सिब्बल, लाजू नका, आता निघाच!

    03-Jun-2026
Total Views |
Sibal Leave India Now
 
ज्या देशाने आपल्याला इतका मानसन्मान दिला, त्या देशात राहण्याची लाज वाटणारे अनेक दांभिक उच्चभ्रू आजही याच देशात सुखनैव नांदत आहेत. कारण, भारताबाहेर आपल्याला कोणी विचारत नाही आणि भारताइतके अभिव्यक्ती स्वातंत्र्य जगात अन्यत्र कुठेच नाही, हे त्यांनाही पक्के ठाऊक. पण, अशा नतद्रष्टांची आता देशालाही गरज नाही. ज्यांना भारतात असुरक्षित वाटते किंवा येथे राहण्याची लाज वाटते, त्यांनी तत्काळ त्यांना हव्या त्या देशात चालते होणे, हेच योग्य!
 
तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे पाहून ज्येष्ठ वकील व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना अतीव दु:ख झाले. इतकेच नव्हे, तर "या हल्ल्यामुळे आपल्याला भारतात राहण्याची लाज वाटते,” असे निर्लज्ज उद्गारही त्यांनी काढले. खरं तर गेल्या १२ वर्षांत सिब्बलसारख्या अनेकांना भारतात राहण्याची लाज वाटू लागली होती. गंमत म्हणजे, अशी लाज वाटणारे सारे लोक आजही भारतात सुखनैव नांदत आहेत आणि सिब्बलही यापुढे भारतातच राहतील.
 
अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूर येथे झालेला हल्ला हा त्यांनीच सत्तेत असताना सामान्य बंगाली जनतेविरुद्ध जी दुष्कृत्ये केली, त्याचीच एक संतप्त प्रतिक्रिया. भारताच्या इतिहासात कोणत्याही राजकीय नेत्याने आपल्या पक्षाला मत न दिल्यास, सामान्य मतदारांना जिवे मारण्याच्या इतक्या धमक्या उघडपणे दिल्या नसतील, जितक्या अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्या. निवडणूक प्रचारात आपल्याला मत न दिल्यास लोकांना ‘हरिबोल’ (अंत्ययात्रेत उच्चारले जाणारे शब्द) ऐकावे लागेल, फाल्ता मतदारसंघात लवकरच विजेवर चालणारी दहनभूमी उभारली जावी, म्हणजे निवडणूक निकालानंतर होणार्‍या मृतांचे लवकर दहन करता येईल, यांसारख्या गंभीर आणि भीषण धमया त्यांनी उघडपणे दिल्या. संदेशखाली व अन्य भागांत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या संशयित विरोधकांच्या घरी पांढरी साडी व उदबत्त्या पोहोचविल्या जात असत. आमच्या विरोधात मतदान केल्यास त्या घरातील पुरुषांची हत्या होईल, हा त्यामागील संदेश. इतकेच नव्हे, तर देशाचे गृहमंत्री असलेल्या अमित शाह यांनाही त्यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी "दुपारी १२ वाजल्यानंतर बंगालमध्ये थांबून दाखवावे,” असे आव्हान दिले होते. दुसर्‍यांना जिवे मारण्याची धमकी देणे, हा अभिषेक बॅनर्जी यांचा आवडता उद्योग. त्यांनी पोसलेल्या गुंडांनी गेली १५ वर्षे प. बंगालमध्ये प्रचंड हैदोस घातला होता. त्यांच्या राजवटीत शेकडो आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे निघाले.
 
आता सत्ता गेल्यावर त्यांच्याविरोधात जनतेच्या मनातील हा असंतोष उफाळला असल्यास नवल नव्हे. तरीही काही राजकीय तज्ज्ञांच्या मते आपल्याला सहानुभूती मिळावी, यासाठी अभिषेक बॅनर्जी यांनी स्वतःच हा हल्ला घडवून आणला होता. तपासानंतर काय ते स्पष्ट होईलच. पण, खासदार असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या या सौम्य हल्ल्यामुळे सिब्बल कळवळले असतील, तर त्यांचा हा कळवळा ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत कुठे गेला होता? ममतांच्या राजवटीत प. बंगालमध्ये राजरोस राजकीय हत्या होत होत्या. भाजपच्या ३०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या बंगालमध्ये निर्घृण हत्या झाल्या असून, त्यापैकी अनेक हत्यांच्या तक्रारीही पोलिसांनी नोंदवून घेतलेल्या नाहीत. अनेक हत्यांचा तपास केवळ कागदावरच राहिला. कार्यकर्ते सोडा, केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकार्‍यांवरही राजरोस हल्ले झाले होते. या सर्व हल्ल्यांवर सिब्बल यांनी ना कधी दु:ख व्यक्त केले, ना निषेध नोंदवला. यंदाच्या निवडणुकीदरम्यान खुद्द राहुल गांधींनीच ममतांवर टीका केली होती. ममतांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचीही हत्या केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. पण, सिब्बल यांनी तेव्हाही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
 
सिब्बल यांना लाज वाटण्यासारख्या अनेक घटना ते स्वत: काँग्रेस पक्षात असताना घडल्या होत्या. मात्र, तेव्हा सिब्बल यांना भारतात राहण्याची क्षणभरही लाज वाटली नव्हती. १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यातून हिंदू पंडितांना रातोरात हुसकावून लावण्यात आले होते, तेव्हा किंवा काश्मिरी पंडितांच्या दिवसाढवळ्या हत्या होत होत्या व हिंदू महिलांची अब्रू लुटली जात होती, तेव्हा सिब्बल यांना लाज वाटली नव्हती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात व दिल्लीत हजारो शिखांची हत्या झाली, तेव्हाही सिब्बल यांना लाज वाटली नव्हती. ते मंत्री असलेल्या संपुआ सरकारने भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला होता, तरीही सिब्बल यांना कसलीच लाज का वाटली नाही? आणि राज्यसभेची उमेदवारी दिली नाही, म्हणून काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाच्या ‘सायकल’वर स्वार झालेल्या सिब्बल यांचा निलाजरेपणा तर अगदी जगजाहीर!
 
अर्थात, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक अतिशहाण्या उच्चभ्रू व कलाकारांना भारतात राहणे एकाएकी असुरक्षित वाटू लागले होते. अमूक झाले, तर आपण भारत सोडून निघून जाऊ, यांसारख्या वल्गना करणारे हे सारे उच्चभ्रू आजही भारतातच आणि अधिक सुखात नांदत आहेत. त्यांच्या जिवाला आज कोणाहीकडून धोका उत्पन्न झालेला नाही. कारण, त्यांची अन्य कोणत्याही देशात काहीही किंमत नाही. भारताइतके अभिव्यक्ती स्वातंत्र्य अन्य कोणत्याही देशात उपलब्ध नाही, हे त्यांनाही नक्कीच ठावूक आहे. म्हणूनच केवळ प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये केली जातात, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट!
 
खरं म्हणजे, सिब्बल यांची गणना ‘एक नामवंत वकील’ म्हणून केली जाते. पण, ते कशासाठी इतके ‘नामवंत’ आहेत, ते अनाकलनीयच. त्यांनी ज्या ज्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारविरोधात बाजू मांडली, ते सर्व खटले ते हरले आहेत. रामसेतू, बाबरीवाद, तिहेरी तलाक, मुख्तार अन्सारी, संजय दत्त, नॅशनल हेराल्ड केस, सुब्रतो रॉय सहारा, उमर खालीद जामीन, प. बंगालमध्ये एसआयआर रद्द करणे किंवा ‘कलम ३७०’ रद्द करणे यांसारखे सर्व खटल्यात ते पराभूतच झाले. अनेक खटल्यांत त्यांनी केलेल्या युक्तिवादाच्या न्यायालयाने चिंधड्या उडविल्या. त्यामुळे खटले हरण्यातील त्यांचे प्रावीण्य पाहून बहुधा त्यांना ‘नामवंत वकील’ म्हणून गणले जात असावे. असो.
 
सिब्बल यांना भारतात राहण्याची इतकीच लाज वाटत असेल, तर त्यांनी तत्काळ आपले चंबुगबाळे बांधून जगात हवे तिकडे जावे. त्यांनी आता थांबू नये. ज्या देशात ते जन्मले आणि ज्या देशाने त्यांना केंद्रीय मंत्रिपदी बसविले, मानसन्मान दिला, त्या देशाबद्दल असे उद्गार काढणार्‍या सिब्बलसारख्या कृतघ्न व्यक्तींची देशाला गरज नाही. तेव्हा सिब्बलजी, तुम्ही आता भारतात थांबू नकाच, तातडीने चालते व्हा!