लेबेनॉनवरचे हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्रायलचा इशारा; ट्रम्प यांच्या कानउघडणीला नेत्यानाहू यांच्याकडून केराची टोपली

    03-Jun-2026
Total Views |
Israel Military Operations
 
तेल अवीव : (Israel Military Operations) इस्रायल करत असलेली लेबेनॉनवरची लष्करी कारवाई सुरुच राहणार असून, यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचेही इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी म्हटले आहे. इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्यामुळे जागतिक संघर्ष पुन्हा चिघळण्याची भीती निर्माण झाली असून, इराणने हे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
 
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दक्षिण लेबनॉनमधील लष्करी कारवाई कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहाणार असल्याचे सांगगतानाच, परिस्थितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यांची व्याप्ती वाढण्याचेही संकेत दिले आहेत. तसेच, इस्रायलचे हल्ले ‘हिझबुल्ला’ या संघटनेविरोधात असून, ‘हिजबुल्ला’ला निःशस्त्र करणे हेच इस्रायलचे दीर्घकालीन उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
 
इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यामुळे इराणने अमेरिकेवर दबाव वाढवला असून, दोन्ही देशातील करार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, इराणने इस्रायलच्या या हल्ल्यावरुन संयुक्त राष्ट्र संघटनेवरही टीका केली आहे. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर टीका करताना, परिषदेने केवळ संवेदना व्यक्त करण्यापुरते स्वत:ला मर्यादित ठेवू नये, तर इस्रायलविरोधात दंडात्मक निर्णयही घ्यावेत, असे म्हटले आहे.(Israel Military Operations)
 
 
तसेच, गरीबाबादी यांनी इस्रायलवर इतर देशांच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचाही आरोप केला असून, त्यांच्या मते, इस्रायलला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळणारे अभयच प्रादेशिक अस्थिरतेचे एक मुख्य कारण आहे. तसेच, अमेरिकेवर टीका करतानाही गरीबाबादी यांनी जर ट्रम्प एका फोनवर इस्रायलचे मन वळवण्याचा दावा करत असतील, तर इस्रायलच्या लष्करी कारवायांमद्धील अमेरिकेची थेट भूमिकाच सिद्ध होत असल्याचा आरोपही केला.
 
दरम्यान, इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यामुळे इराण आणि अमेरिकेतील शांतीवार्तेमध्ये अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पदेखील इस्रायलच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संपर्क करुन, त्यांना खडे बोल सुनावल्याचेही वृत्त अमेरिकेतील काही वृत्तसंस्थांनी दिले होते.
 
युरोपीय देशांचा दुरुनच रामराम
 
फ्रान्स आणि स्पेननेदेखील इस्रायलच्या या हल्ल्यावर टीका केली असून, फ्रान्सने इस्रायलच्या हल्ल्याचे आणि लेबनॉनमध्ये दीर्घकाळ सैन्य ठेवण्याचे समर्थन करता येणार नसल्याचे म्हटले आहे. तर, स्पेनने इराणविरुद्धच्या कोणत्याही कारवाईमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हणताना, तणाव वाढवू शकणार्‍या कोणत्याही कृतीला पाठींबा देणार नसल्याचेही स्पेनने स्पष्ट केले आहे.(Israel Military Operations)