मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करणार; प्रसारभारतीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार

    03-Jun-2026   
Total Views |
devendra fadanvis
 
मुंबई : (Malad Media Hub) मालाड येथील आकाशवाणीच्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांनी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
 
यासंदर्भात वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत.
 
 
यासंदर्भात राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. या संयुक्त विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करून डीपीआर आणि तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यसमिती स्थापन करावी. तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करावा."
 
प्रस्तावित मीडिया हबमध्ये कोणत्या सुविधा असणार?
 
मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण २७८ एकर जागेपैकी सुमारे १५० एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी प्रसार भारती, एमआयडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता.
'
आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफएम प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये (Malad Media Hub) अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे. (Malad Media Hub)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....