभवानंतर तुकडा पडण्याची दाट शक्यता आहे. पण, शेवटी काय, महाराष्ट्रात वाघाची शेळी झाली आणि बंगालमध्ये वाघिणीची बकरी!
त्याची पहिली झलक रविवारीच दिसून आली. ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या एकूण ८० आमदारांच्या बोलावलेल्या बैठकीत फक्त २० आमदारांनी हजेरी लावली. तब्बल ६० आमदारांनी या बैठकीपासून दूर राहणेच पसंत केले. तसेच ममतादीदींनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद शोभनदेव चट्टोपाध्याय यांना दिल्यानंतर, तृणमूलमधील अंतर्गत संघर्ष अधिकच उफाळून आला. तृणमूलचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी विरोधी पक्षनेत्याच्या पत्रावरील त्यांच्या स्वाक्षर्या बनावट असल्याचा दावा केला. या प्रकरणी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ‘सीआयडी’ चौकशीचे आदेश देताच, वरील दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली. त्यामुळे आता या दोन आमदारांसह अन्य दोन तृतीयांश आमदार हे स्वतंत्र गट स्थापन करून, ‘तृणमूल काँग्रेस’ हे पक्षाचे नाव आणि चिन्हावरही उभा दावा ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जे घडले, त्याचीच पुनरावृत्ती बंगालमध्ये होण्याची शक्यता अधिक. तृणमूलमधील फुटीचे मुख्य कारण म्हणजे, दीदींचा भाचा आणि पक्षाचे महासचिवपद असलेले अभिषेक बॅनर्जी. एकाधिकारशाही, भ्रष्टाचार ते पक्षाला ‘आयपॅक’च्या इशार्यावर त्यांनी नाचायला भाग पाडले. त्यामुळे तृणमूलच्या पराभवामागे अभिषेक बॅनर्जी हेच प्रमुख कारण असल्याचे बहुसंख्य आमदारांचे मत. याचा कुठेतरी सुगावा लागल्यामुळेच दीदींनी कदाचित अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा बनाव रचला, जेणेकरून जनतेची सहानुभूती पदरात पडेल आणि माध्यमांचे लक्षही तृणमूलफुटीच्या चर्चांवरून अभिषेक बॅनर्जींकडे वळेल. असो. पण ते म्हणतात ना, ‘होनी को भला कौन टाल सकता हैं...’ तेव्हा, सत्ताही गेली, आता आमदारही जातील आणि मागे उरतील ते फक्त भाचा आणि आत्याबाई!