दोन जागांवर बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश; नाशिकचा पेच कायम

    03-Jun-2026   
Total Views |
Ravindra Chavan
 
 मुंबई : (Ravindra Chavan) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून महायुतीच्या नेत्यांकडून त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुरु आहेत. अशाच तीन जागांवर बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बंडखोरी मोडित काढण्यासंदर्भात बैठक पार पडली. दरम्यान, आज (दि. ४ जून) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून सर्वत्र घडामोडींना वेग आला आहे.
 
अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये कोण?
 
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी शिवसेनेचे आ. महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, वरीष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
 
 
तसेच छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून भाजपतर्फे सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र सुनील सत्तार यांनीही याठिकाणी अर्ज दाखल केला होता. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर ते आपला अर्ज मागे घेणार असल्याचे समजते.
 
नाशिकचा पेच कायम
 
नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतू, तिथे भाजपचे गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंधूंची मनधरणी करण्यासाठी मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये पोहोचले. पण दोन्ही बंधू निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन हे गोकुळ गीतेंशी चर्चा करणार असून या चर्चेनंतर ते आपला निर्णय घेणार असल्याचे समजते.(Ravindra Chavan)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....