संघसंस्कारांतून घडलेले शिक्षणव्रती कार्यकर्ते

    03-Jun-2026
Total Views |
Avinash Ramchandra Tambe
 
एखाद्या व्यक्तीचे आयुष्य केवळ त्याच्या व्यक्तिगत यशाने मोजले जात नाही, तर त्याने समाजासाठी केलेल्या कार्याने आणि पुढील पिढ्यांसाठी निर्माण केलेल्या प्रेरणेने त्याचे खरे मूल्यमापन होते. कै. अविनाश रामचंद्र तांबे यांचे जीवन हे अशाच समर्पित, राष्ट्रनिष्ठ आणि समाजाभिमुख कार्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
 
अविनाश तांबे यांचा जन्म ५ जून १९३१ कराची येथे डॉन्यून्स यांच्या नर्सिंग होम मध्ये झाला. ते अशा कुटुंबात वाढत होते, ज्यामध्ये शिक्षण, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवा यांना विशेष महत्त्व होते. त्यांचे वडील रामचंद्र तांबे हे मूळचे बडोद्याचे. त्यांनी बडोद्याच्या कलाभवनमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि तत्कालीन मुंबई प्रांतातील शेतकी खात्याच्या यांत्रिक विभागात १९१६ पासून सेवा सुरू केली. ठाणे, पुणे आणि पुढे १९१८ मध्ये कराची येथे त्यांची बदली झाली.
कराची येथे तांबे कुटुंब स्थायिक झाले. विविध भाषिक आणि सांस्कृतिक समाजांमध्ये वाढताना अविनाशरावांना व्यापक सामाजिक दृष्टी आणि सर्वसमावेशकतेचे संस्कार लाभले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराचीतील एम. एस. अडवाणी प्राथमिक शाळेत झाले.
 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या टप्प्यात आणि फाळणीच्या अस्थिर वातावरणात तांबे कुटुंबालाही मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी कुटुंबातील सदस्यांना सुरक्षिततेसाठी बडोद्याला हलविले. त्या काळातील विस्थापन, अनिश्चितता आणि नव्याने जीवन उभारण्याचा संघर्ष हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा अनुभव ठरला.
 
कराचीहून भारतात स्थलांतर करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली मदत तांबे कुटुंब कधीही विसरले नाही. मुंबईत आगमनानंतर गिरगावातील ब्राह्मण संघात निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या प्रसंगाने त्यांच्या मनात संघकार्याबद्दल अधिक आत्मीयता निर्माण झाली.
 
अविनाशरावांच्या आयुष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार बालपणापासूनच रुजले. १९३८ मध्ये कराची येथे आलेले संघाचे प्रचारक चं. प. भिशीकर (बापू) यांच्या सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. ते आणि त्यांचे मोठे बंधू अरुण तांबे नियमितपणे शाखेत जात असत. शाखेतील शिस्त, राष्ट्रभक्ती, संघटनकौशल्य आणि सेवाभाव या गुणांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दृढ पाया दिला. पुढे संपूर्ण आयुष्यभर त्यांनी या मूल्यांचे पालन केले.
 
बालपणापासूनच त्यांना शारीरिक शिक्षण, खेळ आणि साहसी उपक्रमांची आवड होती. बडोद्यामध्ये मल्लखांब, कुस्ती आणि पोहण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कराचीला परतल्यानंतर त्यांनी सी-स्काऊटमध्ये प्रवेश घेतला. स्काऊट प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारच्या नौकांचे संचालन, समुद्री शिस्त, कवायती आणि अगदी बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. कराचीजवळील आयएनएस बहादूर आणि आयएनएस दिलावर या केंद्रांवरील प्रशिक्षणामुळे त्यांच्यात धैर्य, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित झाले.
१९५५ मध्ये ते मुंबईत आले. प्रारंभी नोकरीसाठी संघर्ष करावा लागला. मात्र या काळात कराचीतील जुन्या परिचयातील कुटुंबांशी त्यांचे घनिष्ठ संबंध कायम राहिले. समाजातील परस्पर सहकार्य आणि आपुलकीची भावना त्यांनी जपली. १९६० नंतर त्यांचा सामाजिक आणि सार्वजनिक कार्यातील सहभाग अधिक व्यापक झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला.
 
पुढे भारतीय जनसंघ, जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. निवडणुकांच्या काळात घराघरांत जाऊन संपर्क करणे, पत्रके वाटणे, मतदारांशी संवाद साधणे आणि कार्यकर्त्यांचे संघटन करणे अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर-पूर्व विभागाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही वर्षे जबाबदारी सांभाळली.
 
१९७५-७७ च्या आणीबाणीच्या काळात संघावर बंदी आली असताना अनेक स्वयंसेवकांप्रमाणे त्यांनीही कठीण परिस्थितीत संघकार्याशी आपली निष्ठा कायम ठेवली. राष्ट्रहित आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी या काळात विशेषत्वाने दिसून आली. अविनाशरावांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे शिक्षणक्षेत्रातील त्यांचे योगदान होय. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह या नात्याने त्यांनी १९७६ ते २०१४ या जवळपास चार दशकांच्या कालखंडात अत्यंत प्रभावी नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय क्षमता आणि सामाजिक प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली.
 
शाळेत संघाचे अनेक उपक्रम त्यांच्या सहाय्याने पार पडले. ज्यामध्ये संघाच्या विविध बैठका प्रशिक्षण शिबिरे पार पडली व असे संघाचे उपक्रम यशस्वी होण्यासाठी ते खूप मेहनत घेत असत. शिक्षक शिक्षण क्षेत्राच्या गरजा ओळखून डी.एड. आणि बी.एड. अभ्यासक्रमांसाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदकडून मान्यता मिळविण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
 
२००४ मध्ये नव्या शैक्षणिक इमारतीच्या उभारणीचे काम सुरू करून त्यांनी संस्थेच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली. अविनाश तांबे यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष होते. विस्थापनाचा संघर्ष, राष्ट्रसेवेचे संस्कार, सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक नेतृत्व आणि शिक्षणक्षेत्रातील दीर्घकालीन योगदान या सर्व पैलूंनी अविनाश तांबे यांचे जीवन समृद्ध झाले होते. त्यांनी जपलेली मूल्ये आणि उभारलेले कार्य आजही अनेकांना प्रेरणा देणारे आहे. राष्ट्रनिष्ठा, सेवा आणि शिक्षण यांचा सुंदर संगम असलेले त्यांचे जीवन पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.