म्हाडाच्या तीन महत्त्वाकांक्षी समूह पुनर्विकास प्रकल्पांसाठी वित्तीय निविदा उघडल्या; अदानी प्रॉपर्टीज व जेएसडब्ल्यू समूहाच्या कंपनीची बाजी
03-Jun-2026
Total Views |
मुंबई : (MHADA Redevelopment) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या आदर्श नगर (वरळी), वांद्रे रेक्लेमेशन आणि सरदार वल्लभभाई पटेल (एस.व्ही.पी.) नगर, अंधेरी (पश्चिम) येथील समूह पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधकाम व विकास संस्था नियुक्त करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांच्या वित्तीय बोली नुकत्याच उघडण्यात आल्या.
आदर्श नगर, वरळी तसेच वांद्रे रेक्लेमेशन या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अदानी प्रॉपर्टीज प्रा. लि. ही कंपनी उच्चतम निविदाकार ठरली आहे. तर एस.व्ही.पी. नगर, अंधेरी (पश्चिम) प्रकल्पासाठी हनुरा रियल्टी प्रा. लि., चांडक रियलटर्स प्रा. लि., प्रेमसागर इन्फ्रा रियल्टी प्रा. लि. आणि वॅनटियर रियल्टी प्रा. लि. यांच्या संयुक्त समूहाने सर्वाधिक बोली सादर केली आहे. हनुरा रियल्टी प्रा. लि. ही जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडची उपकंपनी आहे.
या तिन्ही प्रकल्पांसाठी उच्चतम निविदाकारांच्या निविदा स्वीकृतीचा प्रस्ताव संबंधित प्रकल्पांसाठी गठित करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. समितीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल.
या प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया ८ एप्रिल २०२६ रोजी सुरू करण्यात आली होती. बोली सादर करण्याची अंतिम मुदत १८ मे २०२६ होती. तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर २७ मे २०२६ रोजी वित्तीय निविदा उघडण्यात आल्या.
समूह पुनर्विकासाच्या या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये पात्र रहिवाशांना पुनर्वसन कालावधीत भाडे तसेच देखभालीसाठी कॉर्पस निधीची तरतूद करण्यात आली आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा आणि नियोजनबद्ध नागरी विकासाच्या माध्यमातून रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचा म्हाडाचा मानस आहे.(MHADA Redevelopment)