पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईची तारांबळ; अंधेरी सबवे जलमय, महामार्गांवर वाहतूक कोंडी

    03-Jun-2026
Total Views |
MUMBAI RAIN
 
मुंबई : (Mumbai Rain) मुंबईत बुधवारी सकाळी झालेल्या हंगामातील पहिल्याच मोठ्या पावसाने शहराची अक्षरशः तारांबळ उडाली. पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबई, मध्य उपनगर, मीरा रोड आणि विरार परिसरात जोरदार सरी कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली आणि कार्यालयीन वेळेत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
 
अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, वांद्रे, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मीरा रोड आणि मरीन ड्राइव्ह परिसरात सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पाऊस पडला. यामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने सकाळी 7.40 वाजता वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाणी उपसल्याने सुमारे 45 मिनिटांनंतर, सकाळी 8.24 वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
 
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, सकाळी 7 ते 8 या एका तासात पश्चिम उपनगरांत सरासरी 9.84 मिमी पावसाची नोंद झाली. वर्सोवा पंपिंग स्टेशन परिसरात सर्वाधिक 69 मिमी पाऊस झाला, तर कूपर रुग्णालय परिसरात 52 मिमी, के-पूर्व विभागात 49 मिमी आणि के-पश्चिम विभागात 46 मिमी पाऊस (Mumbai Rain) नोंदविण्यात आला.
 
पावसाचा सर्वाधिक फटका वाहतुकीला बसला. पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH), पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), जोगेश्वरी-विख्रोळी लिंक रोड (JVLR) आणि पवई परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. वाकोला, कालिना, जोगेश्वरी उड्डाणपूल तसेच मुलुंड-कांजूरमार्ग पट्ट्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवाशांनी सामाजिक माध्यमांवर वाहतूक व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली.
 
 
दरम्यान, हंगामातील पहिल्याच पावसात ईस्टर्न फ्रीवेवर चेंबूर-वडाळा बोगद्याबाहेर एका कारचा अपघात झाला. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने कार घसरून कठड्याला धडकली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक संथ झाली.
 
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 8 आणि 9 जूननंतर पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच जोरदार सरींनी मुंबईची परीक्षा घेतली असून आगामी मान्सूनमध्ये महापालिका आणि यंत्रणांच्या तयारीची खरी कसोटी लागणार आहे. (Mumbai Rain)