महाराष्ट्रात शालेय बसचे शुल्क १५ टक्क्यांनी वाढणार! शाळा सुरु झाल्यानंतर पालकांच्या खिशाला झळ
03-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Maharashtra School Bus Fee) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पालकांच्या खिशाला आणखी फटका बसणार आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशन ने जून २०२६ पासून शालेय बस वाहतूक शुल्कात १५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. या शैक्षणिक वर्षासाठी ही दरवाढ लागू होणार असून वाढत्या खर्चामुळे हा निर्णय अपरिहार्य असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत शालेय बस सेवा चालविण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिझेल आणि इंधन दरवाढ, चालक आणि बस सहाय्यकांच्या वेतनात वाढ, वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च, स्पेअर पार्ट्स आणि इतर साहित्याच्या किमतीत झालेली वाढ यामुळे बसचालकांवर आर्थिक ताण वाढला आहे.
याशिवाय वाहन विमा, विविध शासकीय परवाने, टोल शुल्क, नियमपालनासाठी लागणारा खर्च आणि ई-चलनांच्या दंडामुळेही आर्थिक भार वाढल्याचे संघटनेने नमूद केले आहे. वाढती महागाई आणि इतर प्रशासकीय खर्च लक्षात घेता विद्यमान शुल्कात सेवा चालविणे कठीण होत असल्याचे बस मालकांचे म्हणणे आहे.(Maharashtra School Bus Fee)
शुल्कवाढीमुळे पालक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चिंता निर्माण होण्याची शक्यता असली तरी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि नियमांचे पालन कायम ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये शालेय बस सेवा ही विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
अशा परिस्थितीत 15 टक्के शुल्कवाढीचा थेट परिणाम हजारो कुटुंबांच्या मासिक खर्चावर होणार आहे. काही पालकांनी दरवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.(Maharashtra School Bus Fee)