स्थायी समितीमध्ये अध्यक्षांसह, सर्वपक्षीय गटनेते यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली; स्थायी समितीचे पुढील कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब
03-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Harishwar Patil Passes Away) मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील (वय ८६ ) यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चार वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थान असलेल्या लक्ष्मण टाॅवर, डी मार्ट जवळ, लिंक रोड दहिसर ( पश्चिम) येथून काढण्यात आली. त्यानंतर दहिसर येथील कांदरपाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरेश्र्वर पाटील हे मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून ( अखंड) प्रभाग क्रमांक १२८ मधून सन १९८५ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर, सन १९९२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १६५ मधून आणि सन १९९७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १५९ महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
सन १९९६- ९७ मध्ये ते स्थायी समिती अध्यक्ष होते. सन १९८८- ८९ अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. तसेच, सन १९९९ ते २००२ या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी काम केले.
हरेश्र्वर पाटील यांच्या सुनबाई योगिता पाटील ( भाजप) या प्रभाग ८ मधून यावेळच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आणि नगरसेवक म्हणून निवडून आल्या.
हरेश्र्वर पाटील यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या प्रशासनात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. विभागीय स्तरावरील लोकसहभाग वाढविण्यासाठी १६ प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. महापालिकेच्या विविध विभागांचे संगणकीकरण सुरू करून त्यांनी प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्याचे प्रयत्न केले.
हरेश्र्वर पाटील हे महापालिकेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य असताना समित्यांच्या सभांच्या कामकाजात आस्थापूर्वक भाग घेत असत. त्यांचा अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. तसेच, त्यांचे सर्व राजकीय पक्षांशी, नेत्यांशी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चांगले संबंध होते.
ते महापौर असताना मुंबई महापालिका मुख्यालयातील हेरिटेज सभागृहात भीषण आग लागल्याने सभागृह आणि सभागृहातील राष्ट्रीय नेत्यांचे तैलचित्र जाळून खाक झाले होते. मात्र ते महापौर असतानाच सदर जळालेल्या सभागृहाचे युद्धपातळीवर नूतनीकरण करून त्या सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे मुंबईतील डांबरी रस्त्यांनी कात टाकायला सुरुवात केली.
मुंबईत अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे जाळे निर्माण करण्याच्या कामाला गती मिळाली. तसेच, महापालिकेच्या १६ प्रभाग समित्यांची निर्मिती करण्यात आली. के/पूर्व विभागासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत बांधणी, प्रबोधनकार ठाकरें नाट्यगृह निर्मिती करण्यात आली.
त्याचप्रमाणे, मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन.शेषन हे पदावर असताना निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्यावेळी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र हरेश्र्वर पाटील हे महापौर असताना त्यांना ध्वजारोहण करण्यात कायदेशीर अडचण आली होती.
त्यांनी त्यावेळी त्यांनी परवानगीसाठी पाठपुरावा केला. मात्र निवडणूक विभागाने परवानगी न दिल्यास देखील स्वातंत्र्यदिनी तिरंगा झेंडा फडकवणारच, असा निर्धार व्यक्त करीत त्यांनी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी देखील दर्शवली होती. मात्र अखेर त्यांना परवानगी मिळाली आणि त्यांनी ध्वज फडकावून आपली जिद्द पूर्ण केली.
तसेच, मुंबई शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी मध्य वैतरणा या प्रस्तावित नवीन धरणाच्या कामासाठी देखील त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाकडे पाठपुरावा केला होता.
मुंबईतील कोळीवाडे यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्र कलादालन आणि सावरकर स्मारक स्विमिंग पूलसाठी पुढाकार घेऊन काम केले. महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रणाली अंमलात आणणारे ते पहिले महापौर होते. त्यासाठी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५२ माध्यमिक शाळांसाठी संगणक आणि संगणकीय शिक्षण उपलब्ध करून दिले.
ते, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेऊन दररोज दुपारचे जेवण महापौर बंगल्यावर घेत असत. ते मुंबईचे पहिले महापौर होते ज्यांनी ३८ महिन्याच्या कारकिर्दीत मुंबईच्या विकासासाठी रात्रंदिवस धडपड केली. महापालिकेत कामे करताना त्यांचा प्रशासनावर चांगलाच वचक होता. मुंबईतील नागरिकांची वाढती तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून मुंबईला पाणीपुरवठा योजना करता येईल का ? अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यासाठी पत्रकारांसोबत कोयना धरण प्रकल्पाचा त्यावेळी दौरा केला होता. समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी करता येईल का, यासाठी त्यांनी भाभा अणुशक्ती केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यावेळी चर्चा करून चाचपणी केली होती.
घाटकोपर (प.) चिरगनगर येथे २००१-२००२ या वर्षात मोठी दरड दोन तीन चाळीवर कोसळून मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली होती. त्यावेळी महापौर म्हणून हरेश्र्वर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर बचावकार्य करण्यास प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडले व जखमी व्यक्तींवर राजावाडी रुग्णायात तात्काळ मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले होते.
महापालिका सदस्यत्वाचा कालावधी :-
१०/५/१९८५ ते ९/३/२००२
महापौर सन १९९९-२००० ते सन २००१-०२
अध्यक्ष (स्थायी समिति) - सन १९९६- ९७.
अध्यक्ष (सार्वजनिक आरोग्य समिति) - सन १९८८- ८१
सदस्य (स्थायी समिति) - सन १९९३- ९४ ते सन १९९६-९७.
सदस्य (सार्वजनिक आरोग्य समिति) - सन १९८५- ८६ ते सन १९९१-९२.
सदस्य (शिक्षण समिति) - सन १९९७-९८
सदस्य (सार्वजनिक आरोग्य समिती - सन १९८५- ८६ ते सन १९९१-९२.
माजी महापौर हरेश्र्वर पाटील , गायिका सुमन कल्याणपुरकर यांना स्थायी समितीकडून श्रद्धांजली
माजी महापौर हरेश्र्वर पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच आज स्थायी समितीचे कामकाज थांबविण्यात आले. माजी महापौर हरेश्र्वर पाटील यांना स्थायी समितीमध्ये सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, आणि सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. तसेच, स्थायी समितीची बैठक पुढील कोणतेही कामकाज न करता बैठक तहकूब करण्यात आली.(Harishwar Patil Passes Away)