कोकणीपाडा वस्तीतील हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

    03-Jun-2026   
Total Views |
Koknipada Settlement Hindu Conference
 
मुंबई : (Koknipada Settlement Hindu Conference) सकल हिंदू समाज, कोकणीपाडा वस्ती, मारुती नगर यांच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन रविवारी, ३१ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. गावदेवी विठ्ठल-रखुमाई मंदिर हॉल, कोकणीपाडा, दहिसर (पूर्व), मुंबई येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
 
कोकणीपाडा वस्तीतील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पूर्ण ‘वंदे मातरम्’ने झाली. त्यानंतर प्रस्तावना सादर करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
 
संमेलनाचे अध्यक्ष प्रकाशजी सावंत यांनी कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळली. यावेळी समाजातील मान्यवर करण महानवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
 
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सहकार भारती मुंबई महानगर संघटन प्रमुख संतोष सुर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून ते संघाच्या जन्मशताब्दी वर्षापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.(Koknipada Settlement Hindu Conference)
 
 
तत्कालीन विखुरलेल्या व असंघटित हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली आणि आज त्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत संघ ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेद्वारे समाजकार्य पुढे नेत असून प्रत्येकाने हे परिवर्तन आत्मसात करून समाजजागरणासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
उद्बोधनाच्या प्रारंभी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, न्यायव्यवस्थेतील योगदानाचा तसेच परकीय आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि यात्रेकरूंसाठी उभारलेल्या सुविधांचा उल्लेख करून त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
 
कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच उपस्थितांचे आभार प्रदर्शन रामपती पाठक यांनी केले. यावेळी उदय अंबावकर (बोरिवली भाग कार्यवाह), रेवणनाथ सूरवसे (वस्ती प्रमुख), महादेव दळवी, विजय मर्गज आणि शशिकांत कासार यांचाही कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता.(Koknipada Settlement Hindu Conference)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक