मुंबई : (Jawaharlal Nehru Port Authority) भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम मिन आंग ह्लाइंग यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान राष्ट्रपती यांच्यासमवेत ६७ सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळ उपस्थित होते.
जेएनपीएमध्ये आगमनानंतर, म्यानमारच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल आणि जेएनपीएच्या विभागप्रमुखांनी उत्साहपूर्ण आदरपूर्वक स्वागत केले. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाला जेएनपीएच्या बंदर पायाभूत सुविधा, कार्यक्षमता, क्षमता विस्तार उपक्रम, धोरणात्मक विकास प्रकल्प, शाश्वतता उपाययोजना तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारतातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक म्हणून विकसित होत असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाची माहितीही देण्यात आली. हा प्रकल्प प्रादेशिक सागरी व्यापार वृद्धीस चालना देणारा आणि देशाच्या सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा विकास टप्पा मानला जात आहे. (Jawaharlal Nehru Port Authority)
यावेळी राष्ट्रपती यांनी जेएनपीएने भारतातील क्रमांक एकचे बंदर म्हणून मिळवलेले स्थान हे त्याच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचे आणि सक्षम सेवा क्षमतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या देशातही बंदर विकास उपक्रमांना गती देण्याची इच्छा व्यक्त केली तसेच बंदर क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेणे, जेएनपीएच्या अनुभवातून शिकणे आणि ज्ञान विनिमय व परस्पर सहकार्याच्या संधींचा आढावा घेणे याबाबत शिष्टमंडळाची विशेष उत्सुकता असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल म्हणाले, “म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम मिन आंग ह्लाइंग आणि त्यांच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएमध्ये स्वागत करण्याचा आम्हाला सन्मान लाभला. या भेटीमुळे भारताच्या सागरी क्षेत्रातील क्षमता, जेएनपीएची उत्कृष्ट कार्यक्षमता तसेच वाढवण बंदर प्रकल्पासह भविष्याभिमुख विकास उपक्रम सादर करण्याची एक उत्तम संधी मिळाली.
भारत आणि म्यानमार यांच्यातील सागरी व व्यापारविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि परस्पर प्रगतीस चालना देणाऱ्या नव्या सहकार्याच्या शक्यतांचा वेध घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” (Jawaharlal Nehru Port Authority)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.